Homeपब्लिक फिगरसावरकर? राहुल गांधींना...

सावरकर? राहुल गांधींना त्यांच्या तीन पिढ्यांपलीकडे काही माहित नाही!

प्रखर देशभक्त, विज्ञानवादी समाजसुधारक, बुद्धिमान महाकवी, इतिहासकार, तत्त्वज्ञ आदी असंख्य पैलूंनी परिपूर्ण असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या महामानवावर राजकीय स्वार्थातून चिखलफेक करणारे राहुल गांधी यांना आपल्या कुटुंबातील तीन पिढ्यांपलीकडचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास माहीत नाही. सावरकरांचा द्वेष करून हीन राजकारण करणाऱ्या राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी, मनमोहन सिंह, प्रणव मुखर्जी आदी काँग्रेस नेत्यांच्या सावरकरांविषयीच्या मतांचा अभ्यास करावा, असा खोचक सल्ला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज चितौडगढ (राजस्थान) येथे स्वा. सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना दिला.

आपल्या प्रदीर्घ भाषणात स्वा. सावरकरांच्या राष्ट्रभक्तीची अनेक उदाहरणे देत तावडे यांनी सावरकर यांच्या साहित्यिक पैलूंची अभ्यासपूर्ण उकल केली. दुर्दैवाने आज क्षुद्र राजकारणापोटी स्वा. सावरकरांच्या विचारांचा विपर्यास करण्याची मोहीम राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसी लाळघोट्यांनी सुरू केल्याने सावरकरांच्या शतपैलू व्यक्तिमत्वाचे देशाला नव्याने दर्शन घडविण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

इंदिरा गांधींनी स्वा. सावरकरांवर पहिले टपालतिकिट प्रसिद्ध केले, डॉ. मनमोहन सिंह यांनी सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील श्रेष्ठ योगदान मान्य केले. पण सोनिया गांधी आणि काँग्रेसचे स्वघोषित सर्वेसर्वा असलेले त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी हा इतिहास जाणून घ्यावा, असे तावडे म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर देशभक्त आणि सशस्त्र क्रांतिकारक तर होतेच, पण ते महान साहित्यिकही होते. काव्य, नाटक, साहित्य, चिंतनपर लेखन, अशा साहित्याच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या उत्तुंग प्रतिभेचा आविष्कार घडविला. सावरकरांच्या काव्यप्रतिभेचे उत्कट रसग्रहण करीत तावडे यांनी सावरकरांच्या अजरामर कवितांचा अवघा पट उपस्थितांसमोर उलगडला. गोमांतक, सप्तर्षी, रानफुले, कमला, अग्निजा, अग्निनृत्य, कुसुमसंचय अशा प्रतिभासंपन्न काव्यातूनही सावरकरांचे समाजभान आणि प्रखर राष्ट्रनिष्ठेचे प्रतिबिंब उमटते, असे ते म्हणाले.

आपल्या भाषणात तावडे यांनी सावरकरांच्या ‘स्वतंत्रतेचे स्तोत्र’ या कालजयी काव्याची महती अत्यंत रसाळ भाषेत विशद केली. अवघ्या विसाव्या वर्षी रचलेले, मराठी भाषेचा दागिना म्हणता येईल असे हे काव्य म्हणजे सावरकरांच्या प्रतिभेचे आणि स्वातंत्र्याच्या उत्कट अभिलाषेचे अप्रतिम दर्शन आहे, असे ते म्हणाले. या देशात सरस्वतीची पूजा झाली, लक्ष्मीची पूजा झाली, दुर्गामातेची पूजा झाली, मात्र स्वातंत्र्यदेवतेची पूजा झाली पाहिजे, असे सावरकरांना वाटत होते. या देशात बुद्धिमत्ता आहे, पैसा आहे, शक्ती आहे, पण स्वातंत्र्य नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी या शत्रूलाच उपयोगी पडतात. आमची शक्ती, आमची बुध्दी आणि आमच्या पैशावर शत्रू आक्रमण करतो. त्यामुळे आता स्वातंत्र्याची पूजा केली पाहिजे. ही पूजा सोपी नसते. त्यासाठी प्रसंगी प्राणाचा नैवेद्य अर्पण करावा लागतो. याचीही जाणीव सावरकरांना होती. सावरकरांच्या या अजरामर काव्यात त्यांची दैवी प्रतिभाशक्ती आपल्याला दिसते, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यदेवतेची आराधना करणाऱ्या कवी सावरकरांचे हे काव्य संपूर्ण भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणारे अजरामर गीत झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी या गीताची महती सांगितली.

