मुंबईचे फुफ्फुस म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील झाडे-झुडपे, हिरवळ नष्ट करत रोज शेकडो ट्रक, टेम्पो इमारतींचे डेब्रिज येथे टाकून पर्यावरणला मोठी हानी पोहोचवत आहेत, असे सांगत मागाठाणे येथील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी यासाठी जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या उद्यानातील काजूपाडा, हनुमान नगर येथे ट्रकमधून रोज डेब्रिज टाकण्यात येत असल्याने येथील झाडे नष्ट झाली आहेत. डेब्रिजमुळे येथे मोठे डोंगर झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी आपण झाडे लावा, झाडे जगवा, या उक्तीप्रमाणे पावसाळ्यात सुमारे एक लाख झाडे लावतो आणि भूमाफिया अशाप्रकारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काजूपाडा, हनुमान नगर येथे ट्रक, टेम्पोमधून रोज डेब्रिज टाकतात. त्यामुळे येथील पर्यावरणाला मोठी हानी पोहोचत आहे. जर आदिवासी बांधवांनी आणि नागरिकांनी आपल्या घरांची डागडुजी केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येते. मात्र पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
याप्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री व वन मंत्र्यांनी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि येथील पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली आहे.

