युवकांच्या उर्जेला सकारात्मकतेचा मार्ग दाखवून युवा विकास आणि देशाच्या प्रगतीच्या नव्या युगाची सुरुवात केल्याबद्दल, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) काल प्रशंसा केली. एनसीसी कॅडेट्स हे भारताच्या उदयाचे महत्त्वाचे भागीदार असून, देशाच्या युवकांपुढील आदर्श आहेत, असे ते म्हणाले.

नवी दिल्ली येथे एनसीसी प्रजासत्ताकदिन शिबिर-2024च्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, धनखड यांनी कॅडेट्सची ऊर्जा चिरंतन आणि चिरस्थायी आहे, हे अधोरेखित करत आपल्या एनसीसी कॅडेट असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. कॅडेट्सनी आपल्या प्रतिष्ठेचा सर्वोत्तम दर्जा कायम राखावा. भारताला 2047पर्यंत खऱ्या अर्थाने विकसित देश आणि विश्व गुरू करण्यासाठी उत्साह, शौर्य आणि समर्पित भावनेने काम करावे. शिस्त आणि देशभक्ती हे गुण तुमच्या हृदयात सदैव वसत राहायला हवेत, हीच आपल्या मातृभूमीला सर्वात मोठी आदरांजली आहे, असे ते म्हणाले.

एनसीसी, राष्ट्रीय जागरूकता मोहिमांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तुमचा नैसर्गिक विकास सुनिश्चित करते. एनसीसीमधील महिलांच्या वाढत्या सहभागाची प्रशंसा करत धनखड म्हणाले की, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी, महिला छात्र दोन विशेष तुकड्यांमध्ये महिला बँड पथकांसह कर्तव्य पथावर अभिमानाने संचलन करतील.

