हिंदू संस्कृतीतील गणिताची परंपरा अत्यंत दीर्घ आहे आणि या विषयावर उपलब्ध साहित्य त्यानुसार विशाल आहे. डॉ. भास्कर कांबळे यांनी आपल्या लेखणीतून भारतीय गणित आणि त्याच्या विश्वसंचाराचा रंजक इतिहास त्यांच्या अविनाशी बीज, या पुस्तकातून मांडला आहे. डॉ. भास्कर कांबळे हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि डेटा वैज्ञानिक आहेत. त्यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्र आणि डेटा विज्ञान या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन आय. आय. टी. कानपूर येथून पीएच.डी. प्राप्त केली. त्यानंतर ते जर्मनीतील रुहर विद्यापीठ, बोखम (Ruhr University Bochum) तसेच कैसरस्लाऊटर्न विद्यापीठ (University of Kaiserslautern) आणि पोहांग, दक्षिण कोरियातील आशिया पॅसिफिक सेंटर फॉर थिओरिटिकल फिजिक्स येथे अनेक वर्षे संशोधक म्हणून कार्यरत राहिले आहेत. अपारंपरिक सुपरकंडक्टिव्हिटी, क्वांटम फेज संक्रमण आणि बहु-कण भौतिक यात्रात त्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. डॉ. भास्कर कांबळे सध्या बर्लिनमध्ये डेटा वैज्ञानिक म्हणून काम करत आहेत.
प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील गणित विषयातील संशोधन आणि त्याचा विश्वसंचार यावर आधारित ‘The imperishable Seed’ तसेच ‘Hindu Mathematics’ ही त्यांची दोन प्रकाशित पुस्तके आहेत. अविनाशी बीज, या पुस्तकात १४ प्रकरणांतून भारतीय गणित आणि त्याच्या विश्वसंचाराचा रंजक इतिहास संदर्भासहित सांगितला आहे. ज्यांना गणिताची आवड आहे, जे गणिताचे शिक्षक आहेत तसेच ज्यांना भारतीय ज्ञानपरंपरा जाणून घ्यायची आहे त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावे.
या पुस्तकाबद्दल लेखक म्हणतात- या पुस्तकात हिंदू संस्कृतीतील गणितीय परंपरेची तसेच जगावरील तिचा प्रभाव संक्षिप्तरीत्या सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासकांनी अधिक सखोल ज्ञानासाठी पुस्तकाच्या शेवटी दिलेले संदर्भ वापरणे अधिक श्रेयस्कर ठरेल. या अंतिम प्रकरणात हे पुस्तक लिहिताना माझ्या मनात असलेल्या उद्दिष्टांबद्दल थोडेसे सांगून समारोप करू इच्छितो.
हे पुस्तक लिहिण्याचा पहिला उद्देश प्राचीन काळापासून हिंदू संस्कृतीतील गणितीय परंपरेवर लक्ष केंद्रित करणे हा होता. आधुनिक जगावर हिंदू संस्कृतीचा असलेला प्रचंड प्रभाव लक्षात घेता हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे, मग ते गणित असो, योग किंवा ध्यान. याव्यतिरिक्त एक वैयक्तिक कारण म्हणजे शाळेत अंकगणित, बीजगणित, त्रिकोणमिती आणि गणिती यासारखे विषय शिकत असताना त्यांचा उगम हिंदू संस्कृतीतून झाला आहे हे कळले असते तर किती मोठा फरक पडला असता याचा विचार नक्कीच मनात डोकावून जातो. पण शाळेत तसा कधीही उल्लेख केला जात नसे आणि गणित ही मूलतः ग्रीक आणि युरोपियनांची देणगी आहे असाच सर्वत्र समज होता. भारतीय विद्यार्थ्यांना शाळेत शिकत असलेल्या गणितांच्या हिंदू उत्पत्तीबद्दल माहिती दिली गेली तर ते गणिताशी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने आणि अधिक आपुलकीने जोडले जातील. सोबतच गणिताविषयी त्यांच्या मनात असलेली भीती नाहीशी होऊन विषयात आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होईल. हे पुस्तक यासाठी अल्पयोगदान देईल अशी मनापासून आशा आहे.

पुस्तक लिहिण्याचा दुसरा उद्देश हिंदू गणिताचा प्राचीन भारतातील सखोल तात्त्विक जीवनदृष्टी आणि ज्ञान परंपरेशी असलेला संबंध अधोरेखित करणे हा होता. तसेच गणित हा एक वेगळा आणि विलग विषय नसून या ज्ञानपरंपरेच्या प्रणालीचा एक नैसर्गिक परिपाक होता यावर भर देणे हा होता. भारतीय गणितावरील बहुतांश पुस्तके याकडे दुर्लक्ष करतात. दुसऱ्या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे, आध्यात्मिक आणि भौतिक ज्ञान, किंवा ‘परा’ आणि ‘अपरा’ विद्या या दोन्ही एकमेकांना पूरक आहेत आणि एकाच शाश्वत सत्याचे प्रकटीकरण आहेत. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील खगोलशास्त्र, गणित आणि अपरा विधेच्या इतर प्रकारांचा विस्तार बऱ्याच अंशी या मान्यतेतूनच आले आहेत, हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकाला केवळ गणिताच्या संदर्भातच नव्हे तर त्याच्या तत्त्वज्ञानाच्या आणि जीवनदर्शनाच्या व्यापक संदर्भातही हिंदू संस्कृतीचा दृष्टीकोन कळू शकला तरी हे लेखन सार्थकी लागले असे म्हणावे लागेल.
