Thursday, September 19, 2024
Homeमाय व्हॉईसभारतीय टेनिसचा आधारस्तंभ...

भारतीय टेनिसचा आधारस्तंभ रोहन बोपन्ना!

तब्बल २२ वर्षे भारतीय टेनिसची सेवा करणाऱ्या ४४ वर्षीय बुजूर्ग टेनिसपटू रोहन बोपन्नाने पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतातर्फे आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचे प्रतिनिधित्व केले. वाढते वय आणि युवा खेळाडूंना संधी देण्याच्या दृष्टीकोनातून त्याने आता यापुढे भारतातर्फे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत न खेळण्याची घोषणा केली. त्याच्या या घोषणेमुळे भारतीय टेनिसचा एक आधारस्तंभ कोसळला असेच म्हणावे लागेल. सुरुवातीच्या काळात नरेश कुमार, रामनाथन कृष्णन, शशी मेनन, अमृतराज बंधू, रमेश कृष्णन, लिएंडर पेस, महेश भूपती, सोमदेव बर्मन यांनी आपल्या शानदार खेळाच्या जोरावर भारतीय टेनिसला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांचाच कित्ता रोहनने गिरवला.

मूळचा बेंगळुरूचा असलेल्या रोहनने आपल्या टेनिस कारकिर्दीला काहीशी उशिरा सुरुवात केली. लहानपणी फुटबॉल, हॉकी, टेनिस हे सर्वच खेळ रोहनला आवडायचे. परंतु त्याच्या क्रीडाप्रेमी वडिलांनी त्याला वैयक्तिक खेळावर भर देण्याचा आग्रह केला. तेव्हा मग रोहनने फुटबॉल, हॉकीला गुडबाय करुन टेनिस खेळावर भर देण्याचा निर्णय घेतला. वयाच्या ११व्या वर्षी त्याने या खेळाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीला शालेय स्तरावर आणि नंतर कॉलेजस्तरावर रोहनने टेनिसवर बऱ्यापैकी चमक दाखविली. सर्वांचे लक्ष वेधून घेण्यास रोहनने प्रारंभ केला. त्यानंतर जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि अखिल भारतीय स्पर्धा तो खेळू लागला. सुरुवातीच्या चॅलेंजर टेनिस स्पर्धेत त्यांनी चांगला खेळ करून टेनिसप्रेमींची मने जिंकली.

वयाच्या १९व्या वर्षी रोहनने व्यवसायिक टेनिसपटू होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात घरच्यांची भक्कम साथ रोहनला मिळाली. त्यामुळेच तो पुढे एवढी मोठी झेप घेऊ शकला. भारताचा नामवंत टेनिसपटू महेश भूपतीचे वडिल कृष्णा भूपती यांच्याकडे सुरुवातीच्या काळात रोहनने या खेळाचे धडे गिरवले होते. २००२मध्ये जपानविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. मग त्यानंतर रोहनने मागे वळून बघितलेच नाही. अवघ्या २ वर्षानंतर रोहननला खांद्याच्या दुखापतीने ग्रासले. त्यामुळे ९ महिने तो टेनिसपासून दूर होता. २००६मध्ये या दुखापतीतून सावरत त्याने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले.

एकेरीत आपली कामगिरी फारशी चांगली होत नसल्यामुळे रोहनने नंतर दुहेरीवर भर देण्याचा निर्णय घेतला. त्याचा तो निर्णय चांगलाच फलदायी ठरला. आपल्या शानदार खेळाच्या जोरावर रोहनने जागतिक टेनिस क्रमवारीत २०१०मध्ये दुहेरीत अव्वल १० जोड्यांमध्ये स्थान मिळविले. पाकिस्तानचा टेनिसपटू कुरेशी आणि रोहनची जोडी चांगलीच जमली. या दोघांनी बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांत जेतेपदाला गवसणी घातली. त्यामुळे टेनिस वर्तुळात “इंडो-पाक एक्सप्रेस” या टोपण नावाने ही जोडी प्रसिद्ध झाली. हार्डकोर्टवर रोहनचा खेळ अधिक बहरतो. त्याच कोर्टवर त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक विजेतेपद मिळवली आहेत. जोरदार सर्व्हिस आणि नेटजवळचा अफलातून खेळ हे त्याचे वैशिष्ट्य आहे. तसेच प्रभावी फोरहॅन्ड आणि बॅकहॅन्डचा रोहन खुबीने वापर करतो.

“बॉप्स”, या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या रोहनचा स्वीडनचा महान टेनिसपटू स्टिफन एडबर्ग आदर्श होता. त्याच्यासारखीच कामगिरी आपण करून दाखवायची हे स्वप्न रोहनने लहानपणी बाळगले होते. बेंगळुरूच्या प्रसिद्ध जैन कॉलेजमध्ये त्याचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. प्रतिष्ठेच्या ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेची त्याने ६ वेळा अंतिम फेरी गाठली. २०१७मध्ये फ्रान्सच्या गेंद्रीयालासोबत त्याने फ्रेन्च ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. यंदा वर्षातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत मॅन्थ्यु हेडनच्या साथीत त्याने पुरुष दुहेरी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. या विजयाबरोबरच रोहन, मॅन्थ्युने जागतिक दुहेरी टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली. हे अव्वल स्थान मिळवणारा रोहन जगातील सर्वात वयस्कर खेळाडू तसेच वयाच्या ४४व्या वर्षी ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकणारादेखील रोहन सर्वात बुजूर्ग खेळाडू ठरला.

ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकून रोहनने युवा खेळाडूंना संदेश दिला आहे की, वाढत्या वयाचा खेळावर फारसा परिणाम होत नाही. तुम्ही जर १०० टक्के तंदुरुस्त असाल तर दीर्घकाळ तुम्ही खेळू शकता. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासोबत त्याने २००७च्या होपमन चषक टेनिस स्पर्धेत सुरेख कामगिरी केली. मग रोहनने मिश्र दुहेरीत सानियासोबत काही शानदार विजयांची नोंद केली. त्याने दुहेरीत २६ आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. यंदा मिमाई मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकणारा रोहन सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. आपल्या कारकिर्दीत त्याने ६ मास्टर्स स्पर्धा जिंकल्या. आफो आशियाई स्पर्धेत त्याच्या नावावर २ सुवर्ण पदके आहेत. २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दिविज शरणच्या साथीत दुहेरीचे सुवर्णपदक रोहनने मिळवले होते. २०२३च्या याच स्पर्धेत त्याने ऋतुजा भोसलेसोबत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकवले होते.

मानाच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत रोहनला भारताचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत त्यांनी काही चमकदार विजय भारतासाठी नोंदविले. याच स्पर्धेत २०१०मध्ये ब्राझीलविरुद्ध आणि २०१६मध्ये सर्बियाविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील दोन सर्वोत्तम विजयाची नोंद केली होती. त्याने बेंगळुरू येथे ब्राझीलविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रिकार्डोला पराभूत करून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. सर्बियाविरुद्धदेखील चेन्नई येथे झालेल्या लढतीत बोपन्नाने आणखी एक जबरदस्त विजय मिळवला होता. कर्नाटक सरकारचा एकलव्य पुरस्कार, आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेचा अॅश पुरस्कार, केंद्र सरकारचा अर्जुन, पद्मश्री पुरस्कार रोहनला मिळाला आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने तब्बल ५ मिलियनची कमाई केली. पर्यटनासाठी त्याला इंडोनेशिया देश खूप आवडतो. लाईट म्युझिकचा तो चाहता आहे. साहसी खेळाची त्याला आवड असून गोल्फदेखील तो चांगला खेळतो.

२०१२मध्ये त्याचा प्रेमविवाह सुप्रिया अन्नैयाशी झाला. सुप्रिया फिजिओथेरपिस्ट असून, डिजिटल रायटरदेखील आहे. त्यांना एक लहान मुलगी आहे. कूर्ग येथे त्याच्या वडिलांचे कॉफीचे खूप मळे आहेत. बेंगळुरूमध्ये त्याचे स्वतःचे एक शानदार हॉटेल आहे. आजवर या खेळात रोहनला जे काही मिळाले त्याबाबत तो पूर्ण समाधानी आहे. तब्बल २२ वर्षे विविध टेनिस स्पर्धांत खेळण्याची मला संधी मिळाली आणि भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला हे मी माझे भाग्य समजतो, ही त्याची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. एवढे यश मिळूनदेखील रोहनचे पाय जमिनीवरच आहेत. त्याने खास करून शैक्षणिक क्षेत्रात बऱ्याच संस्थांना मदतीचा हात पुढे केला आहे. चमकदार खेळाचा ठसा रोहनने उमटविला आहे, यात शंका नाही. त्याने केलेल्या भारतीय टेनिसच्या सेवेला तोड नाही. त्यामुळे जेव्हाजेव्हा दिग्गज भारतीय टेनिसपटूंची नावे घेतली जातील त्यामध्ये रोहन बोपन्ना हे नाव नक्कीच असेल.

बोपन्ना

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

आशियात भारतीय हॉकी संघाचाच दरारा!

चीनमध्ये झालेल्या आशिया खंडातील प्रतिष्ठेच्या आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने आपले विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावून आशियात भारतीय हॉकीचाच दरारा असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. या स्पर्धेत भारतीय संघाने गतवेळचे अजिंक्यपद कायम राखताना जेतेपदाला साजेशी कामगिरी करुन...

पॅरालिम्पिक: भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला सलाम

पॅरिस येथे संपन्न झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करुन नवा इतिहास रचला. भारताने या स्पर्धेत प्रथमच ७ सुवर्ण, ९ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण २९ पदके मिळवून पदकतालिकेत १८वा क्रमांक मिळवला. गेल्या टोकियो स्पर्धेत भारताने १९ पदके...

‘जय’ हो!

गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात मैदानात आणि मैदानाबाहेर भारताचा दबदबा राहिला आहे. भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेक शानदार विजय मिळवून स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्येदेखील महत्त्वाच्या पदावर अनेक भारतीयांनी स्थान...
error: Content is protected !!
Skip to content