भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यात व्यापारीवर्गाचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट करतानाच सध्याच्या अमृत काळात जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी काल पुण्यात केले.
दि पुना मर्चंट्स चेंबर तर्फे आयोजित आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कारांचे वितरण गोयल यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध विधी सल्लागार एस. के. जैन आणि लायन्स इंटरनॅशनलचे पुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय भंडारी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उद्योगपती अरुण दांडेकर, रमेश कोंढरे, पुरुषोत्तम लोहिया, राजेश शहा, शुभम गोयल आणि पत्रकार प्रवीण डोके यांना यावेळी पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी बोलताना पियूष गोयल यांनी पुणे हे विद्वानांचे शहर असून आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याने भारताचा गौरव वाढवला असल्याचे सांगितले.
गोयल यांनी गेल्या 10 वर्षांच्या काळात मोदी सरकारकडून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी सुरू असलेल्या अनेकविध उपक्रमांची माहिती दिली. वित्तीय तूट कमी करून देशातील वाढत्या महागाईला आळा घालण्यात सरकार यशस्वी ठरल्याचे ते म्हणाले. व्याजदर कमी करून परकीय गुंतवणुकीला चालना दिली असून निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात यशस्वी झालो असल्याचे ते म्हणाले. याशिवाय अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व्यवस्था आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी या क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या मार्गावर असून देशातील रस्ते, विमानतळ, जलमार्ग, मेट्रो यासारख्या पायाभूत सुविधांचे मोठे जाळे उभे करण्यात आले आहे. परिणामी देशाची अर्थव्यवस्था केवळ रुळावरच आलेली नाही तर जगात पाचव्या स्थानावर पोचली आहे, देशाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचे योगदान वाढावे यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत असे त्यांनी सागितले. देशाचा अमृत काळ आता सुरू झाला आहे. सर्वांनी एकत्रित आणि आत्मविश्वासाने काम केले तर भारताची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.