Homeपब्लिक फिगरजो न्याय नारायण...

जो न्याय नारायण राणेंसाठी तो पटोलेंना का नाही?

जो न्याय केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे यांना लावला जातो तोच न्याय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान पटोले यांना का नाही, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याबद्दल पटोले यांच्याविरूद्ध भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अनेक पोलीसठाण्यात तक्रारी केल्या असून पटोले यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी पाटील यांनी आज केली.

नारायण राणे यांच्या वक्तव्यावर कारवाई केली जाते. पण नाना पटोलेंच्या वक्तव्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. राज्यात ‘हम करे सो कायदा’ असे चित्र आहे. राज्यातील पोलीस दबावाखाली काम करत आहेत. पंतप्रधानांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अद्याप गुन्हा नोंद करुन घेण्यात आला नाही. त्यामुळे पटोले यांच्या वक्तव्यावर आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही ते म्हणाले.

नाना पटोले म्हणतात मोदींना मारू, नवाब मलिक म्हणतात फडणवीस यांना काशीचा घाट दाखवू. काशीचा घाट म्हणजे मृत्यू. तुम्ही बंदुका घेऊन फिरत आहात काय? शरद पवार तीन वेळा मुख्यमंत्री झाले. पण, त्यांनासुद्धा सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहता आले नाही. वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तो पराक्रम केला आहे. त्यांना नवाब मलिक काशीचा घाट दाखवणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांचे काही बरेवाईट झाले तर त्याची सूत्रे नवाब मलिक यांच्याकडे जातील, अशा प्रकारची एक सावधगिरीची तक्रार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

.. मग त्या आमदारांना विधानभवनात प्रवेश द्या

भाजपाच्या १२ निलंबित आमदारांचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. त्यावर युक्तीवाद करताना महाराष्ट्र सरकारतर्फे या आमदारांचे निलंबन ६० कॅलेंडर दिवसांपेक्षा जास्त नाही तर अधिवेशनाच्या काळातील ते दिवस आहेत, असे म्हटल्याचे निदर्शनाला आणताच पाटील म्हणाले की, मग या आमदारांचे सदस्यत्व इतर काळासाठी बहाल करा. त्यांना विधानभवनात प्रवेश करण्यासाठी मुभा द्या.

गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांत चालू झाले असून गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांची दक्षता समिती स्थापन करत असल्याची घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

काही दिवसांपूर्वी किल्ले रायगड येथे मदार मोर्चा येथे रंगरंगोटी करून व चादर चढवून त्याचे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. त्याच्या विरोधात छत्रपती खा. संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. शिवनेरी गडावर ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सिद्दी इब्राहिम खान उद्यान’ असा फलक लावला गेला. रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर ‘शिवाजी महाराजांचे गुरुवर्य पीरसाहेब यांच्या स्थानाकडे’ असा बोर्ड झळकला. या प्रकारांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी केल्या की पोलीस ऐतिहासिक पुरावा मागतात आणि तक्रार घेत नाहीत. ऐतिहासिक बाबींचे सरसकट कागदोपत्री पुरावे मिळू शकत नाहीत याचा फायदा घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या आशिर्वादाने व पोलिसांच्या मदतीने गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी भाजपाची प्रदेश दक्षता समिती पुढीलप्रमाणे राहील. अध्यक्ष – खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, सदस्य खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, नितीनराजे शिंदे, विक्रम पावसकर, वर्षा डहाळे. समितीचे मार्गदर्शक- भाजपा राष्ट्रीय सचिव सुनील देवधर.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content