किती लोकांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे याची माहिती आपण मागवली आहे. त्यांना खरंच ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आवश्यक आहे का? काहींचा तर ३०-३० सरकारी गाड्यांचा ताफा फिरत आहे. हा पैसा तुमचा नाही… सरकारकडे कररुपाने आलेला आहे. ज्या आमदाराला बंदोबस्त द्यायचा असेल तर जरुर द्या आणि तो दिलाही पाहिजे. त्यांचे व नागरीकांचे संरक्षण करणे, महाराष्ट्रातील जनतेचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सरसकट सगळ्यांना?… काही माजी नगरसेवकांना सरकारी संरक्षण… कोण त्याला काय करतंय… तो माजी झाला ना… त्याने गंभीर चुका केल्या असतील तर तो निस्तारेल… त्यासाठी सरकारी यंत्रणांचे संरक्षण देण्याची काय आवश्यकता, असा सवालही त्यांनी केला.
जनता दरबार उपक्रमाच्या निमित्ताने आले असता पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जनतेचा आजही पोलिसांवर विश्वास आहे. कोरोनाच्या काळात पोलिसांना जनतेने सहकार्य केले होते. आता चार महिन्यांत राज्यात चाललेली परिस्थिती अशीच राहिली तर राज्याचे चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
मुंबई, दि. १५ (विशेष प्रतिनिधी)- तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे प्रस्थ वाढले आहे. काही मंत्र्यांच्या बोलण्यातून मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात… पाहात असतात… लक्षात ठेवत असतात… काहीजण सहज बोललो असे नंतर म्हणत आहेत… पण, सहज बोलायला तुम्ही सामान्य नागरीक नाहीत… तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलेली आहे… तुमच्यावर जबाबदारी आहे, अशा शब्दांत राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमधील वाचाळवीरांना आज खडसावले.
मध्यंतरी अब्दुल सत्तार माझी बहिण सुप्रिया, हिला काही बोलले… विनाशकाले विपरीत बुद्धी… हेच त्यांना बोलले पाहिजे… आपण काय बोलतोय… मंत्री केले म्हणजे वेगळे झाले का… मंत्रीपदे येतात… जातात… कोण आजी… कोण माजी… असतात. परंतु शेवटी आपण नागरीक आहोत. संविधान… कायदा… नियम याचा सर्वांनी आदर करायचा असतो, असेही ते म्हणाले.
अंबरनाथमध्ये दोन गटात गोळीबार करण्याची घटना बैलगाडी शर्यतीत घडली… बैलगाडी शर्यतीमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडते… सरकार काय करत आहे?… ठाण्यात किसननगर भागात शिंदे-ठाकरे गटात राडा झाला. अशी राडेबाजी करुन चालणार नाही… पोलिसांना बाकीच्यापेक्षा याच गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. हे काय चालले आहे, असा सवालही पवार यांनी केला. आनंदाचा शिधा आता जनतेसाठी ‘मनस्तापाचा शिधा’ झाला आहे. अजून महाराष्ट्रातील लोकांना शिधा मिळालेला नाही. एका बहाद्दर मंत्र्यांने तर सांगितले की, तुलसीचे लग्न होईपर्यंत दिवाळी असते, तोपर्यंत देऊ… अजूनपर्यंत दिलेला नाही. ओल्या दुष्काळाकडे तर सरकारचे लक्षच नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

