Sunday, September 8, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटपदार्पणातल्या सर्वोत्तम चित्रपटासाठी...

पदार्पणातल्या सर्वोत्तम चित्रपटासाठी ७ दिग्दर्शकांमध्ये स्पर्धा!

गोव्यात सुरू असलेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट, या विभागात सात चित्रपटांची नोंदणी झाली असून हे चित्रपट विविध पडद्यांवर दाखवले जात आहेत. या स्पर्धा विभागात, इफफीने भारतातीलच नाही, तर परदेशातील नवोदित चित्रपट निर्मात्यांना आणि त्यांच्या उत्तम चित्रपटांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.

या विभागात यंदा निवडले गेलेले चित्रपट असे-

ऑल्मोस्ट एंटायरली ए स्लाईट डिसास्टर: उमूत सुभासी याने दिग्दर्शित केलेल्या या तुर्की चित्रपटात, इस्तंबूलमधल्या चार स्वतंत्र व्यक्तींचे समकालीन आयुष्य चित्रित केले आहे. हे चार जण आहेत, झेनप, एक अस्वस्थ विद्यार्थी; आयेशी, जी तुर्कीएमधल्या तिच्या भविष्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करणारी मुलगी; मेहमत, एक असमाधानी विवाहित अभियंता; आणि अली, आपल्या पालकांसोबत राहणारा एक बेरोजगार युवक. ह्या चित्रपटाचा, रॉटरडॅम इथल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023मध्ये जागतिक प्रीमियर झाला होता. हा चित्रपट, नवीन पिढीला भेडसावणाऱ्या चिंतांना अत्यंत कुशलतेने विनोदाची झालर देतो.

लेट मी गो: मॅक्सिम रॅपाझ दिग्दर्शित आणि स्वित्झर्लंडमध्ये चित्रिकरण झालेला, हा चित्रपट क्लॉडिन, ही एक मुलांच्या जबाबादरीत गुंतलेली आई आणि तिच्या प्रियकर भोवती फिरतो. दर मंगळवारी, एक शेजारी तिच्या मुलाची काळजी घेते. त्यावेळी, ती या पुरुषांना भेटण्यासाठी डोंगरावरील हॉटेलमध्ये जाते. जेव्हा त्यांच्यापैकी एकाने तिच्यासाठी आपला मुक्काम वाढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा क्लॉडिन गोंधळून जाते आणि दुसर्‍याच एका आयुष्याचे स्वप्न बघू लागते. कान 2023मध्ये या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर झाला होता तसेच, ACID, व्हँकुव्हर IFF 2023 आणि स्टॉकहोम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2023मध्येदेखील तो प्रदर्शित झाला होता.

ओकारिना: ह्या अल्बेनियन चित्रपटाचे दिग्दर्शन, अल्बन झोग्जनी यांनी केले आहे. ओकारिना ही कौटुंबिक समस्यांची एक कथा आहे. नवीन देशात गेल्यावर एका कुटुंबाच्या जीवनशैलीत बदल झाल्यामुळे येणाऱ्या प्रश्नांवर ती बेतलेली आहे. आपली परिस्थिती सुधारण्याच्या तीव्र आकांक्षेने प्रेरित होऊन, शाका आणि सेल्व्हिया त्यांच्या उज्वल भविष्याच्या शोधात त्यांच्या नैतिकतेशी तडजोड करण्यास प्रवृत्त होतात. मात्र, त्यांना भेटलेला जिओव्हानी आणि त्याची त्यांच्या आयुष्यातील  भूमिका, त्यांनी निवडलेल्या मार्गाला अनपेक्षित दिशेने नेते.

स्लीप: जेसन यू यांनी दिग्दर्शित केलेला दक्षिण कोरियन चित्रपट एका गर्भवती पत्नीची कथा सांगतो, ज्यामध्ये तिच्या पतीच्या झोपेतील विचित्र सवयींमुळे तिची चिंता वाढत जाते. त्याचे झोपेत सुरू होणारे निरुपद्रवी बोलणे, हळूहळू अस्वस्थतेपर्यंत पोहोचते. स्लीप क्लिनिकची मदत घेऊनही यश न मिळाल्याने आणि तिच्या नवऱ्याचे झोपेतील वर्तन आणखी तीव्र झाल्यामुळे हे जोडपे शामनाकडे वळते. हा चित्रपट कान (क्रिटिक्स वीक) 2023, टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2023 आणि मेलबर्न इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2023मध्येदेखील प्रदर्शित झाला आहे.

व्हेन द सीडलिंग्स ग्रो: तुर्की चित्रपट निर्माते रेगर आझाद काया दिग्दर्शित हा चित्रपट कोबाने येथील हुसेन आणि त्याच्या कुटुंबाभोवती फिरतो, जे दही विकून आपला उदरनिर्वाह करतात. बाजारातील एक संधी हुकल्याने त्यांना दिवसभराचा प्रवास करावा लागतो. हेमुडे नावाच्या एका मुलामध्ये गुंतलेले त्यांचे जीवन, आणि त्यांचे जीवन आणि समुदायावर कोबाने युद्धाचे झालेले परिणाम, याचा पट हा चित्रपट आपल्यासमोर उलगडतो.

ढाई अक्षर: प्रवीण अरोरा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अमरीक सिंह दीप यांच्या ‘तीर्थाटन के बाद’ या पुस्तकावर आधारित आहे. उत्तराखंडमध्ये 1980 च्या दशकात घडणारा हा चित्रपट हर्षिताच्या जीवन प्रवासाचे वर्णन करतो, जी एका संवेदनशील लेखकाबरोबरच्या पत्रव्यवहारामध्ये आपले मन मोकळे करते आणि त्या आधारावर अपमानास्पद विवाह बंधनातून मुक्त होत आपले जीवन नव्याने सुरू करते. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर श्रीधर बरोबर तिला सन्मान आणि आदर मिळतो. हर्षिताची कथा पितृसत्ताक समाजात अत्याचार किती सर्वसामान्य समजले जातात, यावर प्रकाश टाकते. प्रेम हेच स्वातंत्र्य देते, यावर भर देत, हा चित्रपट महिला सक्षमीकरणाचा संदेश देतो.

इराटा: रोहित एमजी कृष्णन दिग्दर्शित हा भारतीय चित्रपट, एएसआय विनोदच्या हत्त्येचा उलगडा करतो. विनोद हा पोलीस खात्यात काम करणाऱ्या हुबेहूब दिसणाऱ्या जुळ्या भावांपैकी एक आहे. एका मंत्र्याच्या आगमनापूर्वी त्याची तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विनोदचा जुळा भाऊ, डीवायएसपी प्रमोद, याला प्रकरणाचा तपास करताना मोठ्या दबावाचा सामना करावा लागतो, विनोदचा बेधडक स्वभाव आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याचा वेध घेत, हत्ये मागच्या हेतूचा तो छडा लावतो.

इफ्फी 54 महोत्सव अधिकाधिक रंजक होत असून, यामध्ये नव्या पिढीच्या दिग्दर्शकांच्या प्रतिभेची चमक दिसून येत आहे. महोत्सवात येत्या काही दिवसांमध्ये नव्या दमाच्या दिग्दर्शकांना दिल्या जाणाऱ्या पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार घोषित होणार आहे.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content