महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या एका मोठ्या राजकीय नेत्याचा सरत्या सप्ताहात अस्त झाला. 6 डिसेंबर रोजी मधुकरराव पिचड यांचे निधन झाले. पिचड गेले कित्येक महिने आजारीच होते. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांचे काम महत्त्वाचे तर होतेच, पण आदिवासींच्या देशव्यापी संघटनेचे ते अनेक वर्षे प्रमुख होते. गोरेपान आणि घाऱ्या डोळ्यांचे पिचड मंत्री असताना तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेता असतानाही तितकेच रुबाबदार राहत. मधुकर पिचड यांनी आताच्या अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील अकोले या डोंगराळ व आदिवासी मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून 1980पासून 2009पर्यंत विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. त्यातील बराच काळ त्यांनी राज्यमंत्री व नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. ते शरद पवारांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री असतानाच गोवारी चेंगराचेंगरी प्रकरण नागपुरात घडले आणि त्यांनी पदत्याग केला होता.
गोवारी चेंगराचेंगरी हे शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीतीलही अत्यंत दुर्दैवी प्रकरण होते. येत्या सोमवारीच नागपुरात आणखी एका हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होत आहे. प्रत्येक अधिवेशनातच गोवारींच्या त्या घटनचे स्मरण होते. आठवड्याचा मधलाच बुधवारचा दिवस होता. 23 नोव्हेंबर 1994 रोजी तो प्रकार घडला. नागपूर अधिवेशनावर तसेही दररोज अनेक मोर्चे थडकत असतात. मोरीस कॉलेजजवळ टी पॉईंट म्हणजे तिठा आहे. तिथे हे मोर्चे अडवले जात असत. आजही तिथपर्यंत मोर्चे येतात. पण दोन मोर्चे एकत्र येऊ नयेत, त्यात वेळेचेही अंतर राहवे, असा प्रयत्न पोलीस करतात. अशा मोर्चांची निवेदने अधिकाऱ्यांमार्फत स्वीकारली जातात अथवा मोर्चातील चार-पाच नेत्यांना घेऊन पोलीस विधानभवनात येतात. तिथे हे मोर्चेकरी आपले निवेदन मंत्र्यांकडे सोपवू शकतात.
त्यादिवशी थोडा निराळा प्रकार घडला. मोर्चा दुपारी टी पॉईंटजवळ थांबवला गेला. पण मोर्चात गर्दी प्रचंड झाली होती. सुमारे पन्नास हजार लोक भंडारा, गोंदिया वगैरे भागातून नागपुरात दखल झाले होते. अनुसूचित जातींमध्ये म्हणजेच आदिवासींमध्ये गोवारींचा समावेश करा ही मागणी जुनी आहे. पण त्याला मूळ आदिवासी जमातींचा मोठा विरोध होता व आहेही. आदिवासींचे नेते, मंत्री आमदार तसेच शासनाचा आदिवासी विभाग यांचे याबाबतीत ऐक्य होते. म्हणून मग गोवारींना न्याय मिळणार कसा हा सवाल अधांतरीच होता. अलिकडे अशाच प्रकारे धनगर समाजाची तशीच मागणी आहे व आदिवासींचा त्यालाही तितकाच विरोध आहे. दरवर्षी निघणारा व शांततेत परत जाणारा गोवारी मोर्चा असल्याने पोलीस त्यादिवशी निवांत होते. पण त्यादिवशी मोर्चातील काही तरुणांनी पोलिसांनी उभे केलेले लाकडी व लोखंडी कठडे बाजूला सारून विधानभवनाकडे जाण्याचे ठरवले होते. मार्चाच्या पुढच्या भागात काय चालले आहे हे मागच्या लोकांना कळत नव्हते. ते पुढे पुढे येतच होते. पलिसांनी लाठीमार सुरु केला व मोर्चेकऱ्यांना मागे ढकलण्यास सुरूवात केली. त्या रेटारेटीत गोंधळ उडाला. चेंगराचेंगरीत बायका-मुलं अधिक प्रमाणात जखमी व मृत झाली. मृतांचा आकडा 114 झाला तर 500हून अधिक लोक जखमी झाले.
