संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 2900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) 90 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नुकतेच लोकार्पण केले. जम्मू येथे 12 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या एका कार्यक्रमात संरक्षण मंत्र्यांनी या प्रकल्पांचे लोकार्पण केले.
यामध्ये अरुणाचल प्रदेश मधील नेचीफू बोगदा, पश्चिम बंगालमधील दोन विमानतळ, दोन हेलिपॅड, 22 रस्ते आणि 63 पूल यांचा समावेश आहे. या 90 प्रकल्पांपैकी 36 प्रकल्प अरुणाचल प्रदेश मध्ये, 26 लडाख मध्ये, 11 जम्मू आणि काश्मीरमध्ये, पाच प्रकल्प मिझोराम, तीन प्रकल्प हिमाचल प्रदेश, सिक्कीम उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल मधील प्रत्येकी दोन प्रकल्प, नागालँड, राजस्थान आणि अंदमान निकोबार बेटे या ठिकाणी प्रत्येकी एक प्रकल्पाचा समावेश आहे.

सीमा रस्ते संघटनेने सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पांची उभारणी विक्रमी वेळेत केली आहे. या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून सीमा रस्ते संघटना केवळ भारताच्या सीमांचे संरक्षण करणार नसून दुर्गम भागातल्या क्षेत्रांचा सामाजिक आर्थिक विकास करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सीमा रस्ते संघटनेसोबत एकत्रितपणे आम्ही देश सुरक्षित राखणे आणि सीमावर्ती भागांचा विकास करणे सुनिश्चित करत आहोत. दुर्गम भागातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यामुळे आता नव भारतामधील एक नवा पायंडा निर्माण झाला आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

देवक पूल
बिश्ना-कौलपूर-फुलपूर रस्त्यावर देवक पुलावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्याचे उद्घाटन संरक्षणमंत्र्यांनी केले. देवक पूल हा लष्करी दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून त्यामुळे संरक्षण दलांच्या परिचलनात्मक सज्जतेला पाठबळ मिळेल आणि या भागाच्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळेल.

नेचीफू बोगदा
संरक्षण मंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या पायाभूत प्रकल्पांपैकी हा प्रकल्प महत्त्वाचा असून अरुणाचल प्रदेश मधील बालीपारा चारदौर तवांग रस्त्यावर 500 मीटर लांबीचा हा बोगदा आहे. हा बोगदा आणि सध्या बांधकाम सुरू असलेला सेला बोगदा सामरिक दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या तवांग भागात सर्व प्रकारच्या हवामानात दळणवळणाची सुविधा उपलब्ध करेल.
बागडोग्रा आणि बराकपूर धावपट्ट्या
नूतनीकरण करण्यात आलेल्या बागडोग्रा आणि बराकपूर धावपट्ट्यांचे देखील पश्चिम बंगाल मध्ये लोकार्पण करण्यात आले.

न्योमा धावपट्टी
याव्यतिरिक्त राजनाथ सिंह यांनी पूर्व लडाखमधील न्योमा धावपट्टीचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले. हे हवाई क्षेत्र सुमारे 200 कोटी रुपये खर्चाने विकसित करण्यात येणार असून त्यामुळे लडाखमधील हवाई पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि उत्तर सीमेवर भारतीय हवाई दलाच्या क्षमतेत वाढ होईल.

नागरी- लष्करी सांगड : काळाची गरज सीमा रस्ते संघटनेच्या कामाची पद्धत आणि उभारले जाणारे प्रकल्प म्हणजे नागरी लष्करी यांची सांगड दर्शवणारे एक चमकदार उदाहरण आहे असे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. ही काळाची गरज आहे कारण देशाच्या संरक्षणाची जबाबदारी ही केवळ सैनिकांचीच नव्हे तर नागरिकांची देखील आहे, असे ते म्हणाले. राजनाथ सिंह यांनी सीमा रस्ते संघटनेला स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकांना देखील त्यांच्या गरजा लक्षात घेऊन आणि त्यांच्याकडून अभिप्राय घेऊन त्यांना या कामांमध्ये सहभागी करून घेण्याचे आवाहन केले. संरक्षण मंत्र्यांनी पर्यावरणाविषयीच्या त्यांच्या जबाबदारी बाबतची सजगता आणि अत्याधुनिक तंत्र आणि तंत्रज्ञानाचा पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वापर केल्याबद्दल बीआरओची प्रशंसा केली. आज उद्घाटन झालेल्या 2900 कोटी रुपयांच्या 90 प्रकल्पांमुळे, 2021 पासून आतापर्यंत सुमारे 8000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे. 2022 मध्ये 2900 कोटी रुपयांच्या 103 प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले तर 2021 मध्ये 2200 कोटी रुपयांच्या 102 प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले होते.

