जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणार्या ऑबेरॉय मॉल ते पंपहाऊसपर्यंतच्या सेवा रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर बैठक लावण्यात येईल तसेच एम. जी. शोरूमने केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती पडताळून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिले.
ऑबेरॉय मॉल ते पंपहाऊस सेवारस्ता रूंदीकरणाचे काम रखडल्याने विधानसभेचे आमदार रविंद्र वायकर यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्याच्या उत्तरात सामंत यांनी हे आश्वासन दिले.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील पी दक्षिण मनपा कार्यालयाअंतर्गत ऑबेरॉय मॉल ते आरे चेकनाका येथे ही सर्वोदय नगर वस्ती वसली आहे. या वस्तीलगतच मोठ्या प्रमाणात खाजगी ट्रॅव्हल्सची दुकाने असून येथे सकाळ-संध्याकाळ खाजगी बसगाड्या अनधिकृतरित्या मोठ्या प्रमाणात उभ्या असतात. गोरेगाव वाहतूक विभागातर्फे या खाजगी बसगाड्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक विभागातर्फे सांगण्यात आले. परंतु यावर कायमस्वरूपी प्रभावी कारवाई करण्यात यावी अशी मागणी वायकर यांनी केली.
सर्वोदयनगर ही वस्ती १८.३० मीटर रुंदीच्या विकास रस्त्यावर नियोजित आहे. ही जागा डेअरी विकास आयुक्त यांच्या मालकीची असून १८.३० मीटर रुंदीच्या विकास नियोजित रस्त्याचे त्यांच्याकडून सीमांकन करुन ही जागा मनपाच्या ताब्यात देणे अद्याप बाकी आहे. येथील रहिवाशांना जवळच पर्यायी जागेत पुनर्वसन करुन उक्त सेवारस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी येथील स्थानिकांची मागणी आहे. त्यामुळे येथील वस्तीचे पुनर्वसन कधी करण्यात येणार? रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम कधी सुरू होणार? आरे चेक नाका ते वनराई या सेवारस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणार्या अदानी कंपनीच्या हायटेंशन वायर व टॉवर कधीपर्यंत शिफ्ट करण्यात येणार? रामगड टेकडी येथील ओंकार व्हेंचर यांच्याकडून मनपाचे हस्तांतरीत करण्यात आलेल्या रस्त्याचे काम कधीपर्यंत पूर्ण करण्यात येईल? एवढेच नव्हे तर जे.व्ही.एल.आर जंक्शनवर एम. जी. शोरूमने केलेले १३९५५.७२ स्वे.मीटरचे अनधिकृत बांधकाम कधी पाडणार, पंपहाऊस व संजय गांधी नगर येथील भुयारी मार्गाचे काम कधी पूर्ण करणार? असे प्रश्न आमदार वायकर यांनी उपस्थित केले.
मुंबई महानगरपालिकेच्या २०३४च्या डि. पी. आराखड्यानुसार डेअरी आयुक्तांनी ही जागा मनपाच्या ताब्यात देऊन, येथील रहिवाशांचे जवळच पुनर्वसन करुन सेवारस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आमदार रविंद्र वायकर यांनी १० डिसेंबर २०२१ रोजीच्या हिवाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न, २०२२च्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करुन याप्रश्नी सभागृहाचे लक्ष वेधले होते.
यावर उत्तर देताना, ऑबेरॉय मॉल ते पंपहाऊस रखडलेल्या सेवारस्त्याच्या रूंदीकरणाचे काम लवरक सुरू करण्यासाठी अधिवेशन संपल्यावर बैठक घेण्यात येईल तसेच एम. जी. शोरूमने केलेल्या अनधिकृत बांधकामप्रश्नी वस्तुस्थिती पडताळून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उद्योग मंत्री सामंत यांनी सभागृहात दिले. त्याचबरोबर या सेवारस्ताची जी जागा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे तिथे लवकरच काम सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

