नागपुरातील फेज 2 मेट्रो प्रकल्पामुळे शहराच्या बाह्यभागातील ग्रामीण भाग जसे हिंगणा, कामठी, कन्हान, उमियाधाम हे नागपूर शहराला जोडले जातील. याच रितीने मेट्रो फेज तीनच्या विस्तृत प्रकल्प अहवालालासुद्धा सुरुवात झाली असून नाशिकला मंजूर झालेल्या निओ मेट्रोप्रमाणे नागपूरमध्येसुद्धा फेज 3ची मेट्रो अमरावती रोडला जोडेल, अशी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी काल नागपूर येथे केली.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 7वर विमानतळ ते चिंचभवन दरम्यान 70.98 कोटीच्या निधीतून बांधण्यात आलेल्या 1.12 किमी लांबीच्या रेल्वे उडाणपुलाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्थानकाच्या सभागृहात आयोजित एका कार्यकमात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
यासोबतच केंद्रीय रस्ते निधीतून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे 114 कोटीच्या तरतुदीने रहाटे कॉलनी ते खापरी उडाणपूलापर्यंत 5 .6 किमीची ‘व्हाईट टॉपिंग’ची सुधारणा, २७ कोटी रुपये तरतुदीने खापरी रेल्वे उड्डाण पूल ते मनीषनगर लेवल क्रॉसिंगपर्यंत 3.10 किमीचे काँक्रीट रोड आणि 24 कोटी रुपये तरतुदीचे शुक्रवार तलाव ते अशोक चौक या 1 किमी लांबीच्या सिंमेट काँक्रीट रस्ते बांधकामाच्या भूमीपूजनही त्यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी दक्षिण-पश्चिम नागपूरचे आमदार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार दत्ता मेघे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल उपस्थित होते.
वर्धावरून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना या मार्गावर असलेल्या रेल्वेच्या फाटकामुळे खूप त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता उद्घाटन झालेल्या खापरी रेल्वे उड्डाणपुलामुळे हे सर्व प्रश्न सुटणार आहेत. याप्रमाणे रेल्वेमुळे प्रलंबित असलेल्या 81 आरओबीसंदर्भातसुद्धा आपण बैठक घेणार असून वर्ध्याच्या आरओबीचेही काम मार्गी लागेल अशी ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली. केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत 166 कोटीच्या कामाचे भूमिपूजन झाले असून त्याचे काम ताबडतोब सुरू होईल. बुटीबोरी उड्डाणपूल, मेट्रो तसेच इतर रस्त्यांच्या जाळ्यामुळे नागपूर हे लॉजिस्टिक हब म्हणून उदयास येत असून मिहानमधील माहिती तंत्रज्ञान कंपन्या तसेच इतर कंपन्यांमुळे नागपूर आणि विदर्भातील युवकांना येत्या काही वर्षांत लाखोंच्या संख्येत रोजगार मिळतील अशी स्पष्टोक्तीसुद्धा त्यांनी दिली.
फुटाळा येथील फाउंटन शो, विद्यापीठ कॅम्पस ते आरटीओ उड्डाणपुलाचा डीपीआरसुद्धा निघाला असून त्यांचं लवकरच काम सुरू होईल असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमांतून उपस्थित राहिलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर ते काटोल हा चार पदरी रस्ता लवकर बनण्यासाठी केंद्रीय महामार्ग मंत्रालयाने प्रयत्न करावे अशी विनंती गडकरींना केली. यावर गडकरींनी संबंधित रस्त्यांच्या बांधकामासाठी वन खात्याच्या परवानगीची आवश्यकता असल्याचे सांगितले आणि ती मिळाल्यास लवकरच याचे कार्य आदेश काढून या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात येईल अस आश्वासन दिलं.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा शाश्वत विकास हा गडकरी यांच्या नेतृत्त्वाखाली होत असलेल्या विकासकामातून होत असल्याचं सांगितलं. अजनीतील प्रस्तावित इंटर मोडल स्टेशन नागपूरकरांना चांगल्या सुविधा देईल. मिहानमध्ये असलेल्या उच्च शिक्षण संस्था यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे. वर्धा, चंद्रपूर येथे जाणारी वाहतूक जुन्या खापरी उड्डाणपुलावरून जात असे. हा अडथळा या नव्या उड्डाणपुलामुळे दूर झाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.