आपण लहानाचे मोठे होत जाताना आपल्या आजूबाजूचा परिसर, माणसं, वातावरण, वास्तू यांच्याशी असं आणि इतकं एकरुप होतो की ते सगळेच आपल्या आयुष्याचा, व्यक्तिमत्वाचा भाग बनतात. काहींच्या बाबतीत तर ते सगळेच आयुष्यभरची साथसंगत असते, तर कोणी त्या सर्वच आठवणींवर पुढचे आयुष्य जगतो आणि अचानक एके दिवशी बातमी येते. त्यातीलच एक महत्त्वाची गोष्ट नाहीशी होतेय, तेव्हा जणू आपल्या शरीराचा काही भागच वेगळा करताहेत की काय असे वाटते. गिरगावातील आमच्या खोताची वाडीतील २८ क्रमांकाचा बंगला पाडताहेत याबाबतचे वृत्त माझा लहानपणापासूनचा मित्र आणि याच वास्तूच्या अगदी समोरच शेल्टर या इमारतीत राहत असलेल्या आनंद शिंदे याने कळवले आणि मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो.
मी ३० ए, श्रीवास्तव बिल्डींगमध्ये लहानाचा मोठा झालो (आजही मनाने तेथेच आहे). उजव्या बाजूला आपलं घर (पूर्वीचे नाव दांडेकर बिल्डींग). समोरच तळमजल्यावर दिघे तर पहिल्या मजल्यावर वर्दे राहत. संपूर्ण मजला त्यांचा. त्यांच्या नकळतपणे माझ्यासारख्या जेमतेम दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्याला कसंसच वाटे. समोरच आयडियल वेफर्स कंपनी (मी मीडियात आल्यावर त्यांनी अगणित वेळा मला फोन दिला. मी आमच्या ओटीवर बसून काम करीत असतानाच या दुकानातून आवाज येई, दिलीप फोन…. पूर्वी आमच्या या आडव्या गल्लीत शेल्टरमधील मा. कृ. शिंदे, वेफर्सचे दुकान आणि वर्दे अशा मोजून तिघांकडेच लॅन्डलाईन फोन होता. तो दिसला तरी भारी वाटे. आम्हा इतर कोणाहीकडे फोन नसल्याने आमचं जगणं थांबलं नाही.)
![](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230531-WA0005.jpg)
वेफर्स कंपनीलगत कंपाऊंड आणि दोन लहानमोठ्या इमारती. आमच्या डाव्या बाजूस आमच्याच श्रीवास्तव बिल्डींगची जोड इमारत. त्यात पहिल्या मजल्यावर ज्योत्स्ना प्रकाशनचे परांजपे राहत (मिलिंदने पुण्यात तर विकासने मुंबईत आपला कार्यविस्तार वाढवलाय. लहानपणी आम्ही एकत्र गोट्या, पत्ते, क्रिकेट खेळलोय.) त्याशेजारीच हा २८ क्रमांकचा बंगला. दोन्ही मजल्यावर ख्रिश्चन. (आमच्या वाडीत ख्रिश्चन बरेच. तीही एक वाडीची ओळख) त्याच्या डाव्या बाजूस आणखीन एक बंगला. (दुसर्या मजल्यावर एडनवाले यांच्या तीन पिढ्या वाढल्या आणि आम्ही गल्लीतील अनेक जण १९८७ सालापर्यंत त्यांच्याकडे टी.व्ही. पाहयला जात असू. आपण विश्वचषक क्रिकेट मॅच जिंकली, ती त्यांच्याकडेच पाहिली. आपल्या घरात मोठा दूरचित्रवाणी संच आणला तर तो घरात आणि आपण बाहेर बसून बघतोय, असं होईल वाटे. मध्यम आकाराचे टी.व्ही. संच आल्यावर आम्हा मध्यमवर्गीयांच्या घरात टी.व्ही. संच येत गेले.)
याशेजारी बुधानी हाऊस ही तीन मजली चाळ. आणि एकूणच या परिसरातील आम्हा सर्वांनाच जोडणारा दुवा म्हणजे २८ नंबरच्या दुमजली बंगल्याच्या पायर्या. या दुमजली आणि छान आडव्या अशा या बंगल्याच्या पायरीने आम्हाला आयुष्यात बरेच काही दिले. आमच्या भाषेत सांगायचं तर ‘बत्तीजवळ’ असं या स्पॉटचे नामकरण झाले होते. डाव्या बाजूला आडवी गल्ली तर समोर उभी गल्ली. (सोबतचा फोटो बघा). आमच्यासाठी हाच नाका, हाच अड्डा. हाच कट्टा. कधी या पायर्यांवर दोघे, कधी चौघे, कधी बारा-पंधरा जण. हे प्रत्येक पिढीत घडले. पिता आणि त्यानंतर अनेक वर्षांनी त्याचा पुत्र याच पायर्यांवर… हा सिलसिला सुरू राहिला. महत्त्वाचे म्हणजे, हा आमच्या वाडीतील महत्त्वाचा येण्याजाण्याचा रस्ता. पण कधीच मौलागिरी नाही. कोणत्याच मुलीची कधी छेडछाड नाही. आणि गप्पांचे विषय क्रिकेट, चित्रपट, राजकारण, समाजकारण असे अनेक. कधी वाद निर्माण होत, कधी ते वाढतही. क्वचित कोणाची व्यक्तिगत हेव्यादेव्यातून मारामारी.
