आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले आहे म्हणून पंढरीच्या वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाखो भाविक शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी घेऊन पंढरपूरकडे जात असतात. परंतु, असं म्हणतात की, काळ बदलला की सर्व काही बदलते. परंतु दिंडी परंपरा कायमच अबाधित राहणार आहे. पंढरपूरच्या विठुरायाप्रती भाविकांची श्रद्धा आणि भाव गेल्या अनेक शतकांपासून पिढ्यांपिढ्यांचा राहिला आहे. तसाच भाव गेली १२३ वर्षे प्रभादेवीकर प्रभादेवीतील पुरातन श्री विठ्ठल मंदिराबाबत बाळगून आहेत. प्रभादेवीतील अनेक पिढ्या याठिकाणी श्रद्धेने नतमस्तक झाल्या आहेत. त्यामुळे या मंदिराचा जीर्णोदार करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे उद्गार आमदार सदा सरवणकर यांनी काढले.
प्रभादेवी येथील श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी या कामाला रुपये ५ लाख देणगी देऊन काम पूर्णत्वास जाईपर्यंत मी सोबत असेन असे आश्वासनही दिले. पहाटे ५ वाजता प्रभादेवीतील श्री आणि सौ नम्रता गणेश तोडणकर यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर संपूर्ण दिवसभर वरळी कोळीवाडा, प्रभादेवी, सैतान चौकी परिसरातातील हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले. गायक-संगीतकार दिलीप गोळपकर यांचे सुमधुर भक्तिगीतांचा, श्री सद्गुरू भावे महाराज वारकरी समाजाच्या कलावंतांचे सुस्वर भजन, हभप बाळकृष्ण अहिरे यांचे प्रवचन, हभप कृष्णामास्तर घाडगे यांचे हरिकीर्तन पार पडले.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी आमदार नितीन सरदेसाई, नगरसेवक समाधान सरवणकर, माजी नगरसेवक संतोष धुरी, विभागप्रमुख महेश सावंत, मनसे नेते संदीप देशपांडे, रमेश परब, राजन भोसले, प्रवीण नाईक, कृष्णा ब्रीद, शाखाप्रमुख संजय भगत, शाखाप्रमुख शैलेश माळी, शाखाप्रमुख योगेश पाटील आदी मान्यवरांनी या मंदिराला भेट दिली. विभागातील अनेक दानशूरांनी भाविकांना तुळशीरोप तर खिचडी, फराळ वाटप केला.

