मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं की, तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाऊ नका. मी त्यांना सोडून आलो आहे. तुमचं काय तिकडे काम आहे? उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी भडकवले. त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही तिकडे गेल्यामुळे तुम्हाला झाला धोका आणि एकनाथ शिंदे आमच्याकडे आल्यामुळे तुमचा झाला खोका… असे उद्गार रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले.
रविवारी मुंबईतल्या सोमय्या मैदानावर रिपब्लिकन पक्षाचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिवसेना-आरपीआयचा झेंडा फडकवणार. उद्धव ठाकरे यांचा झेंडा तिथेच अडकवणार, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देश विकास करत आहे. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालीही महाराष्ट्राचा विकास होतोय. मुंबईची सत्ता बऱ्याच वर्षांपासून उद्धव ठाकरेंकडे आहे. ती भाजपच्या पाठिंब्यामुळे होती. आम्ही ही सत्ता उद्धव ठाकरे यांच्या हातातून खेचून आणणार. रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत जातो त्यांचा विजय होतो. ज्यांच्या विरोधात जातो त्यांचा सत्यानाश होतो, असे ते म्हणाले.
शिवसेनेचे नाव, चिन्ह गेलं. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्यानंतर काय होतं हे तुम्हाला समजलं. नरेंद्र मोदी यांचं नेतृत्त्व पॉवरफुल आहे. भाजपा, नरेंद्र मोदी संविधानाच्या विरोधात नाहीत. बाबासाहेबांचे विचार मजबूत करण्याचे काम मोदी करत आहेत. जगातील एक नंबरचे लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदींना हसवण्याचे सामर्थ्य कोणात नाही. मात्र या पठ्ठ्याने नरेंद्र मोदी यांना हसवलं आहे. नरेंद्र मोदींना हसवता हसवता मी राहुल गांधींना फसवलं आहे. वेळोवेळी राहुल गांधी काहीही उलटसुलट बोलत असतात. राफेल राफेल करून नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचे काम राहुल गांधी यांनी केलं. हे सरकार स्वच्छ आणि पारदर्शक काम करणारे सरकार आहे. राहुल गांधींशी नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकत नाही.
काँग्रेसने काय केलं? सत्तर वर्षांत भारत जोडला नाही. आज भारत जोडण्याची त्यांना आवश्यकता भासते. हे नाटक आहे. त्यांचं हे नाटक २०२४ला आम्ही उघड करणार. भाजप दलितांच्या विरोधात आहे हे काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंचे लोक बोलतात. ते चुकीचे आहे.
ज्या ठिकाणी भाजप, एकनाथ शिंदे यांचा उमेदवार असेल तिथे आम्ही पाठिंबा देणार. आमचा उमेदवार असेल तर तुम्ही पाठिंबा द्या आणि निवडून आणा. मुंबई महानगरपालिकेत आमची होणार नाही हार… कारण आमच्यासोबत आहेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार… काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर आम्ही करणारा वार… असेही आठवले म्हणाले.
सत्ता आल्यास आरपीआयचा उपमहापौर – आशिष शेलार
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रिपब्लिकन नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आपल्याला मुंबई महानगरपालिकेची सत्ता आणायची आहे. भारतीय जनता पार्टी, आरपीआय शिंदे यांची ओरिजिनल शिवसेना यांची सत्ता मुंबई महानगरपालिकेत येणार म्हणजे येणार.. पाच वर्षांची सत्ता हातात आली तर पहिल्या वर्षाचे उपमहापौरपद आरपीआयला देणार, अशी घोषणा मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावेळी केली.
या मेळाव्याला गेलेच पाहिजे असा आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्यामुळे या मेळाव्यासाठी कोकणातून आलो. रामदास आठवले यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. मित्र आणि मैत्री असावी कशी याचं जिवंत उदाहरण म्हणजे रामदास आठवले.
मी पण चारोळी लिहिल्या आहेत…
“किती आले किती गेले, मुंबई फक्त रामदास आठवले
साहेबांवर टीका करणारे सगळे संपले, मुंबईत राहिले केवळ रामदास आठवले
मुंबईच्या निवडणुकीसाठी कित्येक जण कुर्निसात करून कुणासमोर झुकले उद्धव गट
अहंकारामुळे पक्ष गेले, सरकार गेले, चिन्ह गेले, पण जनसेवक म्हणून भाजपसोबत राहिले रामदास आठवले”
असे शेलार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे उडाले.
मतासाठी त्यांनी मोदींचे फोटो दाखवले. उद्धव गटाला सांगतो, स्वार्थी सत्तेसाठी विश्वासघातकी झाले. पण आदर्श मैत्रीचे उदाहरण रामदास आठवले तुमच्यासोबत आम्ही आहोत. महापुरुषांचा अपमान करण्याची परंपरा सुरू झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी, बगलबच्च्यांनी सुरू केली आहे. रोज टीव्ही सुरू केला की सकाळी कार्टून शो सुरू होतो. भांडुपमध्ये कार्टून शो सुरू होतो. हे कार्टून नालायक आहे. छत्रपतींच्या वंशजाचे त्यांना पुरावे लागतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानावर प्रश्न उपस्थित केला जातो. सावरकरांचा अपमान, बाबासाहेबांचा अपमान करणारा टवाळखोर पक्ष आहे उद्धव ठाकरेंचा… हातात हात घेऊन एक प्रण करावा लागेल. आपल्याला
मुंबईला टक्केवारीमुक्त करायचे आहे, हे लक्षात ठेवावे लागेल, असेही शेलार म्हणाले.
मोदींचे आवडते मंत्री आठवले – मंगल प्रभात लोढा
नरेंद्र मोदी यांचे आवडते मंत्री रामदास आठवले आहेत. देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. पण त्यांचं मन या मेळाव्याकडे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जाणारे रामदास आठवले आहेत. लंडनमध्ये दोनच फॅन क्लब आहेत एक नरेंद्र मोदी आणि दुसरा रामदास आठवले यांचा… दुःख जाणारा नेता म्हणजे रामदास आठवले. करोडो लोकांचा आवाज रामदास आठवले आहेत, असे राज्याचे पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.
भगवान आणि निळा पोहोचवायचा आहे – सीमाताई आठवले
लढाई आता सुरू झाली आहे. भगवान आणि निळा महानगरपालिकेत पोहोचवायचा आहे. आरपीआयमध्ये जास्तीतजास्त उमेदवारी महिलांना मिळावी. आम्ही या महिलांना निवडून आणूया. पक्षाची ताकद वाढवूया. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार रामदास आठवले पुढे घेऊन चालले आहेत. त्यांना साथ देऊया, असा निर्धार रिपब्लिकन महिला आघाडीच्या नेत्या सीमाताई आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

