Homeहेल्थ इज वेल्थकर्करोगाचे 70 टक्के...

कर्करोगाचे 70 टक्के प्रकार टाळणे शक्य!

भारतीय टपाल खाते, मुंबई विभाग यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने कर्करोगासाठी विशेष पाकीट काल जारी केले. जागतिक कर्करोग दिन-2021 निमित्ताने या आजाराबद्दल जागृती करणे व लोकांना त्यांच्या आरोग्याला असणारा कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी सहकार्य करणे ही यामागील उद्दिष्टे होती.

टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र ए. बडवे, मुंबई आणि  गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल एच. सी. अगरवाल तसेच  भारतीय टपाल खात्याच्या  मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे यांनी हे विशेष कव्हर जारी केले. कर्करोगाच्या विविध 100 प्रकारांपैकी 70 प्रकार टाळता येण्याजोगे असतात व या आजाराच्या या गोष्टीबाबत जागृती करणे आवश्यक आहे अशी माहिती डॉ. राजेंद्र बडवे यांनी यावेळी दिली.

भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढीला  लागले आहे. हे प्रमाण शहरात एक लाख लोकसंख्येमागे 100, निमशहरी भागात एक लाख लोकसंख्येमागे 60 ते 70 तर ग्रामीण भागात 40 ते 50 रोगग्रस्त असे आहे. आपण शहरीकरणाची किंमत अशाप्रकारे चुकवत असतो, असे सांगून टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक म्हणाले की, शहरीकरणासोबत येणाऱ्या आरामदायक जीवनशैलीद्वारे आपण कर्करोगाला आमंत्रण देत असतो आणि त्याला प्रतिबंध करता येऊ शकतो यावर अभ्यास झालेला आहे.

तंबाखूसेवन आणि लठ्ठपणा या दोन बाबी या जीवघेण्या आजाराला कारणीभूत आहेत. कर्करोगग्रस्तांनी उपचारानंतरही पाच वर्षांपर्यंत नियमित तपासणी करून घेत राहणे आवश्यक असल्याचे डॉ. बडवे यांनी नमूद केले. देशभरात पसरलेल्या विस्तीर्ण टपाल खात्याच्या जाळ्याचे देशातील कर्करोग उपचारामधील लक्षवेधी सहयोगाबद्दल सांगताना डॉ. बडवे यांनी, पूर्वी दुर्गम व ग्रामीण भागातील रूग्ण उपचारानंतरच्या तपासणीसाठी डॉक्टरांना पत्र पाठवत असत याचा उल्लेख केला.

कर्करोगाचे निदान व तपासणी, उपचारानंतरची नियमित तपासणी  याबद्दल  टपाल खात्याच्या महाराष्ट्र विभागीय कर्मचाऱ्यांमध्ये तसेच त्यांच्या कुटुंबियांमध्ये जागृती करण्यासाठी टाटा मेमोरियलच्या सहयोगाने मोहीम सुरू करणार असल्याचे मुंबई व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल  एच. सी. अगरवाल यांनी सांगितले.  ही मोहीम मुंबईपासून सुरू होईल.

कर्करोगाशी लढा देण्यासाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एकजुटीची भावना असणे आवश्यक असल्याचे मुंबई विभागाच्या पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांनी सांगितले. या कार्यक्रमात वेगवेगळ्या वयोगटातील कर्करोगमुक्त सहभागी झाले होते. या रोगाशी झुंज घेतानाचे आपले अनुभव त्यांनी यावेळी कथन केले.

Continue reading

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...

झाडाला पिकलाय आंबा.. गाण्याची दुबईत क्रेझ!

दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील यांनी त्यांचे नवीन गाणे “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतेच दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून...

देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम सिंधुदुर्गात साकार

सिंधुदुर्गात देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर नुकतीच यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. देशातल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटनप्रकल्पाचा हा एक भाग...
Skip to content