काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्याच्या अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्त्येनंतर पुढे आलेले नाव म्हणजे लॉरेन्स बिश्नोई. हा प्रकार म्हणजे मुंबईमध्ये रिकामी असलेली अंडरवर्ल्ड डॉनची जागा भरण्याचा निव्वळ एक कार्यक्रम आहे, असे माहितगारांचे मत आहे.
1970च्या दशकात स्मगलिंगच्या काही दादांनी म्हणजेच करीमलाला, हाजी मस्तान, युसुफ पठाण यासारख्या लोकांमुळे सुरू झालेले टोळीयुद्ध म्हणजेच गँगवॉर 1980-90च्या दशकात फोफावले. मात्र 1992-93च्या भीषण जातीय दंगली आणि बॉम्बस्फोट, या प्रकारानंतर मुंबई पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईनंतर गँगवॉर विसावले. अरुण गवळी, दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अमर नाईक अशा वेगवेगळ्या टोळ्यांपासून मुक्त झालेल्या मुंबईत सध्या अंडरवर्ल्ड डॉनची जागा रिकामी आहे. आणि हीच जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न आता लॉरेन्स बिश्नोईकडून केला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, हा नवीन डॉन तयार होतोय फक्त प्रसिद्धी आणि त्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या दहशतीच्या जोरावर. या बिश्नोईकडे स्वतःची गँग नाही. एक गँग चालवणे म्हणजे संपूर्ण कॉर्पोरेटसारखा प्रकार असतो. शूटर वेगळे.. वॉचर वेगळे.. शस्त्र पुरवणारे वेगळे.. खबरी वेगळे.. गुन्ह्यानंतर पोलिसांसमोर हजर होणारे वेगळे.. वकील वेगळे.. हद्द ठरलेली.. अशा अनेक गोष्टा असतात. पूर्वीच्या गँगस्टरचे असे सारे साम्राज्य होते. परंतु आता प्रत्येक गोष्ट पुरवणारे लेबर काँट्रॅक्टर जसे बांधकाम क्षेत्रासह अनेक क्षेत्रात आहेत तसे ते अंडरवर्ल्डमध्येही आहेत. आणि याच लेबर कॉन्ट्रॅक्टरचा वापर करून लॉरेन्स बिश्नोई मुंबईच्या अंडरवर्लडच्या दुनियेत आपले बस्तान बसवू पाहत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
बाबा सिद्दिकी यांची हत्त्या झाली आणि या लॉरेन्सचे नाव पुन्हा समोर आले. त्याआधी अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानाबाहेर हवेत झालेल्या फायरिंगमध्ये त्याचे नाव घेतले जात होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या साबरमती जेलमध्ये असलेला लॉरेन्स बिश्नोई कधीच हत्त्या करत वा करवत नाही. धमकावणे, घाबरवणे आणि खंडणी उकळणे हा त्याच्या दहशतभरी जीवनाचा फंडा आहे. त्याच्याकडे लक्ष गेले ते सिद्धू मुसेवालाच्या हत्त्येनंतर.. त्यामध्ये लॉरेन्सच्या नावावर अंडरलाईन करण्यात आले. तोच धागा पकडून जिथे एखादी खुनासारखी घटना घडते तिथे लॉरेन्सचे कंत्राटी साथीदार त्याची जबाबदारी स्वीकारत लॉरेन्सचा दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करतात, असे समजते. आताही आपण बाबा सिद्दिकींचा खात्मा करू शकतो तर तुम्ही कोण आहात, असे बॉलीबूड तसेच राजकीय क्षेत्रातल्या नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न लॉरेन्स बिश्नोईचा असल्याचे बोलले जाते.
