उद्धव ठाकरे यांनी 2004 साली मुंबईत जातीय दंगल घडवण्याचा कट रचला होता. त्यांची ही पार्श्वभूमी पाहता गेल्या नऊ महिन्यांत महाराष्ट्रात झालेल्या छोट्या-मोठ्या दंगलींमागे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीचा तर हात नाही ना, याची राज्याच्या गृह खात्याने चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.
13 ऑगस्ट 2004 रोजी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीमध्ये आणखी दोघांना बोलवून घेतले होते. त्यात एक तेव्हाच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस आणि आताच्या शिवसेनेचे शिंदेसमर्थक खासदारांचा समावेश होता. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांना 1992-93च्या दंगलीप्रमाणे दंगल घडवण्याचे आदेश दिले. त्यांनी चर्नीरोड परिसरातील तसेच दक्षिण मुंबईतील काही मुस्लिम फेरीवाल्यांवर वस्तऱ्याने तसेच तलवारीने हल्ला करायचा. त्यामुळे दंगल सुरू होईल. ही दंगल भडकवण्याची जबाबदारी माझी असे उद्धव ठाकरे यांनी त्यांना सांगितले. हे खासदार तसेच तेव्हा उपस्थित असलेले अन्न पदाधिकारी या दोघांनाही आपण आपल्यासमवेत यावर बोलण्यासाठी केव्हाही बसवू शकतो, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले. 1992-93च्या दंगलीनंतर शिवसेनेची सत्ता आली. त्याचप्रमाणे आताही दंगल करून आपली सत्ता आणायची आणि आपण मुख्यमंत्री बनायचं असे स्वप्न तेव्हापासून उद्धव ठाकरे पाहत आहेत, असेही ते म्हणाले.
राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. मालवणीची रामनवमीची दंगल असू दे किंवा छत्रपती संभाजीनगर येथील दंगल असू दे, या दंगलीमागे उद्धव ठाकरे यांचा हात तर नाही ना हे तपासण्याची वेळ आली आहे, कारण मुख्यमंत्री बनण्यासाठी राज्यातल्या जनतेला वेठीला धरायची यांना सवय आहे. 1999नंतर तेव्हाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आजारी नसतानाही ते आजारी आहेत, असे वातावरण तयार करून याच उद्धव ठाकरेंनी त्यांचे सर्व प्रचारदौरे रद्द करण्याचा घाट घातला होता. नारायणराव राणे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी हा डाव उधळून लावला. यावरून उद्धव ठाकरे किती कपटी माणूस आहे, हे दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांचा कैदी नंबर 8959 असा उल्लेख करून नितेश राणे म्हणाले की, संजय राजाराम राऊत लँड माफीया आहेत. अलिबागमधल्या किहिम येथील उशीरकर नावाच्या एका कुटुंबाकडून दमदाटीने त्यांनी कोट्यावधी रुपयांची जमीन अवघ्या दहा-पंधरा कोटींत घेतली. भांडुप आणि विक्रोळी परिसरात आर वरून म्हणजे र वरून सुरू होणाऱ्या एका बिल्डरबरोबर त्यांची पार्टनरशिप आहे. या बिल्डरच्या माध्यमातून त्यांनी किती जमिनी हडपल्या याचेही उत्तर त्यांनी जनतेला द्यावे.

बेळगावमध्ये जाऊन मराठी माणसासाठी मते मागणारे संजय राऊत यांनी मराठी माणसालाच फसवले आहे. गोरेगाव येथील पत्रा चाळीतल्या अनेक मराठी कुटुंबांना यांनी रस्त्यावर आणले. त्यांची घरे बळकवाली. या प्रकरणात ते स्वतः जामीनावर आहेत. अशा दरोडेखोर लुटमार करणाऱ्या चॅप्टर माणसाचे ऐकून तुम्ही मतदान करू नका. हा चपट्या पायाचा पनवती असलेला घरफोड्या माणूस आहे. त्याचे ऐकू नका असे आवाहनही त्यांनी केले.
लोकप्रभेत असताना याच संजय राजाराम राऊत यांनी बाळासाहेबांना, त्यांच्या विरोधात लिहून भरपूर हैराण केले होते. बाळासाहेब इतके हैराण झाले होते की त्यांनी त्यावेळी राऊताच्या पार्श्वभागावर वार करण्याची इच्छाही बोलून दाखवली होती. ते कोणासमोर बोलले होते हे मी सांगत नाही. पण हा माणूस राजकीय लावारीस आहे. तो कोणाचाच होऊ शकत नाही. बाळासाहेबांचा झाला नाही. पवारांचाही राहणार नाही आणि उद्या उद्धवचाही राहणार नाही असे नितेश राणे यांनी सांगितले.
दि केरला स्टोरी, या चित्रपटावरून जितेंद्र आव्हाड यांनी फाशीची, लटकवण्याची भाषा केली आहे. त्यांना मी एवढेच सांगतो, जर तुम्ही लटकवण्याची भाषा कराल तर आम्ही फटकावण्याची भाषा करू. उद्धव ठाकरे, नवाब मलिक यांचे सरकार आता राहिलेले नाही. महाराष्ट्राला एक सक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, बाळासाहेबांचे हिंदुत्व मानणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथे कार्यरत आहेत. त्यांच्या विधानाची गृहमंत्रालय योग्य ती दखल घेईलच. पण एकच सांगतो की केरला स्टोरीच्या प्रोड्युसर किंवा डायरेक्टरच्या नखालाही धक्का लागला तर आव्हाडसारख्या जिहादी विचारांच्या माणसांची नाक्यानाक्यावर जी हालत होईल की त्यावर एक पिक्चर काढावा लागेल, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला. हिंदूंविरुद्ध जर षडयंत्र रचले जात असेल तर आम्ही अशी हालत करू की पाच वेळचा भोंगा वाजवण्याची हिंमतसुद्धा त्यांच्यात राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

