Homeपब्लिक फिगरप्रत्येकाचे दिवस असतात!...

प्रत्येकाचे दिवस असतात! आपले आणायचेच!!

शिवसेनेस 56 वर्षे झाली, भारतीय कामगार सेनेस 55 वर्षे… 55 वर्षांची होऊनदेखील आपली भारतीय कामगार सेना अजून तरुण आहे! दत्ताजी साळवींसारखी निष्ठावंत लोकं काही घेण्यासाठी आलीच नव्हती, देण्यासाठी आली होती. मुलुखमैदानी तोफ कशाला म्हणतात हे दत्ताजींची भाषणे ज्यांनी ऐकली त्यांनाच समजू शकेल. त्या काळी युनियन तुझी की माझी यावरुन मारामारी होत असे… आता युनियनच्या मारामार्‍या संपल्या. कारण, सरकारच युनियन संपवायला लागले. हा पायंडा घातक आहे. सरकारचं असं आहे की कॉन्ट्रॅक्टरचे लाड करायचे आणि प्रसाद खायचा. प्रत्येकाचे दिवस असतात, आपले दिवस गेलेत असं मी म्हणूच शकत नाही, आणायचेच! त्या वेळेला आपण जो काही प्रसाद देऊ, तो त्यांना आयुष्यभर लक्षात राहिल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

मुंबईत भारतीय कामगार सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थित कामगारांसमोर ते बोलत होते. आता कामगार दिन येत आहे. ‘जय जवान, जय किसान’ला शिवसेनाप्रमुखांनी जोड दिली होती, ‘जय कामगार’! कारण तुम्ही देश घडवत असता… मोर्चे निघतात, परंतु सरकार संवेदनाशील असायला हवे. युतीचे सरकार असताना शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, मोर्चे येतील. परंतु, मोर्चे आल्यावर ते पोलिसांकरवी अडवायचे नाहीत, ज्या खात्याबद्दल मोर्चा असेल त्या खात्याचा मंत्री 6व्या मजल्यावरुन खाली उतरून मोर्चास सामोरा जायला पाहिजे. ही संवेदनाशीलता राहिली कुठे?, असा सवाल त्यांनी केला.

केवळ 60 टक्के कामगार संघटित आहे, बाकीचा सर्व असंघटित आहे. अडीच वर्षांत आपण 25 मोठे उद्योग आणि अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपण आणत होतो. काही आणली. त्यातील बरेचसे यांनी डोळ्यादेखत पळवून नेले, ओरबाडून नेले, तरी शेपट्या घालून आत बसणारे आता बाळासाहेबांचे विचार दाखवत आहेत. हे बाळासाहेबांचे विचार? ज्या शिवसेनेचा जन्मच मुळी भूमीपुत्रांच्या न्याय्यहक्कांसाठी झाला त्या भूमीपुत्रांवर अन्याय करुन येऊ घातलेले उद्योगधंदे बाजूला स्वत:च्या राज्यात नेत आहेत तरी शेपट्या यांच्या आत! हे कसले बाळासाहेबांचे विचार?, असे ते म्हणाले.

सध्याचे निरुद्योगी मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तैवानच्या कंपनीसोबत एमओयु केला होता. 2300 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार म्हणून फोटो काढले. ती जोडे बनवणारी कंपनीदेखील तामिळनाडूत गेली. हे बसलेत जोडे पुसत! फक्त जोडे पुसण्याची लायकी असलेली लोकं राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय? ज्या पद्धतीने पाठीत वार करुन सरकार पाडलं त्याचा बदला घ्यायचाय… आणि तो घेणारच!, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

कामगारांना किती प्रकारे छळणार? मशीन वेगळी आणि तीदेखील बिघडते. जीतीजागती माणसं, त्यांचा माणूस म्हणून तुम्ही कधी विचार करणार की नाही? की नुसतंच कामगार म्हणून वाट्टेल तसं त्यांना वापरणार? शिवसेना सत्तेत असताना काय होतं? अरविंद तिकडे सत्तेत असताना, मी मुख्यमंत्री असताना हा काळा कायदा रोखला होता. आम्हीं दोघही सत्तेतून बाहेर गेल्यावर हा काळा कायदा आणला. मग नुकसान कुणाच झालं? माझ झालं? अरविंदचं झालं? की राज्याचं झालं? कामगारांच झालं?, असा सवाल त्यांनी केला.

बारसूवरुन रान पेटवलं जातयं. उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं होतं… हो दिलं होतं, मी कुठे नाही म्हणतोय. पण मी मुख्यमंत्री होतो तेव्हा पत्र दिलं होतं तरी अडीच वर्षांत पोलीसांकरवी  जबरदस्ती केली नव्हती. बारसूबद्दलची, नाणारबद्दलची माझी भूमिका ही तेथील लोकांची भूमिका! कुणाची सुपारी तुम्ही घेत आहात? जमीन आमची आणि इमले तुमचे… हे होऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content