मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले.
सलामी फलंदाज पूनम राऊत (३९ चेंडूत नाबाद ५३ धावा) व सारा सामंत (२६ चेंडूत नाबाद ५१ धावा) यांच्या नाबाद अर्धशतकासह ११२ धावांच्या अभेद्य सलामी भागीदारीमुळे दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीचा १० विकेट राखून दणदणीत पराभव केला आणि उद्घाटनीय लढत जिंकली. सलामी फलंदाज अचल वळंजूच्या ७२ चेंडूत १८ चौकारासह नाबाद १०५ धावांच्या फटकेबाजीमुळे राजावाडी क्रिकेट क्लबने पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनवर ३० धावांनी विजय मिळविला.
तिसऱ्या सामन्यात सलामी फलंदाज महेक मिस्त्री (४८ चेंडूत ५० धावा) व अष्टपैलू अनिशा रौत (३८ चेंडूत ५१ धावा) यांच्या अर्धशतकी फटकेबाजीसह दुसऱ्या विकेटसाठी १०१ धावांच्या भागीदारीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबने माटुंगा जिमखान्याविरुध्द मर्यादित २० षटकात ६ बाद १४४ धावांचे आव्हान उभे केले. मध्यमगती गोलंदाज जुही रावतने १५ धावांत ३ बळी घेतले. जुही रावत (५४ चेंडूत ५१ धावा) व गार्गी बांदेकर (२९ चेंडूत ४२ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे माटुंगा जिमखान्याने १८व्या षटकाला १ बाद १२० धावा असा दमदार प्रारंभ केला होता. परंतु अष्टपैलू अनिशा रौत ( १९ धावांत ३ बळी) व महेक मिस्त्री (१८ धावांत २ बळी) यांच्या ऑफब्रेक गोलंदाजीमुळे अखेर माटुंगा जिमखान्याला ६ बाद १३१ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. परिणामी एमआयजी क्रिकेट क्लबने १३ धावांनी चुरशीचा विजय मिळविला. अन्य सामन्यात किंजल कुमारीच्या २६ चेंडूत नाबाद ४२ धावांच्या फटकेबाजीमुळे साईनाथ स्पोर्ट्स क्लबने पय्याडे स्पोर्ट्स क्लबचा ११ धावांनी पराभव केला.
मुंबई क्रिकेट असोसिएशन या मान्यताप्राप्त स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे केले. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संजय नाईक व जनरल सेक्रेटरी अभय हडप उपस्थित होते.