राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काल राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार, 10 जून 2024 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.
विधानपरिषदेत प्रत्यक्षात 27 तास 32 मिनिटे कामकाज
विधानपरिषदेत प्रत्यक्षात 27 तास 32 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 5 तास 30 मिनिटे झाले. या अधिवेशनात सभागृहात सदस्यांची जास्तीतजास्त उपस्थिती 96.36 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती 77.82 टक्के इतकी होती.
विधानपरिषदेत 1 विधेयक पुनर्स्थापित करण्यात आले आणि ते संमत करण्यात आले. विधानसभेने संमत केलेली 6 विधेयके विधानपरिषदेत संमत करण्यात आली. तर 2 विधेयके शिफारशींशिवाय विधानसभेकडे परत पाठविण्यात आली. सभागृहात नियम 97अन्वये एकूण प्राप्त सूचना 1 सूचना मान्य करण्यात येऊन त्यावर चर्चा झाली, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
विधानसभेत प्रत्यक्षात 28 तास 32 मिनिटे कामकाज
विधानसभेत प्रत्यक्षात 28 तास 32 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 5 तास 42 मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीतजास्त उपस्थिती 91.44 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 73.15 टक्के इतकी होती.
विधानसभेत पुनर्स्थापित 9 शासकीय विधेयके मांडण्यात आली असून सर्व विधेयके संमत झाली. विधानपरिषदेने संमत केलेले 1 विधेयक विधानसभेत संमत करण्यात आले. तसेच सभागृहात नियम 293अन्वये एकूण प्राप्त सूचना 2 असून दोन्ही सूचना मान्य करण्यात आल्या. मान्य केलेल्या 2 सूचनांवर चर्चा झाली, अशी माहिती अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी दिली.