स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज अजिंठा येथे भू-वारसा शिबिराचे आयोजन केले होते. आपल्या परिसरातील भू-वारसा स्थळांची माहिती युवावर्गाला व्हावी त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे देशभर आयोजन करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये विकसित भारताचे ध्येय दिले आहे. ते आपणा सर्वांना पूर्ण करायचे आहे. त्यादृष्टीने युवकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असे रावसाहेब पाटील दानवे म्हणाले. अशाप्रकारची माहिती विद्यार्थ्यांना आयुष्यभर मोलाची ठरणारी असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वारसा स्थळांची सहल घडवून आणावी, असे आवाहन मंत्र्यांनी केले.

देशात प्रथमच विकसित भारताचे ध्येय पूर्ण करण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करुन ठेवली आहे. भारताचा विकासाचा वेग पाहून जग भारताकडे आकर्षित होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे वाढते महत्त्व हे भारताची विकसित देशाकडे असलेली वाटचाल दर्शवते, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना राज्यमंत्री दानवे म्हणाले की, दळणवळणाची साधने आणि संपर्कव्यवस्था वाढल्याने विकासाला चालना मिळते. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परिसरात रेल्वेमार्गाच्या विकासाचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी भू-वारसा स्थळांसंबंधी आयोजित करण्यात आलेल्या विविध प्रश्नमंजूषेतील विद्यार्थ्यांना पारितोषकं प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खाण मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार शकील आलम, भारतीय भू-वैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.

