लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडून महत्त्व दिले जात नसल्याची तक्रार करत महाविकास आघाडीकडून समर्थन मिळविण्याच्या प्रयत्नात असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर अखेर महायुतीतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून रासपला एक जागा सोडली जाणार आहे.
आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा, या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदींच्या बैठकीत महादेव जानकर यांची समजूत काढण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले. त्यानंतर माध्यमांसमोर येत तटकरे आणि जानकर यांनी रासप महायुतीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
महादेव जानकर महायुतीसोबत राहणार आहेत, असे त्यांनी आमच्याकडे स्पष्ट केले आहे. आम्ही सविस्तरपणे विविध विषयांवर चर्चा केली. महायुतीकडून लोकसभेची एक जागा जानकर यांना दिली जाणार आहे, असे तटकरे म्हणाले. आम्ही जागावाटप जाहीर करू तेव्हाच त्यांना कोणती जागा दिली जाणार हे स्पष्ट होईल. जानकर यांच्या निर्णयामुळे महायुती बळकट होण्यात आम्हाला सहकार्य होईल. राज्यात आम्ही 45 प्लसचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग आणि योगदान राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपण महायुतीत होता आणि महायुतीतच राहणार आहोत. महायुतीच्या नेत्यांचे जागावाटपाबाबतचे घोंगडे पडून होते. त्यामुळे आपण इकडेतिकडे जात चाचपणी करत होतो, असे जानकर यांनी माध्यमांना सांगितले.

