देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हिमालयीन गिर्यारोहण संस्थेच्या दिव्यांगजन मोहीम चमूने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर असलेल्या किलिमंजारो पर्वतावरील उहुरु शिखरावर 7800 चौरस फूटांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवला.
या चमूने त्यांचा प्रवास बेस कॅम्पपासून सुरू केला आणि 15500 फूट उंचीवरील किबू हट इथे 7 ऑगस्टला पोहोचले. तिथे त्यांनी 7800 चौरस फुटाचा राष्ट्रीय ध्वज जमीनीवर जाळे, दोर आणि खिळ्यांच्या सहाय्याने प्रदर्शित केला.
चमूचं नेतृत्त्व ग्रुप कॅप्टन जय किशन यांनी केलं. दिव्यांग उदयकुमार आणि इतरांचा समावेश असणाऱ्या या चमूने कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान ते किलिमंजारो मोहीम हाती घेतली होती आणि या मोहिमेत पहिल्यांदाच एका दिव्यांग गिर्यारोहकाने कुबड्या वापरून गिर्यारोहणाचा यशस्वी प्रयत्न करत एका ऐतिहासिक यशाची गाथा लिहीली.
हवामानाची स्थिती तसंच सर्व सहभागींची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन, चमूने उहुरू शिखराकडे 8 ऑगस्टला पहाटे तीन वाजता प्रयाण केले. वादळी वातावरणात निसरड्या मार्गावर पर्वतीय भागात 85 अंश सरळ अशी कष्टदायक दहा तासांची चढाई करत त्यांनी दुपारी एक वाजता 5,895 मीटर उंचीवरील उहूरू शिखर गाठले आणि तिथे भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवला. चिकाटी आणि सहकार्य यातून हे साध्य करता आले. भावी दिव्यांग पिढ्यांना स्फूर्ती देणे आणि इतर वंचित युवकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणे हा या ऐतिहासिक मोहिमेमागील उद्देश होता.