अखेरीस, आधुनिक जगावर प्रभाव असूनही हिंदू गणिताचे योगदान सामान्य जनतेसाठी मोठ्या प्रमाणात अज्ञात का आहे, हे समजून घेणे हे ह्या लेखनाचे तिसरे उद्दिष्ट होते. हिंदू धर्म आणि हिंदू समाज प्रामुख्याने जातिव्यवस्थेसारख्या नकारात्मक गोष्टींशी संबंधित आहे असा समज दिसतो. शिवाय ‘हिंदू राष्ट्रवाद’ यामागील कारणांची चर्चा मागील प्रकरणात करताना आपण पाहिले की याची मुळे वसाहतवादी पूर्वग्रह, धर्मप्रसार मोहिमा, इस्लामी कट्टरतावाद आणि मार्क्सवादी आणि इंडॉलॉजी विचारांमध्ये रुजलेली आहेत. प्रसारमाध्यमे आणि शैक्षणिक क्षेत्रातील ह्या विचारांचे लक्षणीय प्राबल्य भारतविषयक सार्वजनिक चर्चेला त्यांना अपेक्षित असे वळण देण्यास अत्यंत प्रभावशाली ठरले आहे.
वर नमूद केलेल्या घटकांचा भारतीय शालेय शिक्षणव्यवस्थेतही खोलवर प्रसार झाला आहे. माझ्या शालेय जीवनापासूनच हिंदू धर्माची प्रतिमा जातिभेद, अंधश्रद्धा, सती आणि इतर सामाजिक कुप्रथांनी बजबजलेला धर्म अशीच होती आणि बहुतांश लोकांचा हाच समज आजही आहे. त्याचवेळी, विज्ञान आणि गणिताबाबतचा माझा दृष्टीकोन मुख्यतः युरोपकेंद्रीत होता. सुमारे तीन वर्षांनंतरच मी हिंदू गणिताच्या इतिहासाचा अभ्यास सुरू केला. या प्रक्रियेत, हिंदू धर्म आणि हिंदू समाज हा अगदी सुरुवातीपासूनच सामाजिक कुप्रथा आणि भेदभाव हाडीमासी खिळलेला असल्याचा गैरसमज गळून पडला. आतापर्यंत निर्विवाद सत्य म्हणून मानलेल्या समजुतींना गंभीर आव्हान मिळाले. कठपुतळ्याप्रमाणे एखाद्याचे विचार किती सहजपणे नियंत्रित करता येतात आणि तत्सम विमर्श कसे समाजमनात बिंबवले जातात हे ध्यानात आले. यावर शंका येऊ लागल्यानंतरच मी हिंदू गणित आणि हिंदू तत्त्वज्ञानाचा माग घ्यायला सुरुवात केली आणि त्याची परिणती शेवटी या पुस्तकात झाली. या प्रक्रियेत प्रदीर्घ काळापासून दृढ असलेल्या पूर्वग्रहांचा त्याग करणे हा एक संघर्ष होता, कारण ते चूक होते हे कबूल करणे आणि सत्य शोधणे हा एक नवप्रवास होता. खरेतर मुख्य आणि प्रस्थापित प्रवाहातील मतांविरुद्ध जाणे अनेकदा कठीण असते, कारण त्यात दीर्घकाळापासून प्रस्थापित असलेल्या समजुतींमध्ये सुधारणा कराव्या लागतात किंवा त्या सोडून द्याव्या लागतात. सोबतच स्वतःहून प्राथमिक स्रोतांकडून माहिती शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो, शिवाय संशोधन आणि शैक्षणिक वर्तुळातील प्रस्थापित संदर्भ वापरण्याचा सोपा मार्ग बाजूला ठेवावा लागतो. बऱ्याचदा याचे पर्यावसान अप्रियता ओढवून घेण्यात होते. तरीसुद्धा, यातून मिळालेले वैयक्तिक समाधान कुठल्याही अप्रियतेपेक्षा अधिकच उजवे आहे.
या पुस्तकाने वाचकांना केवळ हिंदू गणिताच्या नव्हे, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रस्थापित मतांच्या पलीकडे पाहण्यास, स्वतंत्रपणे विचार करण्यास आणि सर्वमान्य, सर्वसमर्थित समजुती आणि गृहीतकांवर प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित केले असेल तर ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब असेल. हिंदू संस्कृतीतील गणिताची परंपरा अत्यंत दीर्घ आहे आणि या विषयावर उपलब्ध साहित्य त्यानुसार विशाल आहे. एकाच पुस्तकात हिंदू गणिताच्या सर्व पैलूंना पूर्ण न्याय देणे खरोखरच कठीण आहे आणि म्हणूनच काही विषय वगळणे अपरिहार्य आहे. तरीसुद्धा, हिंदू संस्कृतीतील गणिताच्या वारशाचा हा एक उपयुक्त आणि मनोरंजक परिचय ठरेल अशी मला आशा आहे.
अविनाशी बीज
(भारतीय गणित आणि त्याच्या विश्वसंचाराचा रंजक इतिहास)
लेखक: डॉ. भास्कर कांबळे
अनुवाद: आनंद विधाते । डॉ. श्रीराम चौथाईवाले
प्रकाशक: भारतीय विचार साधना
मूल्य: ६०० ₹. / पृष्ठेः २७८
सवलत मूल्य- ५४० ₹.
टपालखर्च- ८० ₹.

पुस्तक खरेदीसाठी संपर्क- ग्रंथ संवाद वितरण (8383888148)