केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) डॉ व्ही के सिंह म्हणाले की, रस्त्यांचा वापर करणाऱ्यांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर दूरसंचार नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात 4G सेवेची पोहोच सुनिश्चित करण्यासाठी मोबाईल टॉवर्स उभारून 4G सेवा न पोहोचलेल्या गावांमध्ये त्याचा विस्तार करण्याचा उपक्रम सुरू आहे. याचा आपल्या रस्ते नेटवर्कला थेट लाभ होईल, ज्यामुळे आम्हाला अपघात आणि जीवितहानी प्रभावीपणे टाळता येईल असे त्यांनी सांगितले.

नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दूरसंचार विभागाची कामगिरी तसेच इतर सर्व मंत्रालये आणि विभागांवर त्यांचा प्रभाव अधोरेखित करत ते म्हणाले की राष्ट्रीय महामार्गांवर विनाव्यत्यय अखंडित मोबाइल फोन नेटवर्क सुनिश्चित करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय दूरसंचार विभागाशी समन्वय साधत आहे.

भारतात 5G नेटवर्कचा विस्तार वेगाने होत आहे. अंदाजे 1 लाख साईट्स 5 महिन्यांत पूर्ण झाल्या, त्यानंतर 8 महिन्यांत 2 लाख आणि 10 महिन्यांत 3 लाख साईट्स पूर्ण झाल्या, ज्याचा आपल्या रस्त्यांच्या नेटवर्कला मोठा लाभ होईल असे डॉ. सिंह म्हणाले. याशिवाय, आम्ही टोलिंग प्रणाली उपग्रह आणि कॅमेरा-आधारित बनवत आहोत. दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर उपग्रह आधारित तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे अडथळे रहित टोलिंगची अंमलबजावणी करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू आहे. ऑप्टिकल फायबर नेटवर्क सुधारण्यावरही आम्ही काम करत आहोत असे त्यांनी नमूद केले.

मोबाईल टॉवर प्रकल्पांसाठी एकूण खर्च 43,868 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 631 जिल्ह्यांमध्ये 5G सुरु केले आहे असे डॉ सिंह म्हणाले. बीएसएनएलच्या पुनरुज्जीवन पॅकेजबद्दलही त्यांनी माहिती दिली.

