नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या ४६व्या अधिवेशनात मध्य प्रदेश पर्यटनाने सहभाग घेतला आहे. या बैठकीला १९५ देशांचे २०००हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाच्या प्रदर्शनात मध्य प्रदेशचा वैविध्यपूर्ण आणि अनोखा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जगासमोर मांडण्यात आला आहे.
११ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नव्या स्थळांची यादी, अस्तित्त्वात असलेल्या १२४ जागतिक वारसा स्थळांच्या संवर्धन अहवालाची स्थिती, आंतरराष्ट्रीय मदत आणि जागतिक वारसा निधीचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि सांस्कृतिक, पर्यटन, धार्मिक ट्रस्ट आणि धर्मादाय विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) धर्मेंद्र सिंह लोधी यांनी प्रदर्शनाला भेट दिली.
मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि संस्कृती विभागाचे प्रधान सचिव तसेच पर्यटन मंडळाचे प्रधान सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक शिवशेखर शुक्ला म्हणाले की, जागतिक वारसा समिती जागतिक वारशाशी संबंधित सर्व बाबींचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार आहे. देशात प्रथमच होत असलेल्या समितीच्या बैठकीत मध्य प्रदेशने आपला पर्यटन आणि सांस्कृतिक वारसाही जगासमोर मांडला आहे. आपल्या सांस्कृतिक, नैसर्गिक वारशाचे जतन करणे आणि सहकार्य वाढविण्याबाबत जगभरातील तज्ञ आणि मुत्सद्दी यांच्याशी चर्चा केली जाईल. राज्यातील ११ संभाव्य वारसास्थळांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
मध्य प्रदेशचे विशेष अधिवेशन २४ जुलैला
दरम्यान, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स (एनआययूए) आणि एएसआय यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य प्रदेश २४ जुलै रोजी अर्बन हेरिटेज आणि एचयूएलच्या शिफारशींवर लक्ष केंद्रित करणारे विशेष सत्र आयोजित करीत आहे. ऐतिहासिक अर्बन लँडस्केप (एचयूएल) या पथदर्शी प्रकल्पांतर्गत ओरछा आणि ग्वाल्हेरची निवड करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्य सरकार या दोन शहरांच्या व्यवस्थापन आराखड्यावर सक्रीयपणे लक्ष केंद्रित करत आहे. २४ जुलैला होणाऱ्या अधिवेशनाच्या माध्यमातून मध्य प्रदेशला एचयूएलच्या शिफारशीनुसार नागरी वारसा व्यवस्थापनातील आव्हाने आणि यश तसेच धोरणांवर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.
मध्य प्रदेश राज्याचा युनेस्को वारसा
खजुराहो, भीमबेटका लेणी आणि सांची स्तूप या मंदिरांचा समूह युनेस्कोची जागतिक वारसास्थळे आहेत. युनेस्कोच्या संभाव्य यादीत ग्वाल्हेर किल्ला, बुऱ्हाणपूरचा खूनी भंडारा, चंबल खोऱ्यातील रॉक आर्ट साइट्स, भोजपूरचे भोजेश्वर महादेव मंदिर, मंडला येथील रामनगरची गोंड स्मारके, धामनारचा ऐतिहासिक समूह, मांडूतील स्मारकांचा समूह, ओरछाचा ऐतिहासिक समूह, नर्मदा खोऱ्यातील भेडाघाट-लामेटाघाट, सातपुडा व्याघ्र प्रकल्प, चंदेरी भारताचा प्रतिष्ठित साडी विणकाम समूह यांचा समावेश आहे.