Homeन्यूज अँड व्ह्यूजगोव्यातल्या राष्ट्रीय क्रीडा...

गोव्यातल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातले ९०० खेळाडू!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्यात आज, 26 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत असून यावेळीही आपले खेळाडू उत्तम कामगिरी करतील. सर्वाधिक पदके जिंकून राज्याला अव्वल स्थान मिळवून देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल व्यक्त केला.

या क्रीडा स्पर्धेसाठी जात असलेल्या ९०० खेळाडू व २०० मार्गदर्शक अशा एकूण ११०० सदस्यांच्या महाराष्ट्राच्या पथकाकडे क्रीडाध्वज हस्तांतर करण्याचा सोहळा उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत मंत्रालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनचे महासचिव नामदेव शिरगावकर, उपाध्यक्ष प्रदीप गंधे, महाराष्ट्र कबड्डी संघाचे सचिव बाबुराव चांदेरे आदींसह स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होत असलेले खेळाडू, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

स्पर्धेतल्या सहभागी सर्वच खेळाडूंकडून महाराष्ट्राला पदकांची अपेक्षा आहे. मात्र, अपेक्षांच्या दबावाखाली न येता खेळाडूंनी त्यांचा नैसर्गिक खेळ खेळावा आणि सर्वोत्तम कामगिरी करावी. मागच्या वेळी, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ८०० खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे पथक पाठविले होते. त्यावेळी ३९ सुवर्ण, ३८ रौप्य, ८३ कांस्य अशी १४० पदके मिळाली होती. यावेळी आपले पथक मोठे आहे. यावेळी आपली तयारीही चांगली आहे. खेळाडूंमध्ये आत्मविश्वासही आहे. त्यामुळे ही  क्रीडा स्पर्धा आपल्याला अधिक पदके मिळवून देणारी, राज्याच्या गौरवात भर टाकणारी असेल. महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकून, पहिला क्रमांक मिळवलेला असेल. त्यावेळी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्वजण पुन्हा एकत्र येऊ, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असलेले खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून जात आहेत. तिथे राज्याला मान खाली घालावी लागेल, अशी कुठलीही चुकीची गोष्ट तिथे घडणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या खेळातून, खिलाडूपणातून, वागण्यातून क्रीडा रसिकांची मने जिंकण्याचे काम करावे. राज्यासाठी पदके जिंकणे आणि खिलाडूपणे वागणे, या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत, याची जाणीवही त्यांनी खेळाडूंना करुन दिली.

आशियाई स्पर्धेत देशाची आणि महाराष्ट्राची उज्ज्वल कामगिरी

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या, 19व्या आशियाई स्पर्धांमध्ये देशाच्या आणि आपल्या राज्याच्या खेळाडूंची कामगिरी सरस ठरली. आशियाई स्पर्धांमध्ये भारताने, २८ सुवर्ण, ३८ रौप्य, ४१ ब्राँझ, अळी एकूण १०७ पदके जिंकली. यात महाराष्ट्राचे मोलाचे, महत्त्वाचे योगदान होते. आशियाई स्पर्धेत, भारताने जिंकलेल्या 28 सुवर्णपदकांपैकी 15 सुवर्णपदके महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिंकली आहेत. याशिवाय महाराष्ट्राला 7 रौप्य, 5 कांस्य पदकं मिळाली आहेत. क्रीडा क्षेत्रातला देशाचा आणि राज्याचा हा विजयरथ पुढे नेण्याचे काम यापुढील काळात, राष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना करायचे आहे, याची जाणीव ठेऊन तुम्ही तयारी केली पाहिजे. चांगले खेळले पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

आशियाई पदक विजेत्यांच्या बक्षीसात भरघोस वाढ

राज्य सरकार सातत्याने खेळ आणि खेळाडूंच्या पाठिशी राहिले आहे. चीनमधल्या, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या, राज्याच्या खेळाडूंना १ कोटी रुपयांचे आणि मार्गदर्शकाला १० लाख रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्याचा शासन आदेश निर्गमित केला आहे. आशियाई स्पर्धेतल्या रौप्यपदक विजेत्या खेळाडूला ७५ लाख रुपये आणि मार्गदर्शकाला ७ लाख ५० हजार रुपये मिळणार आहेत. कांस्यपदक विजेत्या खेळाडूला ५० लाख आणि मार्गदर्शकाला ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंना, चांगली तयारी करता यावी म्हणून, प्रोत्साहनपर १० लाख रुपये देण्याचा निर्णयही आपण घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केलेल्या खेळाडूस ७५ लाख, मार्गदर्शकास ७ लाख ५० हजार, रौप्यपदक विजेत्या खेळाडूस ५० लाख, मार्गदर्शकास ५ लाख तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूस २५ लाख, मार्गदर्शकास २ लाख ५० हजार रूपये देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना अजून शासकीय ई-मेलच नाही?

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अनेक आघाड्यांवर जोरदार कार्यरत असले तरी राज्य सरकारने त्यांना तसेच या विभागाच्या प्रधान सचिवांना शासकीय ई-मेलच दिला नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी हिंदू मंदिर संवर्धन अभियान, मुंबई सांस्कृतिक...

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....
Skip to content