Friday, November 22, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजदिव्यांग स्पर्धक होणे...

दिव्यांग स्पर्धक होणे असते प्रचंड खर्चाचे!

पूर्वीच्या काळात दिव्यांग म्हणून कुटुंबात जन्म घेणे हे केवळ आई-वडीलच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी एक मानसिक दिव्य असायचे आणि ते पार पाडताना मनाची होणारी घालमेल आणि काही इतरांचे दृष्टीक्षेप मनाला अधिक कोवळेपण देत असतात. दिव्यांग फार लहान असताना त्याला काय जाणवत असेल कुणास ठाऊक.. परंतु वयातील ज्या क्षणी त्याचा संबंध कुटुंब परीघाच्या बाहेरपर्यंत पोहोचतो त्या क्षणापासून त्याची स्वत:ची मानसिक स्थिती बिघडायला सुरुवात होते. अर्थात आई-वडील आणि कुटूंब यांचा भरभक्कम आधार असेल तर त्यावर काही ना काही उपाययोजना केली जाते.

शारीरिक रीतीने दिव्यांग व्यक्तींना आज कृत्रिम अवयवांच्या संशोधनातून खूप फायदा झाला आहे. आजवर न करता येण्यासारखी कामे आता करता येऊ लागली आहेत आणि त्यामुळे पूर्वीसारखे घरातच अडकून पडावे लागत नाही. साधारण समान वय आणि आवडी असलेल्या अशा व्यक्ती एकत्र येतात आणि त्यातून प्रत्येकाला काही ना काही नवा विचार मिळतो. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असाव्यात तसे यापैकी प्रत्येक व्यक्ती ही आपल्या परीने वेगळ्या कुटूंब आणि समाज अवकाशात आजवर राहिलेली असते.

काही संस्था दिव्यांगांच्या स्पर्धा आयोजित करतात आणि ही संधी ‘आपणही बरेच काही करू शकतो’ ही ऊर्मी जागवणारी असते. स्पर्धा ही व्यक्तीमधील कौशल्य आणि चपळता यासाठी असते. सुरुवातीच्या स्पर्धाकाळातून दिव्यांग आपला आत्मविश्वास कमावीत असतो. समाज, शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा वेगवेगळ्या स्तरांवर आता तो आपले कौशल्य पणाला लावीत असतो. कोणत्याही स्पर्धेत स्पर्धकाने आपण पूर्वीपेक्षा किती पुढे आलो आहोत हे स्वत:च तपासायचे असते. मदत सर्वांचीच असली तरी आत्मविश्वास आणि स्पर्धेच्या वेळी एकाग्रता ही अगोदरपासूनच अंगी बाणवून घ्यावी लागते.

दिव्यांग असून स्पर्धात्मक खेळांमध्ये उत्साहाने भाग घेणारे खेळाडू पाहिले की खरोखरच ऊर भरून येतो. आपल्या दिव्यांगत्वावर मात करून घाराबाहेर पाऊल टाकणे आणि तेथून स्पर्धेत भाग घेत असताना आपल्याला आवश्यक ती सायकल किंवा व्हीलचेअर अशी कोणतीही सामग्री सामान्यपणे अतिशय खर्चाची

दिव्यांग

असते. सुरुवातीच्या काळात लागणारी सामग्री सहज उपलब्ध असणारी असू शकते. परंतु स्पर्धेची व्याप्ती जसजशी वाढत जाते तसतशी कौशल्याची गरज वाढत असल्याने साहजिकच सामग्री अधिक गुंतागुंतीची, आर्थिकदृष्ट्या खर्चिक अशी असते.

