पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, शनिवारी मुंबईतल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा सीप्झ ते कुलाबा या मेट्रो ३च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. हे निमित्त घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर तोंडसुख घेतले आहे. या मेट्रोचे काम पूर्ण झाले नसतानाही पंतप्रधान त्याचे उद्घाटन करायला येत आहेत, असा आरोप त्यांनी केला. आमच्या काळात या मेट्रोचे काम रखडले असा आरोप सत्ताधारी करतात. पण, आमच्या सरकारच्या काळात, बाहेर कोविडचा लॉकडाऊन असतानाही या रेल्वेचे काम चालू होते. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि लवकरच ते सादर केले जातील, असेही ते म्हणाले.
त्यांच्या आरोपात अजिबात तथ्य नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिले काम केले ते, याच मेट्रोसाठी आरेमध्ये होत असलेल्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. पुढेतर कारशेडची ही जागाच रद्द करून प्रस्तावित शेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. विकासासाठी पर्यावरणाची हानी होऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी हे काम केले आणि तेव्हाच्या सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसपैकी एकाही पक्षाच्या नेत्याला असे वाटले नाही की, या निर्णयामुळे या मेट्रोचे काम रखडेल, त्याचा खर्च वाढेल. मुंबईकरांच्या सोयीसुविधांशी त्यांना तसूभरही सोयरसूतक नव्हते. त्यांनीही ठाकरेंना अडवले नाही.
विधानसभेतले तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सरकारच्या या निर्णयाविरूद्ध जीव तोडून आवाज उठवत होते. परंतु त्यांचा आवाज मातोश्रीपर्यंत पोहोचतच नव्हता. त्यांचे कान जणू बधीर झाले होते. लोकांना असे वाटत होते की एखाद्या ‘रिबेका मार्क’ यांनी मातोश्रीवर जावे आणि एनरॉनप्रमाणे हा मेट्रो प्रकल्प सुरळीतपणे मार्गी लागावा. तेव्हाच्या शिवसेनेने एनरॉन प्रकल्पाला असाच विरोध केला आणि जेव्हा रिबेका मार्क यांनी बाळासाहेबांचे मन वळवले आणि बाळासाहेबांनी त्यासाठी परवानगी दिली तेव्हा या प्रकल्पाचे असे काही तीनतेरा वाजले होते की तो असून नसल्यात जमा झाला. मात्र, ठाकरेंचे सरकार जेव्हा पायऊतार झाले तेव्हा या आरे कारशेडचे ग्रहण सुटले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कारशेड पुन्हा आरेला नेली. पण, तोपर्यंत मेट्रोच्या कामाचा खर्च तब्बल १० हजार कोटींनी वाढला होता.
याच मेट्रो ३चे काम जवळजवळ पूर्ण झाले असावे असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी संपूर्ण मेट्रोचे उद्घाटन करतात की त्यातल्या एखाद्या टप्प्याचे हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. राहता राहिला भुयारी मेट्रोच्या वरच्या भागाचा प्रश्न.. तर त्यावरील रस्त्यांवरचे काम बऱ्यापैकी शिल्लक आहे. दक्षिण मुंबईतल्या गिरगावात पदोपदी याची प्रचिती येते. मुंबई महापालिकेचे धोरणच याला कारणीभूत आहे, असे म्हणावे लागेल. पावसाळ्यात मुंबई महापालिकेचे काम बंद असते. येत्या १० ऑक्टोबरनंतर म्हणजेच मान्सून परतल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर या कामांना सुरूवात होईल आणि दोन-तीन महिन्यांत ती संपतीलही.
मुंबईच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे सरकार असतानाच झाले आहे. मुंबईत उड्डाणपुलांचे जे जाळे उभे राहिले, ते भाजपाचे शिवसेनेबरोबरचे १९९५ साली असलेल्या सरकारच्या काळात. आणि त्यानंतर मुंबईत मेट्रोचे जे जाळे उभे राहिले ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री असतानाच्या काळात. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असल्याने केवळ राज्याच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीत मुंबई महत्त्वाची भूमिका बजावते हे फडणवीस यांनी ताडले. त्यानंतर त्यांनी मुंबईला सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आगामी दशकांमध्ये मुंबईची वाढ कायम ठेवण्यासाठी पायाभूत प्रकल्पांची मालिका सुरू केली. मेट्रो लाइन ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) ज्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. याची पायाभरणी २०१६मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असतानाच झाली होती. मेट्रो लाइन २ए आणि ७, ज्याच्या बांधकामाला फडणवीस मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर २०१६मध्ये सुरुवात झाली. मेट्रो लाइन ४ची (वडाळा ते कासारवडवली) सुरूवातही फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली ऑक्टोबर २०१८मध्ये झाली. काँक्रिटच्या रस्त्यांचे उभारले जात असलेले जाळे, कोस्टल रोड उभारण्याच्या कामाला गतीही देवेंद्र फडणवीसच्या लक्ष्यित विकासाच्या ब्ल्यू प्रिंटचाच परिपाक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १३ जुलै २०२४ रोजी मुंबईत २९४०० कोटींच्या विकासप्रकल्पांना लाँच केले. त्यात ठाणे बोरीवली ट्विन बोगदा प्रकल्प, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, आदींचा समावेश आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देण्यात येणार असून, यासाठी एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्जसहाय्य देण्यास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. ठाणे ते बोरीवली या भुयारी मार्गासाठी १८ हजार ८०० कोटी ४० लाख रुपयांच्या प्रकल्पासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सहापदरी मार्गाच्या दुहेरी-भुयारी मार्गाचे बांधकाम प्रतिपदरी भुयारी मार्गाची एकूण ११. ८५ किमी अशी असून एमएमआरडीएमार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळेच आता विरोधकांचे धाबे दणाणले आहे. आज आदित्य ठाकरेंनी टीका केली. उद्या त्यांच्या पक्षाचे इतर नेते तसेच महाविकास आघाडीचे नेते सरकारच्या विकासकामांवर तुटून पडतील. पण मुंबईकर तर पाहतातच आहेत ना!