पुरूषांइतक्याच सक्षम असूनही आपल्या कार्यक्षेत्रात स्त्रिया अकारण दुय्यम भूमिका स्वीकारताना दिसतात याबद्दल विलेपार्ले पोलीसठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक रेणुका बुवा यांनी नुकतीच खंत व्यक्त केली.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रमा प्रकाशनाने मुंबईतल्या विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजिलेल्या आदिशक्ति अक्षरशक्ति, या संगीतमय स्री सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुण्या डॉ. रूपा रेगे नित्सुरे यांच्या हस्ते यंदाचा “आदिशक्ति अक्षरशक्ति” पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात रेणुका बुवा बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी महिलांना आपल्या हक्कांबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.
त्याआधी डॉ. रेगे नित्सुरे यांनी त्यांच्या भाषणात स्री-पुरूष विषमतेची दरी विलक्षण रूंद होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, १३५ वर्षांपूर्वी सर्वप्रथम महिलांना मतदानाचा हक्क देण्यात आला तो न्यूझीलंडमध्ये. त्याचवेळी महाराष्ट्रात मुलगे आणि मुली यांना एकत्र शिक्षण देण्यात यावे, घरगुती कामात पुरुषांचा समान सहभाग असला पाहिजे असा आग्रह आगरकरांसारखे सुधारक धरत होते. पण अजूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही. या संदर्भातील सांख्यिकी भयानक वास्तव दर्शविते. स्री पुरुषातील दरी दाखविणाऱ्या निर्देशांकात १४२ देशांत भारत १२७व्या क्रमांकावर आहे.
डॉ. रेगे नित्सुरे यांनी याप्रसंगी सुप्रसिद्ध नेत्र शल्यविशारद डॉ. चारुता नितू मांडके यांनाही आदिशक्ति अक्षरशक्ति -२०२४ पुरस्काराने सन्मानित केले. आमदार पराग अळवणी यांनी सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका, चित्रकार डॉ. मीनाक्षी पाटील यांना या पुरस्काराने गौरविले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे उपमुख्य अभियंता रामाभाऊ उर्फ आर. बी. मिटकर यांच्या हस्ते समाजसेविका रेखाताई डोंबाळे आणि प्रसूती समूपदेशक सीमा काझी रांगणेकर यांना यंदाचा आदिशक्ति अक्षरशक्ति पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सुप्रसिध्द अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला तेव्हा श्रोत्यांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. अंधेरीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवेक वाघ यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला.
प्रारंभी रमा प्रकाशनचे संचालक प्रकाश कुलकर्णी यांनी महिला दिन सोहळा आयोजिण्यामागील भूमिका स्पष्ट केली. रसिक श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. मिती क्रियेशन्सच्या उत्तरा मोने यांनी निर्मिलेल्या या संगीत सोहळ्यात मंदार आपटे, नचिकेत देसाई, माधुरी करमरकर आणि स्वरा जोशी यांनी बहारदार गीते सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. अभिनेत्री अनुश्री फडणीस देशपांडे हिच्या कल्पक आणि सुंदर सूत्रसंचालनाला श्रोते सातत्याने टाळ्यांच्या कडकडाटात वन्स मोअरची दाद देत होते.