वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार सरींमुळे काल मुंबईतल्या पवईच्या विद्युत केंद्रात झालेल्या बिघाडामुळे आज कुर्ला तसेच भांडुप परिसरातल्या काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे काल, सोमवारी सायंकाळी ५ वाजता पवईमधल्या २२ केव्ही विद्युत उपकेंद्राचे नुकसान झाले. त्यामुळे पवई उदंचन केंद्राला होणारा विद्युत पुरवठादेखील खंडित झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या एल आणि एस विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. विद्युत उपकेंद्राची दुरूस्ती व पवई उदंचन केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर या दोन्ही विभागात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
या बेमोसमी पावसामुळे पवई परिसरातील विद्युत उपकेंद्रातील अनेक उपकरणांमध्ये बिघाड झाला. अनेक ठिकाणच्या वीजवाहिन्याही तुटल्या असून, अनेक महत्त्वाच्या उपकरणांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या दुरूस्तीचे काल अंधारातही चालू होते. मात्र, अंधारामुळे दुरुस्तीच्या कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे एस विभागातील मोरारजी नगर, जय भीम नगर, पासपोली गावठाण, लोकविहार सोसायटी, रेनेसेन्स हॉटेल परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. तर महात्मा फुले नगरच्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
एल विभागात काजूपाडा, गणेश मैदान, इंदिरानगर, संगम सोसायटी, शास्त्रीनगर, गॅस कंपाउंड, ख्रिश्चन गाव, मसरानी लेन, गाजी दर्गा रोड, ए. एच. वाडिया मार्ग,वाडिया इस्टेट, एम. एन रोड बैल बाजार, संदेश नगर, क्रांती नगर, एल.बी.एस.कमानी, कल्पना टॉकीज, किस्मत नगर, गफूर खान इस्टेट, संभाजी चौक, न्यू मिल रोड, रामदास चौक, ईगलवाडी, आण्णासागर मार्ग, ब्राह्मण वाडी, पटेल वाडी, एस जी बर्वे मार्ग, बुद्ध कॉलनी, न्यू मिल रोड मार्ग विनोबा भावे मार्ग, नावपडा, प्रमियर रसिडेन्स,सुंदरबाग,शिव टेकडी संजय नगर,कपाडिया नगर, रूपा नगर, न्यू मिल रोड, ताकिया वॉर्ड, मॅच फॅक्टरी लेन, शिवाजी कुटीर लेन, टॅक्सीमन कॉलनी, इंदिरा नगर, महाराष्ट्र काटा, एल. बी. एस रोड, चाफे गल्ली, चुनाभट्टी, सेवक नगर, विजय नगर आणि जरी मरी माता मंदिर परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबई महापालिकेकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत वरील परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्ती झाल्यावर पवई उच्च स्तरीय जलाशय क्रंमांक कप्पा क्रमांक २ भरून पाणीपुरवठा हळूहळू सुरळीत करण्यात येईल. अचानक उद्भवलेल्या या अडचणींमुळे पाणीपुरवठा होऊ न शकल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.