मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, विशेषतः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये या चित्रपटाने विक्रमी कामगिरी केली आहे. शुक्रवार, शनिवारचे मिळून तब्बल १५ शो याठिकाणी हाऊसफुल्ल झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ संपूर्ण मराठवाड्यात या चित्रपटाने यशाची पताका फडकवली आहे. मराठवाड्यातील २३ चित्रपटगृहांमध्ये ‘मिशन अयोध्या’ हाऊसफुल्ल होताना दिसला. अशाप्रकारचा प्रतिसाद मिळाल्याने स्थानिक वितरकांसह निर्मात्यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. मराठवाड्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील लोणावळा येथेही ‘मिशन अयोध्या’चे दोन शो

हाऊसफुल्ल झाले. या ठिकाणीही प्रेक्षकांनी चित्रपटाला जोरदार दाद दिली, ज्यामुळे या यशाचा दरवळ हळूहळू इतर भागांपर्यंत पोहोचत आहे.
मराठी संस्कृती, श्रद्धा आणि अयोध्येच्या ऐतिहासिक परंपरेचा उत्कृष्ट मिलाफ असलेल्या ‘मिशन अयोध्या’ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. प्रभावी कथानक, दमदार अभिनय आणि दर्जेदार निर्मितीमुळे हा चित्रपट मराठी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण करत असल्याचे निर्माते कृष्णा शिंदे, योगिता शिंदे आणि दिग्दर्शक समीर सुर्वे म्हणाले. हा चित्रपट आगामी दिवसांत महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही अशीच लोकप्रियता मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.