कॅनडामध्ये झालेल्या के. पी. धिलाँ तसेच ग्रेवाल यांच्यावरील गोळीबाराची जबाबदारी याच बिश्नोईने स्वीकारली होती. गोळीबाराच्या वेळी तर ग्रेवाल घरीच नव्हते आणि त्यांच्या टाळे लागलेल्या घराबाहेर गोळीबार झाला होता. ज्याला हत्त्या करायची आहे किंवा हत्त्येचा प्रयत्न करायचा त्या टोळीकडे किमान समोरची व्यक्ती घरी आहे की नाही याची तर माहिती असणारच. तशी यंत्रणाच असणार. मात्र असे काहीही नसताना हा हल्ला झाला आणि त्याची जबाबदारी बिष्णोईच्या कथित गँगने अगदी सहजतेने स्वीकारली. आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक मोठा गँगस्टर म्हणून ओळखले जावे असा हा सारा प्रयत्न असल्याचे समजते. आता तर एनआयएनेही दहशतवादाच्या एका प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईला आरोपी केले आहे. त्याचे खालिस्तानवादी शीख अतिरेक्यांशी संबंध असल्याचा एनआयएचा दावा आहे. त्यामुळे बिश्नोईचा मुंबईतला अंडरवर्ल्ड होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
बाबा सिद्दिकींच्या हत्त्येनंतर पुण्यातल्या शुभम लोणकरने एक पोस्ट करून लॉरेन्स बिश्नोईच्या वतीने या हत्त्येची जबाबदारी समाजमाध्यमावर स्वीकारली. हा लोणकर आणि त्याचा भाऊ प्रवीण दोघेही त्याच्यासाठी सोशल मीडियाचे काम पाहतात, असे बोलले जाते. त्याने समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले की, जो दाऊद किंवा सलमान यांची साथ देईल त्याचा असाच हाल होईल. आता सवाल हा आहे की, सलमान किंवा दाऊदला साथ देणारे फक्त बाबा सिद्दिकी नव्हते. फार मोठी यादी त्यासाठी देता येईल. चित्रपटसृष्टीतले कित्येक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक तसेच अनेक राजकारणी त्यांचे सिम्पथायझर आहेत. मग फक्त बाबा सिद्दिकी यांनाच का टार्गेट केले गेले? त्यामुळेच या हत्त्येमागे बिश्नोईचा हात असण्याची शक्यता फारच कमी आहे, असे सूत्रांनी सांगितले.
कोणालातरी बकरा बनवायचा आणि गुन्हा निकाली काढायचा हा पूर्वीपासूनचा पोलिसी खाक्या यावेळी दिसून येतो की काय, असे म्हणावे लागेल. पूर्वीही हत्त्येसारखी एखादी घटना घडली की मुंबईतल्या विविध टोळ्यांच्या प्रवक्त्यांकडून वृत्तपत्रांमधल्या त्यांच्या विश्वासातल्या पत्रकारांना फोन जायचे, गुन्ह्याची जबाबदारी घेतली जायची. त्या काळात टीव्ही चॅनल नव्हते. मोबाईल फोन नव्हते. होते ते अर्धा एक किलोमीटर अंतरावर असलेले एक रुपयाच्या नाण्यावर चालणारे पब्लिक फोन. त्यावेळी फोन करून वृत्तपत्रांपर्यंत ही माहिती कशी पोहोचेल असा प्रयत्न केला जायचा. असे अनेक फोन मी स्वतः स्वीकारले आहेत. राहता राहिला बाबा सिद्दिकींच्या हत्त्येचा मामला तर त्यांची हत्त्या अतिक अहमद, या उत्तर प्रदेशमधल्या तथाकथित प्रतिष्ठित मोठ्या गँगस्टरच्या हत्त्येसारखी झाली. अतिकला न्यायालयात नेत असताना आरोपींनी त्याची हत्त्या केली होती. आरोपी जागच्याजागी पकडले गेले. तशाच पद्धतीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्त्येनंतर काही तासांतच दोन आरोपी पोलिसांनी पकडले. त्यामुळेच हा सारा प्रकार संशयास्पद वाटतो, असे सूत्रांनी सांगितले.
बाबा सिद्दिकी बांधकाम व्यवसायात होते. अनेक एसआरए प्रकल्प त्यांनी मार्गी लावले. वांद्र्यासारखा परिसर हा सोन्याची नाही तर हिऱ्यांची अंडी देणारा समजला जातो. अशा परिसरात कोणताही एसआरए प्रोजेक्ट बाबा सिद्दिकींच्या मर्जीशवाय आकारात येत नव्हता, ही काही वर्षांपूर्वीची काळ्या दगडावरची रेघ होती. सिद्दिकी स्वतः 2000 ते 2004 या काळात म्हाडाचे अध्यक्ष होते. त्यावेळी अनेक जमिनी हडपल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात होता. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्याविरोधात तक्रारीही केल्या होत्या. लाखो-करोडोंचा हा उद्योग आहे. 2004 ते 2008 या काळात सिद्दिकी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीही राहिले. वांद्र्यातल्याच संत ज्ञानेश्वर नगर तसेच भारत नगर येथील एसआरए प्रकल्पाविरोधात बाबांचे पुत्र काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आंदोलन करत आहेत. याच ठिकाणची एक-एक झोपडी काही वर्षांपूर्वी दोन-दोन कोटींना विकली गेली आहे. त्यामुळे त्यांच्या हत्त्येमागे एसआरए हेच प्रमुख कारण असावे, असा संशय जाणकार व्यक्त करत आहेत.
