भारताला धोरणात्मक अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकार देशांतर्गत संरक्षण औद्योगिक परिसंस्थेचा मजबूत पाया विकसित करत आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तेजपूर येथे 31 डिसेंबर 2023 रोजी तेजपूर विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संबोधित करत होते. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने केलेल्या विविध उपायांचा उल्लेख करून राजनाथ सिंह यांनी पहिल्यांदाच शस्त्रांच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आल्याचे सांगितले. आम्ही पाच सकारात्मक स्वदेशीकरण याद्या जारी केल्या, ज्या अंतर्गत 509 संरक्षण उपकरणे निश्चित केली गेली असून आता त्याचे उत्पादन स्वदेशी पद्धतीने केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण विषयक उपक्रमांच्या 4 सकारात्मक स्वदेशीकरण याद्या देखील जारी केल्या आहेत. या याद्यांमध्ये 4,666 वस्तू निश्चित करण्यात आल्या असून आता त्या आपल्या देशातच तयार केल्या जातील, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सध्याच्या सरकारचा सक्रिय दृष्टिकोन विशद केला. या सक्रिय दृष्टिकोनामुळे विश्वासार्हतेबाबतच्या शंकाकुशंकांची जागा विश्वासाच्या संस्कृतीने घेतली आहे, असे ते म्हणाले. “असेच राहू द्या” हा दृष्टिकोन भारत आता सहन करणार नाही. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली, नवा भारत “चला-करूया” या दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो, असे राजनाथ सिंह म्हणाले.

