Homeपब्लिक फिगरशनिवारपासून राज्यात होणार...

शनिवारपासून राज्यात होणार ‘अजित उत्सव’ साजरा!

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस येत्या २२ जुलैला असून राष्ट्रवादीच्यावतीने २२ ते ३१ जुलै हा सप्ताह ‘अजित उत्सव’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल दिली. महाराष्ट्रातील शेतकरी पेरण्या न झाल्याने संकटात आहे याची जाणीव असल्याने या वाढदिवसाचे प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करणार त्यांनी सांगितले.

अजितदादांच्या राजकारणाची सुरुवात समाजकारणापासून सहकार क्षेत्र, शिक्षण, कला, क्रीडापासून झाली. ज्या-ज्या पदावर काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये काही काळ लोकसभा सदस्य, राज्यमंत्री, राज्य सहकारी बँकेचे प्रमुख, विधानसभा सदस्य, मंत्री, विविध खात्याचा पदभार, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करत असताना अजित पवार यांनी विकासाला महत्त्व दिले आहे. सर्वांना न्याय देण्याची भूमिका ठेवली. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्थायीभाव आहे. काहींना तो आवडत नसेल. मात्र महाराष्ट्रातील जनतेला चांगल्या पद्धतीने तो रुचला आहे. अजितदादांच्या नेतृत्त्वाची एक वेगळी झलक महाराष्ट्राने दीर्घकाळ अनुभवली आहे. महाराष्ट्रातील तरुणाईसुद्धा त्यांच्या नेतृत्त्वाकडे आकर्षित झालेली पाहायला मिळत आहे, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमात सगळ्या घटकांना सामावून घेण्याचा विचार आम्ही केला आहे. मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर, शाळांमध्ये शैक्षणिक साहित्यवाटप, वॉटरफिल्टर, छत्रीवाटप, शाळकरी मुलींना सायकली मोफत देण्याचा कार्यक्रम, वृक्षलागवड, ज्येष्ठ नागरिकांच्या निवासस्थानी भेटी, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, अजितदादा जसे सकाळी सहा वाजता उठतात, तसंच ग्रामस्वच्छता अभियानासाठी दोन तास देणे असा सामाजिक उपक्रम राज्यभर सप्ताहाच्या कालावधीत राबवला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण, त्यामध्ये लघु, मध्यम उद्योग, खादी ग्रामोद्योग भारत सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून ३५ टक्के अनुदानातून वेगवेगळे व्यवसाय करण्याची संधी, महिला कोणता व्यवसाय घेऊ शकतात याचे मार्गदर्शन आणि व्यवसाय निवडल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकातून त्यांना कर्ज कसे उपलब्ध होईल, त्यांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल असा व्यापक कार्यक्रम राज्यात राबवला जाणार आहे. याशिवाय महिला आरोग्यविषयक शिबीरेही घेतली जातील. या शिबिरात गंभीर आजाराचे निदान झाल्यावर त्या रुग्णाला उपचार कसे मिळतील याचे नियोजनही करण्यात आले आहे, असेही तटकरे म्हणाले.

बेरोजगारी आणि युवक हा प्रश्न संबंध राज्यात आहे. त्यामुळे युवक राष्ट्रवादीच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली ‘रोजगार नोकरी महोत्सव’ मेळावा राज्यात आयोजित करणार आहोत. या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील राहणार आहोत. याशिवाय राज्यसरकार जी रिक्त पदांची भरती करणार आहे त्याची माहिती व प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न या उपक्रमात अंतर्भूत केला आहे. इनडोअर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. याशिवाय युवती राष्ट्रवादीच्यावतीने राज्यातील युवतींसाठी शाळा व महाविद्यालयात ‘स्वसंरक्षण शिबीरे’ आयोजित केली जाणार आहेत. अजितदादांचा वाढदिवस संबंध महाराष्ट्रात व देशभरात त्यांची ओळख विलक्षण पद्धतीच्या कामाचा झपाटा, अचूक वेळ आणि मेहनत करण्याची असलेली क्षमता या त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित सर्वच सामाजिक उपक्रम या सप्ताहात साजरे केले जाणार आहेत, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content