![](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230531-WA0007-746x1024.jpg)
माझी अगदी लहानपणाची आठवण म्हणजे, माझे वडील पतंग उडवत आणि या बत्तीजवळून तो उडवता येई. मला लहानपणापासून माझी आजी (आणि मग आईदेखिल) या बंगल्याच्या अंगणात पापड सुकत घाले. दिवाळीत मी याच दोन्ही ख्रिश्चनना घरचा फराळ भेट घेऊन जात असे तर ख्रिसमसला दोन्हीकडून केक येई. अनेक वर्षं हे चालले. आमच्या आडव्या गल्लीत क्रिकेट, गोट्या, लपंडाव, पकडापकडी खेळल्यावर अगदी रंगपंचमीतही अनेकदा अनेकजण आमच्या घरी माझ्या आजी अथवा आईकडून पाणी मागणार (हेही पिढी बदलली तरी चालले) आणि मग या पायर्यांवर येऊन बसणार. याच २८ क्रमांकाने आमच्या या गल्लीतील श्रीगणेशाचा प्रवास पाहिलाय.
पन्नास वर्षांपूर्वी लाकडी असलेल्या वेफर्स कंपनीवर गणपतीचे कॅलेंडर लावले गेले. वेफर्स कंपनीचे पक्के बांधकाम होताना त्याच कॅलेंडरच्या फोटोची फ्रेम करुन ती दुकानाच्या प्रवेशापाशी लावली गेली. श्रीगणेश जयंतीला येथे पूजा करण्याची प्रथा सुरू होताच तेथेच छोटेसे मंदिर झाले. अतिशय श्रध्देने हे सगळे घडले. पिढी बदलले तरी ते सुरू आहे. आणि २८ नंबरच्या पायर्यालगत स्टेज उभा राहून कार्यक्रम होऊ लागले. १९९८ साली रमेश देव व सीमा देव यांची जयंत ओक यांनी मुलाखत घेतली तेव्हा होम पीच म्हणून गल्लीतील सगळ्यांनी मलाही याच मुलाखतीत बसवून चार प्रश्नांची संधी दिली. २०१२ साली याच स्टेजवर मी किशोरी शहाणेची मुलाखत घेतली. या पायर्यांवरुन ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटाचे शूटिंग झाले.
![](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230531-WA0006.jpg)
इरफान खान तेव्हा नवखा होता. वर्दे यांच्या घरात ‘नजर’ या शॉर्ट फिल्मच्या शूटिंगसाठी शेखर कपूर पाच दिवस आला तेव्हा तो गिरगाव लॉज परिसरात गाडी पार्क करुन चालत चालत आमच्या आडव्या गल्लीत येई, हे लक्षात घेऊन मी एक दिवस पायर्यांवरच त्याची वाट पाहत बसलो आणि तो आल्यावर त्याला मुलाखतीचे विचारले. मी याच गल्लीत राहतो हे त्याला माझ्या मराठीमिश्रित हिंदीत लक्षात आले आणि तो हो म्हणाला. पुढचे काही दिवस मी या पायर्यांवर हिरो होतो. मी ‘ऐसा क्यू हूँ’ याचं कारण या गल्लीतील माझी मोकळीढाकळी वाढ असू शकेल. ऐंशीच्या दशकात मराठी अथवा हिंदी चित्रपटाचा मुहूर्त असो, शूटिंग रिपोर्टिंग असो, प्रिमियर असो, पार्टी असो, प्रेस शो असो. कुठूनही आलो की अनेकदा तरी पहिलं रिपोर्टिंग याच पायर्यांवर करीत असे. ती सवय असे, आवड असे. माझी सगळी सिनेपत्रकारीता फिल्डवर्कवर घडल्याने मला पुस्तकाबाहेरचे (आता गुगलबाहेरचेही) जग जास्त माहित असल्याने या पायर्यांवर गप्पा रंगत.
लग्नानंतर बोरीवलीत राहयला आल्यानंतरही आमची खोताची वाडीत अजून अजूनपर्यंत खोली होती आणि आजही गिरगावात गेल्यावर, खोताची वाडीत गेल्यावर पायर्यांवर लक्ष जाणे स्वाभाविकच. अशी ही २८ क्रमांकाची वास्तू आता पाडली जात असतानाच हेरिटेजचा मुद्दा उपस्थित झालाय. खोताची वाडी वास्तूस्थापत्याचा उत्तम नमुना म्हणून ती ‘आहे तशीच जपायचीय ना?’ काही असो. ही वास्तू किमान तीन-चार पिढ्यांचे भावविश्व आहे, खूपच आठवणी आहेत. ‘बत्तीजवळ’ हा बोली भाषेतील शब्द झाला. पण म्हटलं तर ती एका नाटकाची / चित्रपटाची / वेबसिरिजची थीम ठरू शकते. जुन्या मुंबईच्या खाणाखुणांसह ती बहुस्तरीय नक्कीच आहे. खोताची वाडीला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्य, चित्रपट अशा सगळ्याच क्षेत्रात स्थान मिळालंय. हा खूपच मोठा प्रवास आहे. त्यात आमच्या ‘पायर्यांवरची साथ’ खूप महत्त्वाची….