आणखी एका अँगलवर पोलीस तपास करत आहेत. तो म्हणजे राजकीय हत्त्या. तब्बल 48 वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेले बाबा सिद्दिकी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे तर त्यांची हत्त्या झाली नाही ना असा एक अँगल पोलीस तपासत आहेत. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहिला तर एखाद्या नेत्याने एखादा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला म्हणून त्याची हत्त्या करायची असा प्रयत्न होत नाही. तशी महाराष्ट्राची संस्कृती नाही. महापौरपदाच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केले म्हणून ठाण्यात त्यावेळचे शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्त्या झाली होती. तो अपवाद वगळला तर पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून कोणाची हत्त्या झाली असा इतिहास महाराष्ट्रात नाही. त्यामुळे या अँगलने तपास करण्यात पोलिसांना फारसे काही साध्य होईल, असे वाटत नाही. त्यातही सिद्दिकी यांचे समाजकार्य अफाट होते. वांद्र्यातल्या अनेक कॉन्व्हेंट शाळांमधल्या गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, गणवेश देणे, स्वतःच्या वाढदिवशी संपूर्ण शाळेला चॉकलेट्स वाटणे, ईदच्या निमित्ताने शिक्षकांना शिरकुर्मा, बिर्याणी पाठवणे असे त्यांचे काम होते. उत्तर प्रदेशातल्या गोपालगंजमध्येही एका ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य चालत होते. त्यामुळे या सर्व ठिकाणचे लोक बाबांच्या हत्त्येनंतर फार हळहळले होते, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.
पोलिसांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्त्येप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. गुरमेल सिंग, प्रवीण लोणकर, धर्मराज कश्यप अशी त्यांची नावे आहेत. चौथा आरोपी शुभम लोणकर फरार आहे. आरोपी गुरमेल सिंग तसेच धर्मराज दोघेही उत्तर प्रदेशातल्या बहराईच जिल्ह्यातले आहेत. त्यांच्यावर यापूर्वी असे गुन्हे केल्याचा कोणताही दाखला नाही. आणखी एक आरोपी शिवकुमार गौतम 28 वर्षांचा आहे जो फरार आहे ज्याचा पोलीस शोध घेत आहेत. शिवकुमार आणि धर्मराज दोघे भंगार विक्रेते आहेत. त्यांच्याविरोधात अशा स्वरूपाचा पूर्वीचा कोणताही गुन्हा नाही. आरोपी शिवकुमार याला त्याचा भावाच्या हत्त्याप्रकरणात कैद झालेली आहे. अलीकडेच तो जामीनावर सुटला होता.
या सर्व प्रकरणामध्ये आणखी एका आरोपीचे नाव घेतले जाते. झिशान अख्तर असे त्याचे नाव आहे. त्याच्या इशाऱ्यावर यांनी काम केले असे पोलीस सूत्र सांगतात. झिशान पंजाबच्या जालिंदरमधला आहे. पोलिसांचे एक पथक साबरमती जेलमध्ये जाऊन लॉरेन्सची चौकशी करणार असल्याचे समजते. 2023मध्ये सीआरपीसी 2008च्या खाली जेलमध्ये असलेल्या आरोपीला इतरत्र चौकशीसाठी नेता येत नाही, असे निश्चित झाल्यामुळे सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलीस लॉरेन्स बिश्नोईला चौकशीसाठी मुंबईत आणू शकले नाहीत. आता जे पथक तेथे गेले आहे तेही यापलीकडे काही करेल असे वाटत नाही. त्यामुळे पोलिसांनी आता प्रसिद्धीमाध्यमांतून बातम्या पेरण्यापेक्षा बाबा सिद्दिकींची हत्त्या कशामुळे झाली हे पुराव्यासह जनतेसमोर मांडावे. आज दया नायकसारखे अधिकारी याचा तपास करताहेत. त्यांनीतरी सत्य शोधून काढावे. तूर्तास इतकेच..
सुंदर लेख
लेख मस्त झालाय. अंडरवर्ल्ड मधील बर्याच गोष्टी कळल्या.