शिक्षक दिनाचे औचित्य साधत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विज्ञान भवन इथे झालेल्या एका समारंभात, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या, की प्रत्येकाच्या आयुष्यात प्राथमिक शिक्षणाला अनन्यसाधारण आणि मूलभूत महत्त्व आहे. मुलांच्या सर्वांगीण आणि समतोल विकासासाठी, अनेक शिक्षणतज्ञ ‘तीन एच’ च्या सूत्राविषयी बोलत असतात. त्यापैकी पहिलं एच म्हणजे हार्ट (हृदय), दूसरा एच म्हणजे हेड (मस्तक) आणि तिसरा एच म्हणजे हँड (हात) असे त्या पुढे म्हणाल्या. हृदयाचा संबंध संवेदनशीलतेशी असतो, मानवी मूल्यांशी, चारित्र्य निर्माणाशी आणि नैतिकतेशी असतो.

शिक्षण क्षेत्रात, महिलांचा सहभाग लक्षात घेता, पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्येही शिक्षिकांची संख्या अधिक असायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महिला सक्षमीकरणासाठी विद्यार्थिनी आणि शिक्षिका दोघींनाही प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

शिक्षक देशाच्या भविष्याचे शिल्पकार आहेत, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या. उत्तम शिक्षण मिळणे हा प्रत्येक मुलाचा मुलभूत अधिकार आहे आणि हे ध्येय गाठण्यात शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये राष्ट्र निर्माते म्हणून शिक्षकांचे महत्व स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की हे प्रत्येक मूलात असलेल्या आगळ्या क्षमता आणि गुण ओळखून त्यांचा विकास करण्यासाठी संवेदनशीलतेने प्रयत्न करणे हे प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक पालकाची इच्छा असते की त्यांच्या पाल्याकडे विशेष लक्ष दिले जावे, त्यांना प्रेमाची वागणूक मिळावी आणि ते आपल्या पाल्यांना मोठ्या विश्वासाने शिक्षकांच्या हवाली करत असतात, असे राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या.