त्यासोबतच दिव्यांग व्यक्तीला आपली सामग्री आणि मार्गदर्शक यांना घेऊन प्रवास करणे हाही एक खर्चाचा विषय असतो. सामग्री हे यंत्र असते आणि ते कधीही बिघडू शकते. आपला अनुभव सांगताना एक दिव्यांग सायकलपटू म्हणतो की, स्पर्धा सुरु होण्याअगोदर काही दिवस सायकल नादुरुस्त झाली. तिची दुरुस्ती शक्य नाही असे सांगितले गेले. स्पर्धांना अजून वेळ होता. पण नवीन सायकल घेऊन त्यावर सराव करणेही गरजेचे होते. या व्यक्तीला कमरेपासून खाली पक्षाघात झालेला होता आणि हातांमध्ये लवचिकता खूप कमी झालेली होती. नवी सायकल त्यादृष्टीने बनवावी लागणार होती. अगोदरच इतर सामग्रीसाठी प्रचंड रक्कम खर्च केली गेली होती आणि त्यात हा नवा खर्च काही लाखांतला होता.

एक लक्षात घ्यायला हवे की दिव्यांग व्यक्तीला स्पर्धेत उतरायचे असेल आणि त्यातल्यात्यात अशी स्पर्धा राष्ट्रीय अथवा त्यापेक्षा वरच्या पातळीवर असेल तर प्रत्येक सामग्री व्यक्तीच्या विशिष्ट शारीरिक गरजांच्या अनुरूपच तयार करावी लागते. अर्थातच यासाठीचा आर्थिक भार किमान दुप्पट तरी असतोच. २०२० साली केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसले की, दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ४८ देशांमधील ५०० खेळाडू स्पर्धक दारिद्र्यरेषेखालील अथवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबामधून आलेले होते आणि अर्धेअधिक स्पर्धक स्वत:ला आर्थिकदृष्ट्या स्थिर मानत नव्हते.

दिव्यांग व्यक्तींना सातत्याने ‘फिट’ राहण्यासाठी नियमित आरोग्यसेवा घेत राहणे आवश्यक असते आणि ही सेवा कायम त्यांच्यासोबतच असावी लागते. मार्गदर्शक व्यक्तींचे सहकार्य फार महत्त्वाचे आणि तेही कायम मिळवावे लागते. अखेर दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये एखादा स्पर्धक पदक जिंकतो तेव्हा ते श्रेय तो एकटा कधीच घेत नाही, कारण ते श्रेय त्याच्या संपूर्ण चमूचे असते आणि ते मान्य करणे यापेक्षा अधिक श्रेष्ठ काहीच नसते. 

Continue reading

एआय गप्पिष्ट आणि एकाकीपणा..

एकाकीपणा काय असतो हे जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळते असे मानले जाते. मानसशास्त्रज्ञ आणि मनोवैज्ञानिक हे दोघेही शारीरिक आणि मानसिक अशा वेगवेगळ्या प्रकारांनी एकाकीपणाकडे बघतात असे दिसते. एकाकीपणा घालवण्यासाठी सर्वात चांगला मार्ग असतो तो संवादाचा. पण संवादाला किमान दोन...

दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये असते सुरक्षिततेला महत्त्व

सुरक्षित असतील तर कोणतेही खेळ प्रकार आणि त्यांच्या अगदी जागतिक स्तरावरील स्पर्धासुद्धा नावाजल्या जातील. पण दिव्यांग ऑलिम्पिकमधील सुरक्षितता ही काही वेगळ्या अंगाने बघावी लागेल. कारण येथे शरीर अगोदरच एका भयानक संकटातून पार झाले असते आणि जीवन पुन्हा सुरु करीत...

एक चित्र हजार शब्दांचे… 

एक चित्र जे सांगू शकेल ते हजार शब्दही व्यवस्थित सांगू शकणार नाहीत, अशी एक चिनी म्हण आहे आणि ती अनेकदा आपल्या प्रत्ययालासुद्धा येत असते. जे ऐकले त्याचा जेवढा परिणाम होत नाही तितका परिणाम तेच पाहिले तर अधिक होतो हेही...
Skip to content