राजकारण्यांबद्दल आम जनतेला काहीही वाटत असो. पण विधिमंडळात बोलताना या सर्व सदस्यांना मात्र खूपच भान बाळगावे लागते. विधान परिषदेत आपण वापरलेल्या शब्दांबद्दल आपल्याला अजिबात पश्चात्ताप वाटत नाही, असे सांगत शिवसैनिकांची भाषा आपण सभागृहात बोललो ते आपल्या स्थानापासून दूर जात… असा खुलासा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कालच, सोमवारी केला होता. पण, आज मंगळवारी एखाद्याला लाज वाटतेय का, असा प्रश्न विचारल्यास हा शब्दप्रयोग असंसदीय असल्याचे रूलिंग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी दिला.
लाज वाटणे म्हणजे नेमके काय, शरम वाटणे म्हणजे नेमके काय.. आपल्याकडून चुकीचे वर्तन झाल्यास एखाद्या व्यक्तीला लाज वाटते किंवा शरम वाटते. भले ती व्यक्त होवो वा न होवो… पण सरकारकडून असे काही झाले तर लाज वाटते का किंवा शरम वाटते का… वाटो वा न वाटो पण सरकारला लाज वाटते का, असा शब्दप्रयोग करणे राज्याच्या विधानसभेने यापूर्वीच असंसदीय ठरवलेले आहे. थोडक्यात सरकारला लाज वाटते का किंवा विरोधकांना लाज वाटते का, असे विचारणे म्हणजे असंसदीय भाषा वापरणे आहे. सरकारला या गोष्टीची लाज वाटते का किंवा लाट वाटत नाही का, अशा प्रकारचा शब्दप्रयोग कामकाजातून काढून टाकण्यात येत आहे, असे निर्देशही नार्वेकर यांनी दिले.
महाराष्ट्राला जोडणाऱ्या लाल परीची म्हणजेच एसटीची रडकथा आज विधानसभेत मांडली गेली आणि सर्वपक्षीय सदस्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. आमदार कृष्णा गजबे, बंटी भांगडिया, सुभाष देशमुख, रणधीर सावरकर आदी आमदारांनी हा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. मंत्री दादा भुसे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांबद्दल स्थापित समितीच्या दोन बैठका झाल्या असून लवकरात लवकर समितीचा अहवाल घेऊन हे प्रश्न सोडवले जातील, असे सांगितले.
फेब्रुवारीमधे एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने दोन आठवडे उपोषण केले होते. आणि त्यावेळी उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेनंतर संघटनेने उपोषण मागे घेतले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार दहा तारखेच्या आत दिले जातात, असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. तसेच, बाकीच्या विषयांबद्दल समितीचा अहवाल प्राप्त करून घेऊन कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रश्न विचारत सरकारला लाज कशी वाटत नाही आणि सरकार असत्य सांगत असेल तर कुणाच्या मुस्काडित मारायची, असा प्रश्न विचारला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही सदस्यांनी किंवा मंत्र्यांनीही असंसदीय शब्द वापरला तर तो कामकाजातून काढला जाईल. त्यानुसार नार्वेकर यांनी लाज वाटत असेल तर हा शब्दप्रयोग असंसदीय असल्याचा निवाडा विधानसभेत यापर्वी दिला गेला असल्याचे निदर्शनास आणून बच्चू कडू तसेच दादा भुसे यांनी वापरलेले हे शब्द कामकाजातून काढून टाकत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, एसटीच्या वाहक आणि चालक यांना ३८ हजार रुपये सरासरी पगार मिळतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे यांना देणार पोलीस संरक्षण
आंतरवली सराटी या गावातील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत जाहीर केले. आंतरवली सराटी या गावामध्ये द्रोणद्वारे टेहळणी केली जात आहे, याकडे लक्ष वेधून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. त्यानंतर देसाई यांनी हा निर्णय जाहीर केला.
विश्वचषकविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन
ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे महाराष्ट्र विधानसभेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करणारा ठराव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवला आणि संपूर्ण सभागृहाने एकमताने या संघाचे अभिनंदन करत असल्याचा ठराव मंजूर केले.