Tuesday, March 18, 2025
Homeडेली पल्समहत्त्व अक्षय (अक्षय्य) तृतीयेचे!

महत्त्व अक्षय (अक्षय्य) तृतीयेचे!

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. ‘मदनरत्न’ या पुरातन संस्कृत ग्रंथातील संदर्भानुसार अक्षय्य तृतीया हा कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. या तिथीला हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता 10 टक्क्यांनी वाढते. या कालमाहात्म्यामुळे या तिथीस पवित्र स्नान, दान यासारखी धर्मकृत्ये केल्यास त्यांच्यामुळे आध्यात्मिक लाभ होतो. या तिथीस देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते. सनातन संस्थेद्वारा संकलित लेखातून अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया.

1. महत्त्वः

अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं

तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया।

उद्दिश्य दैवतपितॄन्क्रियते मनुष्यैः

तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव।। – मदनरत्न

अर्थ: (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.

‘साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाणे- अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसर्‍या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचा परिणाम २४ घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच (अक्षय्य) तृतीया या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाते.

अवतार होणे- अक्षय (अक्षय्य) तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. यावरून अक्षय तृतीया या तिथीचे महत्त्व लक्षात येते.

2. अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत: कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवसाचा विधी असा आहे – पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.

उदकुंभाचे (उदककुंभाचे) दानः

या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे. उदककुंभालाच ‘सर्वसमावेशक स्तरावरील निर्गुण पात्र’ असे संबोधले जाते.

उदकुंभ दानाचा मंत्र: ब्राह्मणाला उदकुंभाचे दान देतांना पुढील मंत्र म्हणावा

एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः। अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः।।

गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितम्। पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु।। – धर्मसिन्धु

अर्थ: ब्रह्मा, विष्णु आणि शिव ज्यात सामावले आहेत असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केला आहे. या दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त होवोत. गंध, उदक, तीळ, यव आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय्य (क्षय न पावणारा) ठरो.

तिलतर्पण करणे- तिलतर्पण म्हणजे देवता आणि पूर्वज यांना तीळ अन् जल अर्पण करणे. तीळ हे सात्त्विकतेचे प्रतीक आहे, तर जल हे शुद्ध भावाचे प्रतीक आहे.

तिलतर्पण कोणाला करायचे?

देवता- प्रथम देवांचे आवाहन करावे. तांब्याचे किंवा कोणत्याही सात्त्विक धातूचे तबक किंवा ताट हातात घ्यावे. ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांचे किंवा त्यांच्या एकत्रित रूपाचे, म्हणजे दत्ताचे स्मरण करून त्यांना ताटात येण्याचे आवाहन करावे. त्यानंतर ‘देवता सूक्ष्मातून तेथे आलेल्या आहेत’, असा भाव ठेवावा. त्यानंतर ‘त्यांच्या चरणांवर तीळ अर्पण करीत आहोत’, असा भाव ठेवावा.

पूर्वज- अक्षय तृतीयेला पूर्वज पृथ्वीजवळ आल्यामुळे मानवाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. मानवावर असलेले पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित आहे. यासाठी अक्षय (अक्षय्य) तृतीयेला पूर्वजांना गती मिळण्यासाठी तिलतर्पण करायचे असते.

धर्मकृत्यांचा अधिक लाभ होणे- या तिथीला विष्णुपूजा, जप, होमहवन, दान आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्‍या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते. श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा.

मृत्तिका पूजन– सदोदित कृपादृष्टी ठेवणार्‍या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती होते. अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञता भाव ठेवून मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.

मातीत आळी घालणे आणि पेरणी- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय (अक्षय्य) तृतीया या दिवसापर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मृत्तिकेमध्ये आळी घालावीत आणि त्या आळ्यांमध्ये बियाणे पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास प्रारंभ केल्यास त्या बियाण्यांपासून विपुल धान्य पिकते आणि बियाण्याचा कधीही तुटवडा होत नाही. त्यामुळे वैभव प्राप्त होते.

वृक्षारोपण- अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात, तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.

हळदीकुंकू- स्त्रियांसाठी अक्षय तृतीया हा दिवस महत्त्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी त्यांना विसर्जन करायचे असते. त्यानिमित्त त्या हळदीकुंकूही करतात.

3. अक्षय तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व: अक्षय (अक्षय्य) तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. सत्पात्रे दान करणे, हे प्रत्येक मनुष्याचे परम कर्तव्य आहे’, असे हिंदु धर्म सांगतो. सत्पात्रे दान म्हणजे सत्च्या कार्यार्थ दानधर्म करणे! दान केल्याने मनुष्याचे पुण्यबळ वाढते, तर ‘सत्पात्रे दान’ केल्यामुळे पुण्यसंचयासह व्यक्तीला आध्यात्मिक लाभही होतो. येथे सत्पात्रे दान, म्हणजे जेथे अध्यात्मप्रसारासमवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य केले जाते, अशा सत्‌च्या कार्यात दान करणे. संत, धार्मिक कार्य करणार्‍या व्यक्ती, धर्मप्रसार करणार्‍या आध्यात्मिक संस्था, धर्माविषयीचे उपक्रम आदींना वस्तू वा द्रव्य रूपाने दान करणे हे काळानुरुप सत्पात्रे दानच आहे. तसेच धर्माविषयीच्या उपक्रमांत सहभागी होणे, हे तनाचे दान होय, यासाठी देवतांचे विडंबन, धार्मिक उत्सवांतील अपप्रकार इत्यादी रोखावे. कुलदेवतेचा जप करणे, तिला प्रार्थना करणे यांद्वारे मन अर्पण (दान) करावे. 

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

संपर्क: 9920015949

Continue reading

सिबिईयु शालेय कॅरम स्पर्धेत तनया दळवी अजिंक्य

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सिबिईयु व न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेडच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे अजिंक्यपद राष्ट्रीय ख्यातीची सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवीने पटकाविले. महात्मा गांधी विद्यालयाच्या तनया दळवीने संपूर्ण डावात अचूक खेळासह राणीवर कब्जा राखत...

गणपतीचरणी झाली ‘झापुक झुपूक’च्या प्रमोशनला सुरुवात!

'बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या ज्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या चित्रपटाच्या प्रमोशनला...

आमदार सचिनभाऊ चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धा उद्या

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने आमदार सचिनभाऊ अहिर चषक १६ वर्षांखालील शालेय मुलामुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा उद्या, १८ मार्चला परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनरल सेक्रेटरी...
Skip to content