राजीनामा दिलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्यांची इतकी केविलवाणी स्थिती आपण पूर्वी कधीही पाहिली नव्हती. तशी वेळ कोणावरही येऊ नये, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.
पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात केंद्र सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून विधानभवनापर्यंत सायकल मार्च काढण्यात आला होता. त्यानिमित्त बोलताना फडणवीस यांनी ही टीका केली. संजय राठोड प्रकरणात त्यांना धडधडीत खोटे बोलताना अडचण होत होती. पण एखाद्याला साधुसंत ठरवायचेच असेल तर मग तुमची नैतिकता गेली कुठे, असा सवाल त्यांनी केला.
हल्ली प्रत्येक मंत्री झाला मुख्यमंत्री!
मुंबईच्या वरळीत काल रात्री उशिरापर्यंत बार चालत असल्याचा आणि तेथे सुरक्षित अंतर, तोंडावर मास्क आदी साऱ्या गोष्टींना तिलांजली गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, वरळीच्या लोकांनी तेथी आमदार व सध्याच्या मंत्र्यांचे बोलणे नीट ऐकावे. त्यांना नाईटलाईफ हवे आहे. त्यामुळे क्लब, बार यांना रात्रभर मोकळीक आहे. सुरक्षित अंतरासह सर्व बंधने शिवजयंतीसाठी आहेत. सरकारचा खरा चेहरा या घटनेने समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता जनतेला कोरोनापासून सावध राहण्याचा सल्ला देण्याऐवजी आपल्या मंत्र्यांना दिला तर उचित राहील. हल्ली प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजून वागत आहे, असेही ते म्हणाले.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी का घाबरता?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संवैधानिक जबाबदारी निभावताना सरकारकडे अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेत आहात, हे विचारले. खरे तर ही निवडणूक घेणे घटनेने बंधनकारक आहे. परंतु तसे न करता हवे तर अविश्वास ठराव आणा, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. बहुमत आहे ना.. मग, अजितदादा निवडणुकीसाठी का घाबरत आहेत, असा सवाल फडणवीस यांनी केला.
हा तर पब्लिसीटी स्टंट
नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखालील सायकल मार्चची त्यांनी खिल्ली उडवली. केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या माध्यमातून मिळणाऱ्या करांपैकी ५५ टक्के पैसा राज्याला परत मिळतो. राज्य सरकारलाही कररूपाने बराच पैसा मिळतो. ते सरकारमध्ये आहेत. त्यांनी हे कर कमी करून गुजरात, मध्य प्रदेशप्रमाणे जनतला १० रूपयांपर्यंतचा दिलासा द्यावा. राज्य सरकारला हे दाखविण्यासाठी नानांनी हा मोर्चा काढला असावा. किंवा राज्य सरकार इंधनावरील काही कर कमी करणार असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे त्याचे श्रेय उपटण्याचाही हा प्रयत्न असावा, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत आम्ही सत्तेत असताना योग्य ती भूमिका न्यायालयासमोर मांडली. आताही सरकार या विषयावर जी काही भूमिका घेईल, त्यात आम्ही सरकारच्या बाजूने उभे राहू, असेही ते म्हणाले.
विधानभवनाबाहेर घोषणाबाजी
विधानभवनावर काँग्रेसचे आमदार सायकल घेऊन येत असल्याचे समजल्यावर भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी त्यांना प्रांगणातच गाठले आणि काँग्रेसविरोधी घोषणा दिल्या. काँग्रेसचे काही सदस्य आपल्या घोषणांनी त्याला प्रत्त्युत्तर देताना दिसत होते. परंतु त्यात ते कमी पडत असल्याचे जाणवले.

