गुजरातमधील नरोदा दंगलीतील ज्या लोकांची हत्त्या झाली, ती हत्त्या कशाने झाली? जर कुणी हल्लाच केला नाही तर हत्त्या झाली कशी? हत्त्या होते आणि हत्त्येकरू निर्दोष सोडले जातात, म्हणजे एकादृष्टीने ज्यांची हत्त्या झाली त्यांचीही हत्त्या झाली आणि या देशातल्या संविधानाची, कायदा-सुव्यवस्थेचीही हत्त्या झाली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल केले.
मुंबईतल्या घाटकोपर येथे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. काही वर्षापूर्वी गुजरातमध्ये धार्मिक हिंसेत जी हत्या झाली. ही जातीय दंगल होती. यामागे गुजरातमधील सत्ताधारी पक्ष होता. त्यात ज्यांना अटक झाली. त्यात एक महिला होती. त्या मंत्री, आमदारही होत्या. इतके दिवस ती केस चालली त्या लोकांना अटक झाली आणि लगेचच जामीन दिला आणि केस वर्षानुवर्षे सुरू राहिली आणि त्या केसचा निकाल लागला त्यातील सर्व लोक निर्दोष म्हणून सोडले. आज जे घडले आहे ते ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी सत्तेचा वापर ज्यापध्दतीने करत आहेत ते दिसत आहे असेही शरद पवार म्हणाले.
‘महाराष्ट्र भूषण’ हा कार्यक्रम राज्यसरकारचा आहे. राज्यसरकारचा कार्यक्रम असतो त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी निमंत्रित म्हणून शंभर टक्के राज्यसरकारची असते. मला केंद्र सरकारने ‘पद्मविभूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार घेण्यासाठी मला राष्ट्रपती भवनला जावे लागले. निमंत्रित केंद्र सरकार होते. हा पुरस्कार घेण्यासाठी माझ्या समवेत फक्त दहा लोक होते याची आठवण शरद पवार यांनी सरकारला करून दिली. ‘महाराष्ट्र भूषण’ हा कार्यक्रम धर्माधिकारी यांच्या सन्मानाचा होता. हा कार्यक्रम धर्माधिकारी यांच्या संघटनेने आयोजित केला नव्हता तर तो महाराष्ट्र सरकारने आयोजित केला होता. त्याठिकाणी लोक मृत्युमुखी पडले. केवळ राज्यसरकारने खबरदारी घेतली नसल्याने ते लोक मृत्युमुखी पडले, असा आरोप त्यांनी केला.
एवढा प्रचंड उन्हाळा. उष्माघाताची शक्यता असताना हा कार्यक्रम उघड्यावर घेतला जातो याचा अर्थ सरकारला आपली प्रचंड शक्ती जमवून त्यातून अनुकूल वातावरण महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणूकीत करायचं होते मात्र यातून बेफिकीरपणा दाखवला गेला आणि त्याची किंमत काही निष्पाप लोकांना द्यावी लागली. याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली.
खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी आपले विचार मांडताना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

