शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे आणि मोठ्या इव्हेंटमध्ये गुंतून राहणं हा गेल्या तीन चार महिन्यांपासूनचा राज्य सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. सरकारला आणखी एक इंजिन जोडल्याने लोकांना वाटलं की, ट्रिपल इंजिन सरकार अधिक वेगवान होईल. पण ट्रिपल इंजिनऐवजी या सरकारमध्ये ट्रबल वाढला असे आम्हाला वाटते. त्यामुळे हे सरकार ट्रिपल इंजिन नसून ट्रबल इंजिन आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनदरम्यान आज विधानसभेत राज्यातील शेतकऱ्यांचा मुद्दा प्रचंड गाजला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
गेल्या आठ महिने झाले राज्यात भयंकर दुष्काळ आहे. नदीनाले, विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. अशा परिस्थितीत सबंध राज्यभरात दुष्काळ जाहीर करून शेतकरीवर्गाला दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने करायला पाहिजे होते. पण अर्धवट दुष्काळ जाहीर करून या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे. आजही अशी अनेक गावं आहेत ज्या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे, जनावरांना चारा नाही, शेतीला पाणी नाही, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पण सरकारचे त्या गावांकडे लक्ष गेले नाही. सरकारकडून अशी सावत्र वागणूक कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कालपरवा राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसानं ३ लाख ९३ हजाराहून अधिक हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालं आहे. सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झालं असून तिथं सव्वालाख हेक्टर पेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालं. त्यानंतर हिंगोली, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, जालना जिल्ह्यात शेतीच्या १० हजार हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं आहे. राज्यातल्या एकूण २२ जिल्ह्यांमधल्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यात प्रामुख्यानं तूर, हरभरा, कापूस, गहू, भाजीपाला, फळपीकांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचं इतकं मोठं नुकसान झालं तरी सरकार अजून पूर्णपणे ग्राऊंडवर उतरलेच नाही. सरकारने आतापर्यंत पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत वाटायला सुरुवात करायला पाहिजे होती. पण राज्य सरकारकडे अजून आकडेवारीच नाही, म्हणून कुणाला किती मदत द्यायची हे सरकारला कळत नाही, सेही जयंत पाटील म्हणाले.
पिकविमा हा शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे. सरकारने पुढाकार घेऊन सांगितले की तुम्ही एक रुपया भरा बाकीचे सर्व प्रिमियम आम्ही भरू. शेतकऱ्यांना बरे वाटले पण आता ‘तू एक रुपया भरला, तुला आम्ही कशाला परतावा देऊ’ ही पिकविमा कंपन्यांची शेतकऱ्यांकडे पाहण्याची दृष्टी आहे. शेतकऱ्यांच्या नावाने सरकारने हजारो कोटी रुपये पिकविम्याचे प्रिमियम भरले आहे. या पिकविमा कंपन्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची लुबाडणूक केली आहे. शेतकऱ्यांनी प्रिमियम भरूनदेखील त्यांना परतावा मिळाला नाही. अनेक भागात एक रुपया दोन रुपये अशी पिकविमा रक्कम मिळाली आहे. कृषी मंत्र्यांनी घोषणा केली होती की दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याची अग्रीम रक्कम मिळून जाईल. पण शेतकऱ्यांना अग्रीम मिळाली नाही. सर्वांची दिवाळी चांगली झाली. शेतकरी मात्र तसाच राहीला, असेही त्यांनी सांगितले.

