भारतीय नौदलाची नवीकोरी, रडारवर टिपली न जाणारी युद्धनौका (स्टेल्थ फ्रिगेट) आय एन एस तुशील दोन देशांमधले संबंध अधिक चांगले करण्याच्या हेतूने नुकतीच सेनेगलच्या डकार बंदरात डेरेदाखल झाली.
कॅप्टन पीटर वर्गीस यांच्या नेतृत्त्वाखाली आयएनएस तुशील तिच्या बंदरातील मुक्कामादरम्यान (पोर्ट कॉल) विविध लष्करी आणि सामाजिक उपक्रमात सहभागी होईल. यामध्ये सेनेगलचे वरिष्ठ लष्करी आणि सरकारी अधिकारी यांच्याशी संवाद, अत्याधुनिक स्वदेशी बनावटीची शस्त्रे, संवेदक (सेन्सर्स) आणि जहाजावरील साधनसामुग्रीचे प्रदर्शन आदींचा समावेश असेल. या युद्धनौकेवर, दोन्ही नौदलातील तज्ज्ञांमध्ये परस्परांना लाभदायक ठरणाऱ्या समस्या निवारणाच्या उपायांवर संवाद होईल आणि त्यादृष्टीने प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षणही पार पाडेल.

सेनेगलच्या हौशी नागरिकांसाठी योगाभ्यासाचे एक सत्रदेखील येथे नियोजित आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याकरीता सामाजिक संवादाचे आयोजनदेखील होणार आहे. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर ही युद्धनौका संवाद आणि सहकार्य वाढवणाऱ्या संयुक्त सरावामध्ये (पॅसेज एक्सरसाइज -PASSEX) भाग घेईल आणि पश्चिम आफ्रिकी किनाऱ्याजवळील समुद्रात सेनेगलच्या नौदलासह संयुक्त गस्त घालणारे संचलन करेल. प्रादेशिक सुरक्षा वाढवतानाच आंतरपरिचालनाला चालना देत दोन्ही नौदलांमधील सागरी सहकार्य वाढवणे हा या सरावामागचा उद्द्येश आहे.
भारताने सेनेगलसोबतच्या संबंधांना दिलेले महत्त्व आणि दोन्ही राष्ट्रांमधील वाढणारे संरक्षण सहकार्य आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नाचे हे आणखी एक प्रखर द्योतक आहे. यामुळे दोन्ही नौदलांना एकमेकांकडून शिकण्याची आणि सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्याची संधी देखील मिळेल.