Friday, September 20, 2024
Homeडेली पल्सनिरोगी आयुष्यासाठी पर्यावरण...

निरोगी आयुष्यासाठी पर्यावरण संतूलन महत्त्वाचे!

कोविड व म्युकरमायकोसिस आजारांबरोबरच राज्यभरात सर्वत्र उष्णतेची लाट पसरलेली आहे. निसर्गाची अपरिमित व न भरून येणारी हानी, वृक्षतोड, शहरे व ग्रामीण भागांचे आसुरी काँक्रिटीकरण, नष्ट होत चाललेले जलसाठे व ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम ही कारणे वाढलेल्या उष्णतेला देता येतील. अनियमित ऋतूचक्र व लुप्त होत चाललेला निसर्ग यामुळे वातावरणात झपाट्याने बदल घडत असून त्याचा विपरीत परिणाम पर्यावरण, मानवी जनजीवनावर तसेच आरोग्यावर होताना दिसत आहे.

राज्यात वाढलेली गर्मी आज आबालवृद्ध, महिला, प्राणी, पक्षी या सर्वच घटकांना त्रासदायक ठरत असून त्यावर मात करण्यासाठी पर्यावरण संतुलन राखण्याचे मोठे आव्हान आज आपणा सर्वांसमोर आहे. सध्या सर्वत्र पसरलेला वाहनांचा भस्मासूर व त्यामुळे होत असलेले प्रदूषण याचा विचार केला तर या वाहनांवर कुठेतरी नियंत्रण आणले पाहिजे असे आपणा सर्वांनाच वाटत असते. मात्र त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्‍न केले पाहिजेत.

आरोग्याचा व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी पुण्यातील सुनील कुकडे यांनी पुणे ते विषाखापट्टणमपर्यंतचा 1355 किलोमीटरचा सायकलव्‍दारे केलेला प्रवास काबिलेतारीफच आहे. दररोज 200 किलोमीटर सायकलिंग करून त्यांनी हा प्रवास एकट्याने 70 तासांमध्ये पूर्ण केला. मॅरेथॉनपट्टू असलेल्या कुकडे यांनी आपल्या ह्या उपक्रमातून आरोग्य उत्तम राखण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी सायकलिंगचे महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी, त्यात इंधनाचा अपव्यय, प्रदूषण व त्यामुळे धोक्यात आलेले लोकांचे आरोग्य या सर्वांवर सायकल प्रवास हा उत्तम पर्याय असून प्रदूषणमुक्‍त वाहतुकीच्‍या दिशेने ठोस पावले उचलण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्‍हणून साजरा केला जातो. खरेतर दिनाबाबत अनेकांच्या मनात संदिग्धता व संभ्रमावस्था आहे. नेमका कशासाठी हा दिन साजरा केला जातो हा अनेकांच्या मनातील सरळ प्रश्न. खरे तर याला ‘पर्यावरण दिन’ म्हणण्यापेक्षा ‘पर्यावरण संवर्धन दिन’ असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. पर्यावरणाचे संवर्धन करणे ही  काळाची गरज व आपणा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. निसर्गाचा नको तितका, अपरिमित ऱ्हास झाल्याने आज आपल्याला अनेक निसर्ग व मानवनिर्मित संकटाना सामोरे जावे लागत आहे.

दोन वर्षांपूर्वी मांडलेली ‘ग्लोबल वॉर्मिंग’ ही संकल्पना व त्याचा मानव जातीवर होणारा विपरीत परिणाम आज आपल्याला असह्य करणाऱ्या उन्हाच्या काहिलीने दिसून येत आहे. वनसंपत्ती व वन्यजाती नष्ट होत आहेत. वृक्षतोड व सिमेंटच्या जंगलाने अक्षरशः थैमान घातले आहे. पर्यावरण संवर्धनाची संकल्पनाच या जगातून नष्ट होऊ पाहत आहे. केवळ दैनंदिन गरजा भागविण्यात व विलासी जीवनात व्यस्त झालेल्याना भौतिक सुखाशिवायदेखील जग अस्तित्त्वात असते याची जाणीवच राहिलेली नाही. मोजके पर्यावरणवादी निसर्ग रक्षणासाठी करत असलेले प्रयत्न वाढत असलेल्या शहरिकरणामध्ये लुप्त होत आहेत.

खरेतर हे सर्व खूप भयानक व भावी पिढ्याना उद्ध्वस्त करणारे आहे. यामुळे निसर्गनियम व पर्यावरणसंस्था मोडीत निघाल्या आहेत. ऋतूचक्र हे बेभरवशी व मानवी व्यवस्था कोलमडवणारे झालेले आहे. एकंदरीत पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळलेला असून याचा सर्वात मोठा फटका मानव व वन्यजीवांना सहन करावा लागत आहे. परन्तु याला जबाबदार घटक व निसर्गचक्र पुन्हा सुरळीत करण्यासाठीच्या पर्यायांची पडताळणी करण्याची आज खरी गरज निर्माण झालेली आहे.

पर्यावरण

बेसुमार वृक्षतोड, नैसर्गिक संपत्तीची मानवनिर्मित हानी, वाढते प्रदूषण, निसर्गसंपत्तीपेक्षा इंधसंप्पतीची वाढ, औद्योगिकरण, शहरीकरण यामुळे निसर्ग नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी माणसापेक्षा अधिक जबाबदार कोण असू शकतो? मानवी ‘कर्तबगारीने’ विकासाचा इतका मोठा टप्पा गाठला आहे की पर्यावरण रक्षणाचा मुद्दाच त्याच्या ‘सामंजस्य करारातून’ वगळला गेला आहे. जगण्याच्या संघर्षातून निर्माण झालेली प्रेरणा व त्यामुळे वैज्ञानिक जगात होत असलेले नानाविध प्रयोग यामधून निसर्ग मात्र दिसेनासा झालेला आहे.

