Homeपब्लिक फिगरजरांगेंनी उपोषण सोडल्यामुळे...

जरांगेंनी उपोषण सोडल्यामुळे अनेकांचे उधळले गेले मनसुबे!

काल मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले म्हणून अनेक लोकांचे मनसुबे उधळून गेले. मराठा समाजाने 2014 ते 2019मध्ये लाखोंच्या संख्येने शांतपणे संयमाने महाराष्ट्रात मोर्चे काढले. कधीच हिंसाचार केला नाही. परंतु यावेळेस काही लोकांनी समाजकंटकांना घेऊन हिंसाचार घडवून सरकारला आणि मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा आवाहन केले होते की, शांत राहा, जाळपोळ आणि तोडफोड करू नका. तरीसुद्धा काही ठिकाणी अनुचित प्रकार घडले. काही लोक नेहमी बोलत होते आम्ही मराठा समाजासोबत आहोत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळाले पाहिजे. तेच लोक काल सहकुटूंब फिरायला गेले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन आणि उपोषण सुरू होते. तरीही हेच लोक सहपरिवार आम्ही ज्या विमानतळावर उतरलो, त्याच विमानतळावरून फिरायला गेले, असा टोलाही सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

जरांगे

मी कालच्या शिष्टमंडळात होतो आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्ही सखोल चर्चा केली. त्यांना आम्ही विश्वास दिला की आमचे सरकार मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण देणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, असा आम्ही त्यांना ठाम विश्वास दिला. मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. या दोन महिन्यांत सरकार अधिक मनुष्यबळ वापरून अधिक वेगाने काम करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, त्यासाठी सरकारने याआधीच काम सुरू केलेले आहे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केलेली आहे. शिंदे समिती या विषयावर गंभीरपणे जोमाने आणि चांगले काम करत आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आणखी मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडतील. त्यासाठी काम सुरू केलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात आणि त्यासाठी ते प्रामाणिकपणे सकारात्मक काम करत आहेत, असेही उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की मराठा समाजातील तरुणांवरील आंदोलनाच्या केसेस मागे घाव्यात. तर त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिलेल्या आहेत. पहिल्या आंदोलनातल्या केसेस येत्या १५ दिवसात मागे घेतल्या जातील आणि बाकीच्या महिन्याभरात सर्व केसेस मागे घेतले जातील. मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई द्यावी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४४१ शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई देण्यात येणार, असे सांगितले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने लेखी स्वरूपात नोंदी करून तसे काम सुरू केलेले आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content