पोलिसांच्या कारवाईनंतर मोर्चाची पांगापांग झाली. मृत व जखमींना पोलिसांनी रुग्णालयात नेले. थोड्या अवधीनंतर पाणी मारून रस्ता साफही करून टाकला गेला. आजच्यासारखे चोवीस तास सुरु राहणारे टीव्ही चॅनेल तेव्हा नव्हते. मोबाईलवर स्वार समाजमाध्यमांचा जमानाही दूरच होता. त्यामुळे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या विधानभवनातील मंत्री, अधिकारी तसेच पत्रकारांनाही, घटना घडल्याचा पत्ताच नव्हता. सायंकाळी उशिरा आकाशवाणी व नंतर दिल्लीच्या दूरदर्शनच्या बातम्यांतून असा काही भयंकर प्रकार घडल्याची चुणूक मिळाली. नंतर फोटोग्राफर व पत्रकार तिकडे धावले. पण तोवर रस्ते साफही झालेले होते. अस्ताव्यस्त पडलेला चपलांचा ढीग, इतकाच घटनेचा मागमूस शिल्लक होता. हळुहळू रुग्णालयांतील माहिती पुढे आली. तोवर अधिवेशनाचे काम संपवून मुख्यमंत्री शरद पवार मुंबईतील काही कार्यक्रमासाठी सरकारी विमानाने नागपूर सोडून निघून गेले होते. कळल्यावर मध्यरात्रीनंतर ते परतले. गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील व आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्याकडून तसेच स्थानिक पोलिसांकडून जी माहिती मिळाली त्यावर बातम्या केल्या गेल्या. पण मुंबईत त्या अभावानेच प्रसिद्ध झाल्या. कारण तोवर बहुतेक सारे अंक छपाईला गेले होते.
स्थानिक वृत्तपत्रांनी मृतांचा आकडा फ्लॅश केला तेव्हा गुरुवारी विधानसभेत हंगामा सुरु झाला. गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते होते. मनोहर जोशी शिवसेना नेता होते. त्यांनी विषय वाढवला तेव्हा पिचड यांचा राजीनामा झाला. मुंडे म्हणाले की, शरद पवारांच्या सरकारने 114 नव्हे 115 बळी घेतले. एकशे पंधरावा बळी पिचड यांच्या मंत्रीपदाचा गेला.. शरद पवारांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसच्या सत्तेचा अस्त नंतरच्या निवडणुकीत झाला. त्याचे एक कारण गोवारी हत्त्याकांड हेही होते. पण केवळ त्या कांडातील भूमिकेसाठी पिचड यांना लक्षात ठेवणे हा त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. मधुकर पिचड हुषार होते. त्यांनी नगरच्या सहकार चळवळीत मोठे काम केले. अकोले या डोंगराळ व आदिवासी तालुक्यात दूध सहकारी संस्थेचे मोठे जाळे त्यांनी उभे केले. अगस्ती सहकारी साखर कारखाना त्यांनी काढला. तो आदिवासी शेतकऱ्यांनी चालवलेला पहिला सहकारी कारखाना ठरला.
काँग्रेसची सत्ता संपल्यानंतर 1995ला राज्यात जोशी-मुंडेंच्या शिवेसना भाजपा युतीचे राज्य सुरु झाले, तेव्हा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद शरद पवारांनी पिचड यांच्याकडे सोपवले. तिथे त्यांनी चमकदार कामगिरी करुन दाखवली. त्यांच्या जोडीला छगन भुजबळ विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. या दोघांनी शिवसेना-भाजपा सरकारला हैराण केले. विशेषतः किणी प्रकरणाचा उल्लेख त्यासाठी करावा लागेल. राज ठाकरेंना किणी खूनप्रकरणात गोवण्याच्या त्या प्रकरातून भुजबळांच्या सरकारी बंगल्याला शिवसैनिकांनी घेराव घातला व हल्ला केला होता. पिचड तेव्हा भुजबळांच्या रक्षणासाठी उभे राहिले होते. युतीची सत्ता साडेचार वर्षांतच समाप्त झाली. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा त्यांच्यापाठी उभे राहणारे पिचड हेच पहिले मोठे नेते ठरले. नंतरच्या संयुक्त सरकारमध्ये तसेच नव्याने उदयास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही त्यांनी मोठी पदे भूषवली. 2009मध्ये ते निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांचे राजकारण थंडावले. एका टर्मसाठी त्यांचा मुलगा वैभव पिचड आमदार झाला. दोघा पिता-पुत्रांनी 2019मध्ये भाजपात प्रवेश केला. पण तिथे त्यांचे फार जमू शकले नाही. ते निवर्तले त्याआधी दीड महिना ते नाजूक स्थितीत रुग्णालयात झगडत होते. पुढे त्यातच त्यांचा मृत्यू झाला.