राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल कर्नाटकमध्ये बेंगळुरू येथे IIM बेंगळुरूच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा भाग म्हणून संस्थेच्या स्थापना सप्ताहाचे उद्घाटन केले. आयआयएम बँगलोर व्यवस्थापन गुणवत्ता आणि संसाधनांची जोपासना करण्याचे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे, असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. गेल्या 50 वर्षात या संस्थेने केवळ व्यवस्थापकच निर्माण केलेले नाहीत तर नेते, नवोन्मेषकर्ते, उद्योजक आणि परिवर्तनकारक तयार केले, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

या संस्थेतील शिक्षण समस्या, आव्हाने आणि केवळ बोर्डरुम, कामाचे स्थान, बाजारपेठांमधीलच नव्हे तर आयुष्यात ज्याची कल्पना करता येईल आणि त्याच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करता येईल अशा प्रत्येक समस्येला तोंड देणारी सर्वोत्तम विचारशक्ती तयार करण्याचे काम करते, असे राष्ट्रपतींनी नमूद केले.

आपली उत्कृष्टता आणि सामर्थ्य यासाठी ओळखली जाणारी आयआयएम बँगलोर ही संस्था राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित करण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या. या संस्थेविषयी एक विश्वास आहे ज्यामुळे या संस्थेकडे मोठ्या आशेने आणि सकारात्मकतेने पाहिले जाते, असे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की ही एक अशी संस्था आहे जिथे गुणवत्तेचा आकांक्षा आणि सद्हेतूंसोबत संगम होतो.

भावी संपत्ती निर्मात्यांना राष्ट्रपतींनी व्यवसायाच्या नीतीमूल्यांसोबत विसंगत नसलेल्या महात्मा गांधीजींच्या जीवनाविषयीच्या धड्यांचा अंगिकार करण्याचा सल्ला दिला. नीतीमूल्यांशिवाय मिळणारे यश हे गांधीजींसाठी पाप होते ही बाब त्यांनी अधोरेखित केली. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात उत्कृष्टतेचे लक्ष्य ठेवण्याचा आणि आयआयएम बंगलुरुशी असलेल्या नातेसंबंधांमुळे मिळालेल्या महान वारशाची जोपासना करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांना जो वारसा मिळाला आहे त्या जगाबाबत त्यांनी तक्रार करू नये पण भावी पिढ्यांसाठी असे एक जग मागे सोडावे जिथे कोणत्याही तक्रारीला वाव नसेल आणि जिथे ते सुसंवाद, सकारात्मकता, समृद्धी आणि समानतेने राहू शकतील, असे राष्ट्रपतींनी सांगितले.