पोलिसांची ढाल पुढे करत शिवसेना गुंडागिरी, दहशत, मारहाणीचा प्रयत्न करत आहे. हे निंदनीय असून सत्तेचे कवच घेत अशाप्रकारची गुंडगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ पक्षाचे प्रमुख नसून आता राज्याचेही प्रमुख आहे. त्यामुळे सरकार आमचे आहे, वाट्टेल ती दादागिरी करू, असे प्रकार जर कोण करणार असेल तर भारतीय जनता पार्टी हे खपवून घेणार नसल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.
शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात भाजपावर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपा युवा मोर्चाकडून आज शिवसेना भवन येथे विरोध प्रदर्शन करण्यात आले. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथे जमले. यावेळी भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसून आले. या वादात मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी दरेकर माहिम पोलीसठाण्यात दाखल झाले. जर पोलिसांकडून दोषींवर गुन्हा दाखल झाला नाही आणि राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याला शिवसेना जबाबदार राहील असा इशारा दरेकर यांनी दिला.
आम्हाला मुंबई पोलिसांना दोष द्यायचा नाही. मुंबई पोलीस सक्षम आहे. तथापि सेनाभवनापासून काही अंतरावर भाजपा आंदोलकांवर हल्ला होत होता. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली नाही का? पोलिसांनी या सर्व गोष्टी नियंत्रणात आणणे आवश्यक होते. पोलीस घटनास्थळी असतानादेखील पोलिसांसमोर मोठ्या प्रमाणावर हमरीतुमरी, मारहाण होणार असेल तर शेवटी पोलिसांवर उलटसुलट प्रतिक्रिया येणारच. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात शिवसेनेची गुंडगिरी सुरू होती. लोकशाहीमध्ये आपल्या हक्कांसाठी आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. अॅक्शनला रिअॅक्शन द्यायची आहे तर शांततेने द्या. अॅक्शनला हाणामारीने उत्तर मिळणार असेल तर उद्या जी परिस्थिती उद्भवेल त्याला पोलीस आणि मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी यांनी दिला.
राम मंदिर हिंदुत्वाच्या श्रद्धेचा विषय आहे. हिंदुत्वाच्या आड याल तर भाजपा आंदोलनाची भूमिका घेईल. अशाप्रकारची भूमिका घेतली म्हणून वेगळ्या प्रकारचे चित्र उभे करत आंदोलकांवर मारहाण करणे हे लोकशाहीला शोभा देणारे नाही. सेनाभवनाकडे वाकड्या नजरेने बघायचे भाजपाचे काही कारण नाही. 25–30 वर्षे भाजपा शिवसेना एकत्रित राहिली आहे. शिवसेनेवर हल्ला करण्याचा कोणताही हेतू भाजपाचा नव्हता. परंतु हल्ला झाल्याचे चित्र रंगवण्याचे काम शिवसेनेकडून केले जात आहे. शिवीगाळ करणे, हिंसक वागणे भाजपाच्या प्रवृत्तीत नाही. आपण चूक करून भाजपावर आरोप करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांसोबत जी असभ्य वर्तणूक केली गेली ती अत्यंत घृणास्पद होती. याचा एफआयआरमध्ये अंतर्भाव केला नाही तर वेळप्रसंगी आम्ही कोर्टात जाऊ, असेही ते म्हणाले.

