Wednesday, March 12, 2025
Homeमाय व्हॉईसकणेकर, तुम्ही कायम...

कणेकर, तुम्ही कायम लक्षात राहाल…

अरुण पुराणिक यांचा फोन आला. अंधेरीतील माझ्या घरी शिरीष कणेकर येताहेत. गप्पांची मस्त मैफल जमवूयात… हे ऐकेपर्यंत मी मनाने तेथे पोहोचलो होतोच.

कणेकर त्यांचे सहकारी उज्ज्वल वाडकर यांच्यासोबत आले. पण आश्चर्य वाटत होते ते, खास कोकणातून दूरवरचा प्रवास करीत काही ‘कणेकर चाहते’ आले. कणेकर अथवा ते एकमेकांना ओळखत नव्हते. पहिल्यांदाच भेटत होते. पण तसे काहीच न जाणवता आमची मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. दुपारी अडीच ते सहा असा वेळ आम्ही कणेकरांची एकाच वेळेस ‘शिरीषासन’, ‘फिल्लमबाजी’, ‘कणेकरी’, ‘फटकेबाजी’ ऐकत होतो. आघाडीला येऊन शेवटपर्यंत कसलेल्या फलंदाजाप्रमाणे त्रिशतक काढून ते शेवटपर्यंत नाबाद राहिले. आम्ही आपले सिंगल धाव घेऊन नॉन स्ट्रायकरला जात होतो. आम्हाला तेच शक्य होते आणि आवडत होते.

कणेकर

कणेकर बोलत असताना आपण श्रोत्याची भूमिका घेणे योग्य असते. ही सवय आणि आवडही. कणेकरांनी आपलं दैवत लता मंगेशकर व दिलीपकुमार यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी, किस्से, गोष्टी त्यांनी आपल्या खास रोचक शैलीत अशा सांगितल्या की जणू ते सगळेच आपल्या समोर घडतेय. राजेश खन्नाबद्दलचेही त्यांचे अनुभव असेच भन्नाट आणि राजेश खन्नाच्या लहरी स्वभावाचा प्रत्यय देणारे. कणेकरांना विषयाची मर्यादा नव्हतीच. क्रिकेट, पत्रकारिता, काही संपादक, एखादा वाचक चाहता… अशा अनेक गोष्टींवर ते अगदी सहजच सांगत.

कणेकर

आमची ही कणेकर मैफल त्यांनाही सुखावणारी ठरली. कारण खूप दिवसांनी त्यांना असे फार मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाली. काही वर्षांपासून त्यांना कळतनकळतपणे काहीसं एकाकीपण आले होते. फारसं कोणी भेटत नाहीत, बोलायला कोणी नाही असं ते अनपेक्षितपणे बोलत. अशीच त्यांची आठवणीत राहिलेली भेट.. नाविन्य प्रकाशन, पुणे यांच्या नितीन खैरे यांनी कणेकर यांची यादों की बारात, कट्टा, चापटपोळी, नानकटाई आणि मेतकूट या पाच पुस्तकांचे ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त केलेले पुनर्प्रकाशन. आपलं नवीन पुस्तक प्रकाशित होणे हे संवेदनशील लेखकासाठी टॉनिक असते. शिरीष कणेकर स्टार लेखक. त्यांचा स्वतःचा प्रचंड असा वाचकवर्ग, चाहतावर्ग. तो सतत कणेकर यांच्या पुस्तकाची आतुरतेने वाट पाहतो. कणेकर यांच्या काही पुस्तकांचे पुन्हा प्रकाशन करणे हा त्यातील एक मार्ग. विशेष उल्लेखनीय गोष्ट, नाविन्य प्रकाशनने सगळी यंत्रणा उभी करीत अगदी वेळेपूर्वीच ही पुस्तके तयार केली आणि कणेकर यांच्या घरीच त्या पुस्तकांचे कौटुंबिक, खेळकर वातावरण प्रकाशन केले. कणेकर यांच्या चेहऱ्यावरचा यावेळचा आनंद माझ्या कायमच लक्षात राहणारा.

त्यांचा ६ जून रोजीच्या यंदाच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त त्यांना फोन करताच ते म्हणाले, छे… छे… फोनवर नाही. संध्याकाळी घरी ये. आणखी काहीजण येताहेत. तूही ये. आपण सगळे छान गप्पा करू. मी माहिमच्या त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा अतुल परचुरे इत्यादी जण गप्पांत रमले होते. शिवाजी पार्कवरील त्यांच्या एकेकाळच्या कट्ट्यावरील अनेक आठवणीत सगळेच रमले. शिरीष कणेकरांच्या गप्पांत लता मंगेशकर हमखास येणार आणि ते थोडे भावूक होणार हे ठरलेलेच. लता मंगेशकर यांचे निधन कणेकरांना विलक्षण चटका लावून गेले हे सतत जाणवे.

कणेकर यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आहेत. अनेकांच्या अशाच अनेक आठवणी आहेतच. कारण व्यक्तिमत्वच तसे होते. शिरीष कणेकर हे नावच कायम तारुण्यात असलेले असल्याने त्यांचे जगणे, बोलणे, असणे, ऐकणे, सांगणे कायमच तरुण राहिले. कणेकर तुम्ही अनेक बाबतीत कायमच लक्षात राहाल. हा तर फक्त ट्रेलर आहे…

Continue reading

द्वारकानाथ संझगिरीः स्वतःचा हुकमी चाहतावर्ग असलेला चतुरस्र लेखक!

पहिल्याच चेंडूपासून मैदानात चहुबाजूला फटकेबाजी करणारा फलंदाज ड्रेसिंग रुममधून बाहेर पडण्यापूर्वीच नजर सेट करुन आलेला असतो, तसे द्वारकानाथ संझगिरी यांचे पहिल्याच ओळीपासूनचे लेखन असे. त्यांना ते पटकन कसे सुचते आणि ते अनेक उपमा, अलंकार, अनेक जुने-नवे संदर्भ देत देत...

गिरगावात ‘बत्तीजवळ’! म्हणजेच २८, खोताची वाडी!!

आपण लहानाचे मोठे होत जाताना आपल्या आजूबाजूचा परिसर, माणसं, वातावरण, वास्तू  यांच्याशी असं आणि इतकं एकरुप होतो की ते सगळेच आपल्या आयुष्याचा, व्यक्तिमत्वाचा भाग बनतात. काहींच्या बाबतीत तर ते सगळेच आयुष्यभरची साथसंगत असते, तर कोणी त्या सर्वच आठवणींवर पुढचे...

निमित्त गौरी कुंज भेटीचे, आठवण किशोरकुमारची…

गिरगाव गावदेवीतील भवन्स कॉलेजमध्ये असताना आम्हा मित्रांचे टोळके कॉलेज कॅन्टीनपेक्षा गावदेवी सिग्नलच्या इराणी हॉटेलमधील ज्यूक्स बॉक्समध्ये प्रत्येकाच्या खिशात असतील तेवढी आठ-आठ आण्यांची नाणी टाकून गाणी ऐकण्यात रस घ्यायचो आणि माझा फेवरेट होता किशोरकुमार. आणि एकदा का किशोरकुमार ऐकायचा म्हटलं...
Skip to content