पर्यावरण व्यवस्थेमध्ये वृक्ष, वन्यजीव, पक्षी, प्राणी, जलस्रोत या सर्वांचा समावेश होतो. पण आजकाल यातील एकही घटक सहजासहजी दृष्टीपथात पडत नाही ही वस्तुस्थिती आहे. वृक्षसंवर्धनासाठी, वन्यजीव संवर्धनासाठी अभियाने राबवावी लागत आहेत. या उपक्रमांसाठी जनजागृती व व्यापक प्रसिद्धी देऊनही परिणामकारकता मात्र म्हणावी तशी दिसून येत नाही. वृक्षलागवड तसेच अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा प्रभावी वापर यावर निश्चितच उपाय ठरू शकतो. सामाजिक प्रबोधन व दृढ ईच्छाशक्ती निर्माण करण्याची नितांत गरज आहे. समाजाला आवश्यक सोयीसुविधा प्रदान करत असताना पर्यावरण संतुलनासाठी काही नियम, प्रत्येक सुविधेबरोबर आखून द्यावे लागतील. बायोमेडिकॅल वेस्ट माँनेजमेंट, सोलर उपकरणे, शोष खड्डे, वृक्ष लागवड यासारखे उपक्रम गृहसंकुलाना बंधनकारक करावे लागतील.

वाढत्या कारखानदारीमुळे व बांधकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून दमा, कावीळ, श्वसनाचे आजार, विषमज्वर, पटकी, मानसिक असंतुलन यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. प्रदूषणामुळे पशुपक्षी, वनचर, जलचर, वनस्पती यांचीही मोठी हानी होत असून त्यांची संख्या रोडावल्याचे दिसून येत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासनाचे पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सागरी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण हे विभागदेखील कार्यरत असून या विभागाच्या माध्यमातून निसर्ग रक्षणासाठी प्रयत्न होत आहेत.

या विभागाच्या वतीने पर्यावरण दिन, वसुंधरा दिन, वृक्षरोपण मोहीम, प्लास्टिक निर्मूलन मोहीम, प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीबाबत जनजागृती, ओझोन संरक्षण तसेच वेस्ट लँड कन्झरवेशन दिवस, शाळा महाविद्यालयांत पर्यावरण शिक्षण व जनजागृती स्पर्धा व विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. राष्ट्रीय हरित सेना योजना, सामायिक सांडपाणी संयंत्रणा योजना, राष्ट्रीय नदी कृती योजना, सरोवर संवर्धन योजना, हरित प्रकल्प, पर्यवरण सेवा योजना, पर्यवरण माहिती प्रणाली केंद्र यासारख्या योजना राबविण्यात येत आहेत. ह्या योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी ध्वनी प्रदूषण नियमन, महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील नियंत्रण अधिनियम, प्लास्टिक पिशवी उत्पादन नियम, महानगरपालिका क्षेत्रातील अविघटनशील घनकचरा शास्त्रशुद्ध पद्धतीने संकलन, विलगीकरण व विल्हेवाट करणे यासारखे अधिनियम लागू करण्यात आले आहेत.

योजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर पर्यावरण समित्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यरत आहेत. त्यामुळे शासनस्तरावरून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाली तर पर्यावरणाचे सकारात्मक परिवर्तन निश्चितच शक्य आहे. पर्यावरण व मानवी आरोग्‍य यांचा फार जवळचा संबंध आहे. पर्यावरणातील प्रदूषण कमी झाले तरच सध्‍या उदभवत असलेले निरनिराळे आजार रोखता येतील. निसर्गनियम पाळणे व पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपली वैयक्तिक व सामूहिक जबाबदारी आहे. येणारा काळ जर आपल्याला ‘सुसह्य’ बनवायचा असेल तर पर्यवरण संतुलनासाठी आपण स्वतः व येणाऱ्या पिढ्यांना जागरूक ठेवावेच लागेल अन्यथा मानव जातीला या आकाशगंगेत वावर करणे ‘असह्य’ बनेल हे मात्र निश्चित..

Continue reading

आनंदात वचन तर रागात निर्णय नेहमीच घातक!

आनंदात वचन तर रागात निर्णय घेऊ नये, असे म्हणतात. ते नेहमी घातक ठरते. यासाठीच लागते मनावर नियंत्रण. १० ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्‍य दिन म्‍हणून साजरा केला जातो. आरोग्‍य हा आपल्‍या प्रत्‍येकाच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत जिव्‍हाळयाचा व संवेदनशील विषय...

सहकारी बॅंकामधील ठेवी किती सुरक्षित?

शासकीय बँका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आता पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्‍याचा निर्णय नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून सहकारी बँकांमधून मोठे घोटाळे उघड झाले आहेत. त्‍यामध्‍ये लाखो ठेवीदारांच्‍या ठेवी अडकलेल्‍या असून त्‍याचा...

करूया संकल्प लोकसंख्या नियंत्रणाचा!

आज ११ जुलै, जागतिक लोकसंख्‍या दिन. सन 1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटींच्या घरात होती. सन 1987 साली ही लोकसंख्या दुप्पट म्हणजे 500 कोटी झाल्याने वाढत चाललेल्या जागतिक लोकसंख्येच्या आकडेवारीला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने 11 जुलै 1987पासून जागतिक लोकसंख्या दिन...
error: Content is protected !!
Skip to content