Homeमाय व्हॉईसयंत्राच्या काळजातला आर्त...

यंत्राच्या काळजातला आर्त स्वर…

“यंत्राच्या काळजातील आर्त स्वर

तुझ्या कंठात आकार घेऊ दे

उडणाऱ्या नाडीचे जागते ठोके

त्यांचा घंटारव अंतरात घुमू दे” (नारायण सुर्वे)

‘माझे विद्यापीठ’ (1961) या नारायण सुर्वे यांच्या कवितासंग्रहाची बोलकी अर्पण पत्रिका! आज काय हे वेगळं चाललंय असं तुम्ही विचाराल! बरोबर आहे तुमचं, राजकारण तापत आहे. बदलापूरच्या एनकाऊंटरप्रकरणी उच्च न्यायालय संशय व्यक्त करतंय. इतकेच नाही तर गेले दोन दिवस मुंबई, ठाणेच नव्हे तर राज्याला पावसाने धो धो धुतले असताना तुम्ही नारायण सुर्वे काय काढून बसलात? पण असा विचार केला की राजकारण काय नेहमीच चालू असते. संशय घेण्याची प्रवृत्ती हल्ली वाढतच आहे आणि पावसाचे काय हल्ली तो केव्हाही कोसळतोय! सरकार कुणाचेही असो, ते फक्त तीट लावते आणि पुढे चालू लागते. परंतु साहित्य वा संस्कृतीविषयक गोष्टी लिहिता येत नाहीत.

खरंतर नारायण सुर्वे यांच्यावरील प्रख्यात समीक्षक अरुण खोपकर यांनी तयार केलेला माहितीपट व त्यावर मुंबई प्रेस क्लबने एक प्रश्नोत्तररुपी कार्यक्रम ठेवला होता. काही कारणांनी यावर लिहिणे पुढे जात होते म्हणूनच आज यावर लिहिण्याचे पक्के केले आणि लिहिता झालो. खरंतर हा माहितीपट 2004मध्येच तयार झाला होता. त्याचे शोही रसिकासांठी त्यावेळी ठेवण्यात आले होते. आता तब्बल 20 वर्षांनी हा माहितीपट पाहताना प्रेक्षकांचा नजरिया थोडाफार बदलणारच! एक मात्र कबूल केले पाहिजे की खोपकर यांनी हा माहितीपट बनवण्यात काहीच कमतरता ठेवलेली नाही हे कबूल करायलाच हवे.

नारायण सुर्वे हे मराठी कवी परंपरेतील मर्ढेकरपंथीय कवी आहेत हे मानायला काहीच हरकत नसावी.

”शहरातील दररोजच्या धकाधकीचे जीवन कवितेत प्रतिबिंबित करण्यास काहीच हरकत नसावी या मताचे हे सर्वजण होते. म्हणून मला सतत वाटतं राहते की आपण जीवनातील रोजच्या संघर्षकडे वळूया. तेथील अनुभव गोळा करूया. थोडेसे अंगावरचे कातडे शेकले तर हरकत नाही. हलगी शेकवावीच लागते. नाहीतर खरा स्वर बाहेर येत नाही. सापडली तर जातिवंत कलाकृती याच धुमाळीत सापडेल” (लोककवी सुर्वे – आत्मवृत्त)

याचाच प्रत्यय ‘माझे विद्यापीठ’ या काव्यसंग्रहात जागोजागी येतो.

“ना घर होते ना गणगोत, चालेल तेव्हडी पायाखालची जमीन होती

दुकानांचे आडोसे होते; मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती”

अशी थेट सुरुवात करूनच ते जणू जीवनाचा पंचनामा तयार करतात आणि जीवनाच्या न्यायालयात तो मांडतात!

“स्वतःलाच शोधण्यात अर्धी उमर हरवून गेलो

स्वतःकडून लाखदा वळलो, तरीही आढळलो नाही

… एक आम्हीच असे निघालो; बेईमान झालो”

अशी स्वतःची कैफियत मांडली.

‘जगातील कोणत्याही जाणीवा सर्वप्रथम कवितेत व्यक्त होतात हे महान सत्यही लक्षात घ्यायला हवे… कवितेत मी माझ्याशी संवाद करतो, भांडतो, सांत्वन करतो, स्वतःला मोकळे करतो. आता हे सगळे अवघड आहे, कठीण आहे. मीही कातावतो. पण खरे समाधानही मला इथेच मिळते’, असेही ते आवर्जून म्हणतात. सुर्वे यांचे सर्व जीवन गिरणगावात व कापडाच्या गिरण्यांमध्ये गेले. म्हणूनच तेथील ठोस शब्द त्यांच्या कवितेत दिसून येतात. साहजिकच तेथील प्रतिमाही येथे दिसतात.

या माहितीपटात पडद्यावर कवी सुर्वे साकारला आहे कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांनी. खरे सुर्वे आणि किशोर यांच्यातील संवादाने माहितीपट सुरु होतो व केव्हा किशोर पडद्यावर सुर्वे म्हणून छा.. जातो ते कळतच नाही. तत्कालीन कापडं गिरण्यांचे चित्रण चांगले उतरले आहे. माहितीपट तसा संथच असतो हे मान्य करूनही सध्या 24 सालात आपण आहोत हे मान्य करून त्यात आवश्यक ती भर घालून गती थोडी वाढवण्यास खोपकरांची हरकत नसावी…

छायाचित्रः प्रवीण वराडकर

Continue reading

कुठेकुठे मुंबई आहे हे मतदानानंतरतरी कळावे!

तब्बल सात वर्षानंतर उद्या मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. आता मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत काय होईल, काय नाही यांचे काही अंदाज माध्यमे आणि वर्तमानपत्रांनी वर्तवलेले आहेत. हे अंदाज खरे की खोटे हेही अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे....

अनुभव घ्या एकदा रात्रीच्या ठाण्याचा!

आमचं ठाणे शहर तस निवांत कधीच नसतं. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रींनंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास अक्राळविक्राळ पसरलेले शहर काहीसा मोकळा श्वास घेऊ लागते. तेही काही तासच.. कारण ट्रक्स आणि भले मोठे कंटेनर्स रस्त्यावरून वाहतच असतात! हीच वेळ साधून आज...

पंकजराव, ठाणेकरांना असते शिस्तीचे कायम वावडे!

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व पुणे आदी महापालिकांच्या निवडणुका होणार हे सरकारने जाहीर केल्यापासून जवळजवळ सर्वच माध्यमे तसेच मराठी वर्तमानपत्रे कधी नव्हे ते शहराच्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हे चांगले घडत आहे कारण, राज्याचे राजकारण,...
Skip to content