 

मार्सेलिस येथे बोटीमधून उडी मारून ब्रिटीशांच्या हातावर तुरी देण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही, पण त्यांची ही उडी त्रिखंडात गाजली. त्यानंतर इंग्रजांकडून पूर्वीपेक्षाही अधिक छळ सुरू झाला, तरी सावरकर खचले नाहीत. उलट, “अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला” अशा शब्दांत इंग्रजांना आव्हान देत दुर्दम्य धाडसाचा आदर्श त्यांनी पुढच्या पिढ्यांसमोर ठेवला. शिवशंकराने हलाहल पचविले, त्याप्रमाणे तुम्ही माझा कितीही छळ केला, तरी मी ते सगळ सहन करीन, परंतु कधीही शरण येणार नाही, या त्यांच्या बाणेदारपणाचा उल्लेख करून तावडे यांनी सावरकरांच्या जाज्वल्य आत्मनिष्ठेचा पैलूदेखील श्रोत्यांसमोर उलगडला. 

मुंबईतील एका स्पर्धेमध्ये सावरकरांनी वाचलेल्या ‘बालविधवा दुस्थिती कथन” या कवितेतून सावरकरांची स्त्रियांच्याकडे बघण्याची दृष्टी किती उदार आणि प्रागतिक होती, याचे दर्शन घडते. त्या काळातील विधवा स्त्रियांना दुसरा विवाह नाकारणाऱ्या समाजव्यवस्थेवर सावरकरांनी या कवितेतून अत्यंत संवेदनशीलतेने प्रश्नचिन्हे उमटविली आणि वर्षानुवर्षे दुःस्थितीमध्ये खितपत पडणाऱ्या विधवा स्त्रियांवरील अन्याय दूर करून त्यांनी पुन्हा लग्न करण्याची परवानगी दिली पाहिजे, असा प्रागतिक विचार मांडणाऱ्या या कवितेमधून सावरकरांचा जुन्या रुढी परंपरांवर आघात करणारा दृष्टिकोन प्रकट होतो, असेही त्यांनी सांगितले.

इंग्लंडमध्ये अटक झाल्यानंतर वहिनी आणि पत्नीची भेट होईल की नाही अशी हुरहूर लागलेल्या सावरकरांच्या लेखणीतून अवतरलेले आणखी एक प्रतिभाशाली काव्य म्हणजे, माझे मृत्युपत्र. “मी भारतमातेच्या पायाशी माझं संपूर्ण जीवन आणि माझं सगळ कुटूंब अर्पण केलेलं आहे.” असे ते या काव्यात म्हणतात, पण त्याचवेळी, मातृभूमीसाठी केलेल्या त्यागाची अशी यादी करायची असते का, याची जाणीव होते आणि ‘असतो बंधु जरी सात आम्ही, त्वत्स्थंडिलींच असते दिधलें बळी मी” असे ते म्हणतात. देशप्रेमाचे आणि देशासाठी असीम त्यागाची आस असलेल्या या महामानवावर आज मात्र राजकीय स्वार्थासाठी टीका व्हावी हे देशाचे दुर्दैव आहे, अशी खंतदेखील तावडे यांनी व्यक्त केली.

पुढच्या काळात त्यांच्यावर दुर्दैवाचे आघात झाले. मुलाचा म्हणजे प्रभाकरचा मृत्यू झाला. थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना अंदमानच्या कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा झाली. मदनलाल धिंग्रा याला फाशी झाली. यामुळे अस्वस्थ असतानाच फ्रान्सला ब्रायटनच्या समुद्रकिनारी त्यांच्या मुखातून ‘सागरा प्राण तळमळला’, हे मराठी भाषेतील अजरामर काव्य उमटले. भारतातल्या प्रत्येक शिक्षण संस्थेने आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येयवाक्य म्हणून या काव्यपंक्ती हृदयात कोरून ठेवल्या पाहिजेत, असे भावपूर्ण उद्गारही त्यांनी काढले. 

यावेळी बोलताना तावडे यांनी स्वातंत्र्यवीरांच्या धाडसी आणि स्वातंत्र्ययुद्धातील सहभागाच्या तळमळीची अनेक उदाहरणे श्रोत्यांसमोर ठेवली. सावरकर हे जन्मजात देशभक्त होते. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी स्वदेशीचा फटका लिहिला. चाफेकर बंधूंनी पुण्यामध्ये २२ जून १८९७ला रँडचा वध केला आणि वेळेला चाफेकरांचा पराक्रम सांगणारा पोवाडा लिहिला. रँडच्या अत्याचाराचे आणि चाफेकर बंधूंच्या पराक्रमाचे नेमके व अत्यंत उत्कट वर्णन त्यांनी या पोवाड्यात केलेले आहे. याच काळामध्ये सावरकरांनी १९०२मध्ये शिवाजी महाराजांची आरती लिहिली. त्याकाळात सावरकर पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून शिकत होते आणि सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यावं आणि त्यांनी आपल्या सर्वांना परमप्रिय परम पूजनीय असणाऱ्या शिवाजी महाराजांची आरती म्हणावी, अशी त्यांची तळमळ होती. यातून सावरकरांचा शिवाजी महाराजांविषयीचा आदर आणि समवयस्क मुलांच्या मनामध्ये देशभक्तीची पेरणी करण्याची तळमळ दिसून येते, असे ते म्हणाले.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content