केवळ माझे मित्र आहेत म्हणून नाही, पण गेल्या ३५ वर्षांपासून मी योगेश त्रिवेदी यांची पत्रकारिता पाहात आलो आहे. निःस्वार्थी, प्रामाणिक, ध्येयवादी आणि परखडपणे पत्रकारिता कशी करावी याचा आदर्श त्रिवेदी यांनी घालून दिला आहे. वास्तविक योगेशच्या लेखांची पुस्तके यापूर्वीच यायला हवी होती. पण आज ६५ वर्षांचा योगेश झाला आणि म्हणून ‘पासष्टायन’ हे त्याच्या लेखांचे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. मी त्याला भरभरुन आशीर्वाद देतो, अशा शब्दांत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचा गौरव केला.
कोरोनाच्या कालावधीत जानेवारी २०२० ते फेब्रुवारी २०२१ यादरम्यान त्रिवेदी यांनी लिहिलेल्या पासष्टाहून अधिक लेखांचा संग्रह ‘पासष्टायन’ या पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मनोहर जोशी यांच्या हस्ते अतिशय घरगुती वातावरणात करण्यात आले. यावेळी जोशी यांनी आपल्या संघर्षमय जीवनातील अनेक घटनांचा पट उलडगडला. अनेक किस्से सांगितले आणि त्रिवेदी यांच्याबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा आवर्जून उल्लेख केला.
कोरोनाच्या वातावरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदीची घोषणा कधीही होऊ शकते याचे संकेत दिल्यामुळे अत्यंत घाईघाईने हा प्रकाशन घरगुती वातावरणात पार पाडावा लागल्याचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी नमूद केले. ‘पासष्टायन’च्या प्रवासाची थोडक्यात माहिती त्यांनी कथन केली. त्रिवेदी यांनी मनोहर जोशी यांचा शाल, श्रीफळ देऊन तर वैद्य तसेच सहकार आणि समाजवादी चळवळीतले कार्यकर्ते विजय शिंदे यांनीही वयाची पासष्ठ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘आहुति’चे संपादक गिरीश त्रिवेदी यांनी ‘आहुति’चे विविध विशेषांक यावेळी जोशी यांना भेट दिले. राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख रेखाताई बोऱ्हाडे, ज्येष्ठ पत्रकार कुनेश दवे, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत लाडे, त्रिवेदी परिवारातील सदस्य, मिलिंद पटवर्धन, राजू चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अतिशय अभिमानास्पद कामगिरी . मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. तुमच्या प्रदीर्घ पत्रकारिता क्षेत्रातील विविध घडामोडींवर केलेले भाष्य व्यापक समाजहित डोळ्यासमोर ठेऊन , गुणग्राहकता जोपासत, प्रेरणादायी आहे हे माझ्यासारख्या असंख्य तुम्हाला अगदी दीर्घ काळ जवळून पाहिलेल्या व्यक्ती निर्विवादपणे मान्य करतील. अभिनंदन आणि शुभेच्छा.!