केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) क्रीडा विभागाच्या सहकार्याने खेळाडूंसाठी भर्ती, पदोन्नती आणि प्रोत्साहन अशा चौकटीतील नियमांमध्ये सर्वसमावेशक सुधारणा केल्या असून 4 मार्चला सुधारित मार्गदर्शक सूचना जारी झाल्या आहेत. यानुसार आता खेलो इंडिया पदक विजेते खेळाडू सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र असतील, असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी जाहीर केले आहे.
वाढीव सवलती, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता आणणे हे या सुधारित नियमावलीचे उद्दिष्ट आहे. क्रीडा परिसंस्थेची मशागत, तळागाळातील गुणवत्तेची जोपासना आणि खेळांचे रूपांतर एका व्यवहार्य कारकीर्दीत करणे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला धरुन आता खेलो इंडियाचे खेळाडू शासकीय नोकऱ्यांसाठी पात्र ठरतील. डीओपीटीने इंडिया स्पोर्टसच्या सल्लामसलतीने शासकीय नोकऱ्या करण्यासाठी उत्सुक खेळाडूंसाठीच्या पात्रतेच्या निकषांमध्ये प्रागतिक सुधारणा घडवून आणल्या आहेत, असे ते म्हणाले.
खेलो इंडिया – युवा, विद्यापीठ, पॅरा आणि हिवाळी स्पर्धांसाठीही आता हे पात्रता निकष लागू होतील. त्यातबरोबर खेळ आणि क्रीडा स्पर्धांसाठीच्या या निकषात आता विविध क्रीडा प्रकारांचाही समावेश केला आहे. सुधारित नियमांनुसार, खेलो इंडिया युथ गेम्स (१८ आणि त्याहून अधिक वयोगटातील सहभागींसाठी), खेलो इंडिया हिवाळी गेम्स, खेलो इंडिया पॅरा गेम्स आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स यासारख्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आता सरकारी नोकरीच्या संधींसाठी पात्र ठरतील. शिवाय, भारतीय शालेय खेळ महासंघामध्ये यश मिळवणारेदेखील अशा पदांसाठी पात्र ठरू शकतील.
महत्त्वाच्या वाटचालीत, खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेला इतर प्रतिष्ठित स्पर्धा आणि स्पर्धांच्या श्रेणीत सामील केल्यामुळे या सुधारणा एक मैलाचा दगड ठरतील. भारताला क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवण्यासाठी खेळाडूंना मदत करण्यासाठी हे सुधारित नियम महत्त्वपूर्ण असल्याचे ठाकूर म्हणाले.